Aurangabad

 

Tendernama

मराठवाडा

आस्तिककुमार पांडेंचा मोठा निर्णय... ठेकेदारांच्या हात सफाईला लगाम

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : महानगरपालिकेच्या (Municipal Corporation) गत चाळीस वर्षांच्या इतिहासात पावसाळा सुरू झाल्यानंतर देखील शहरातील लहान, मोठ्या नाल्यांची सफाई केली जात नव्हती. त्यामुळे 'पावसाळा सुरू; नाले सफाई केव्हा?' असा मथळा असलेल्या बातम्या दरवर्षी वाचायला मिळत असत. त्यात महापालिका आयुक्तांचे आदेश गुंडाळून ठेवत ठेकेदार आणि अधिकाऱ्यांनी केलेली 'नाले सफाई'ची पोलखोल पहिल्याच पावसात होत असे. मात्र आता प्रशासक आस्तिकुमार पांडेय यांनी ठेकेदाराला लगाम लावत महापालिकेतील यंत्रणेकडूनच नाले सफाईचे काम सुरू केले आहे. या कामात स्वतः प्रशासक लक्ष घालत असल्याने या कामाचे शहरातील नागरिकांकडून कौतुक होत आहे, तर दुसरीकडे नाले सफाईच्या नावाखाली सुरू असलेल्या हात की सफाईला चाप बसल्याचे दिसते आहे.

पावसाळ्यापूर्वीच नाले सफाईला पांडेय यांनी प्राधान्य दिले असून, त्यासाठी त्यांनी स्वतः नियोजनबद्ध कृती आराखडा तयार केला आहे. त्यांच्या या स्तुत्य उपक्रमाचे शहरभर कौतुक होत आहे. दुसरीकडे पांडेय यांच्या या प्रयोगामुळे ठेकेदार आणि अधिकाऱ्यांच्या 'हाथ की सफाई' ला लगाम लागला असून, महापालिकेचे तीन कोटी रुपये वाचतील, अशी महापालिकेत चर्चा सुरू आहे. त्यांच्या या प्रयोगामुळे आजी-माजी लोकप्रतिनिधींच्या खिशाला देखील मोठा 'धक्का' बसला आहे.

कोट्यवधी पाण्यात

आयुक्त हे प्रत्येक वर्षी नाले सफाईचे व्यवस्थित नियोजन करत असतानाही संबंधित विभाग ही प्रक्रिया कागदावरच राबवत असत. त्यामुळे नाल्यांची कचरामय स्थिती ‘जैसे थे’ राहत असल्याने काठावरील नागरिकांना नेहमी पूर परिस्थितीचा सामना करावा लागत असे. महापालिकेच्या अर्थसंकल्पात दरवर्षी मोठ्या नाल्यांमधील गाळ आणि कचरा काढण्यासाठी दोन ते तीन कोटींची तरतूद केली जात असे. यापूर्वी पावसाळ्याच्या तोंडावर ड्रेनेज विभागाकडून नाले सफाईची प्रक्रिया कागदोपत्री राबवून देयके काढली जात होती.

प्रशासकांची प्रशंसनीय आयडीया

नाल्यांच्या स्वच्छतेमध्ये होणारे गैरव्यवहार रोखण्यासाठी यंदा महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी सातारा - देवळाईसह शहरातील ११२ किलोमीटरचे १०१ लहान व मोठ्या नाल्यातील गाळ काढण्याची जबाबदारी महापालिकेचे प्रभाग अभियंता, कार्यकारी अभियंते आणि शहर अभियंत्यासह उप आणि कनिष्ठ अभियंत्यांवर सोपविली आहे. त्यानुसार २० मार्च रोजी आदेश काढण्यात आले. त्यासाठी २२ मार्च पासून स्वतः महापालिकेची यंत्रणा कामाला लावत तीन जेसीबी, एक पोकलेन आणि तीन टिप्परच्या साहाय्याने नाल्यातील गाळ व कचरा उपसण्याचे काम सुरू करण्यात आले आहे. नाले उपसताना स्वतः जबाबदार अधिकाऱ्यांच्या उपस्थितीसह व्हिडीओ चित्रिकरण करून तसा अहवाल सादर करण्याचे आदेश देखील पांडेय यांनी दिले आहेत. कृती आराखड्यानुसार संबंधित विभागाने नाले सफाईची प्रक्रिया राबविली नसेल तर निश्चित कारवाई होईल, असे पांडेय यांनी म्हटले आहे. विशेष म्हणजे, एकीकडे स्मार्ट सिटीच्या मुख्य कार्यकारी पदाचा अतिरिक्त कार्यभार असतानाही ते न चूकता स्वतः नाले सफाईची पाहणी करत आहेत.

ठेकेदारांना चाप

यापूर्वी कोट्यवधी रुपये खर्च करून देखील शहरातील नाले व्यवस्थितरित्या उपसण्यात येत नसल्याने पहिल्याच पावसाचे पाणी लोकांच्या घरात शिरत असे. महापालिकेतील बांधकाम, ड्रेनेज सेक्शन व आरोग्य तसेच अतिक्रमण निर्मूलन विभागाकडे ही जबाबदारी सोपविण्यात येत असे. मात्र ऐन पावसाच्या तोंडावर गाळ उपसण्याचे ठरविले जात असल्याने महापालिकेतील यंत्रणा व ठेकेदाराने काहीच न करता पुरात गाळ, कचरा वाहून जात असे. त्यानंतर भर पावसात दिखावा म्हणून नाल्यातील गाळ उपसून तो काठावर ठेवण्यात येत असे. त्यामुळे पावसामुळे हा गाळ पुन्हा नाल्यात साचत असल्याने हा नाले सफाईचा देखावा कशासाठी, असा सवाल नेहमी महापालिकेला केला जात असे. दुसरीकडे मात्र सफाईच्या नावे कोट्यवधींची देयके काढत ठेकेदार आणि अधिकारी 'हाथ की सफाई' करत मालामाल होत असत.

दोषींवर कारवाई करणार : पांडेय

आता महापालिका प्रशासक आस्तिककुमार पांडेय यांनी ठेकेदारामार्फत केल्या जाणाऱ्या नाले सफाईच्या कामाला लगाम लावला असून, आता स्वतः महापालिकेच्या यंत्रणेकडून नाले सफाईचे काम सुरू केले आहे. याबद्दल औरंगाबादकर पांडेय यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव करत आहेत.

यासंदर्भात 'टेंडरनामा'ने देखील प्रशासक पांडेय यांच्या या स्तुत्य उपक्रमाबाबत प्रशंसा केली. यावेळी पांडेय म्हणाले की, विशेष कृती आराखडा तयार करण्यात आला आहे. त्यानुसार संबंधित विभागाने नाले सफाईची प्रक्रिया राबविणे सुरू केले आहे. स्वत: मी टीम सोबत नाल्यांची पाहणी करत आहे. यातही काही उणिवा आढळल्यास दोषींवर कारवाई करण्याची तंबी देखील संबंधितांना दिली आहे.