छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : गंगापूर तालुक्यातील शरणापूर-करोडी-साजापूर या मुख्य रस्त्याच्या टेंडर प्रकरणी कोणत्याही राजकीय दबाबाला बळी न पडता सार्वजनिक बांधकाम विभागाचे अधीक्षक अभियंता विवेक बडे, मुख्य अभियंता दिलीप उकिर्डे यांच्या मार्गदर्शनाखाली कार्यकारी अभियंता अशोक वामनराव येरेकर यांनी सोमवारी (ता. १३) मार्च रोजी नियमानुसारच टेंडर ओपन केले. यात एक टक्का कमी दराने टेंडर प्रक्रीयेत सहभागी असलेल्या मुंबईच्या जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीला हे काम मिळाल्याचे बडे यांनी सांगितले. जिल्ह्यातील या महत्वाच्या बायपासप्रकरणी टेंडर ओपन करण्यास विलंब होत असल्याची टेंडरनामाने सातत्याने वृत्तमालिका प्रकाशित केली होती. आता काम मिळालेल्या ठेकेदाराला वर्क ऑर्डर कधी मिळते आणि तो प्रत्यक्षात कशापद्धतीने काम करतो, कामाच्या दर्जावर देखील टेंडरनामा बारकाइने लक्ष ठेवेल.
जिल्ह्याचे खा. इम्तियाज जलील यांनी एका मोठ्या राजकीय नेत्याचा दबाब असल्याचे म्हणत टेडर प्रक्रीयेतून माघार घेण्यासाठी काही ठेकेदारांवर दबाब टाकला जात असल्याची प्रतिक्रीया टेंडरनामा प्रतिनिधीशी बोलताना व्यक्त केली होती. यानंतर टेंडरनामा वृत्तमालिकेची दखल घेत विरोधी पक्षनेते आ. अंबादास दानवे यांनी देखील या रस्त्याचे टेंडर ओपन करण्यास सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विलंब होत असल्याबाबत १३ मार्च रोजी विधानसभेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी टेंडर प्रसिद्ध केले असून, टेंडर प्रक्रिया पूर्ण करून तातडीने काम सुरू करणार असल्याचा खुलासा विधानपरिषदेत केला होता. त्यास दिवशी हे टेंडर ओपन केले गेले, हे विशेष.
नेत्यांचे मौन, अभियंत्यांनी दिलेला पाळला शब्द
या मुख्य रस्त्याबाबत टेंडरनामाने वृत्तमालिकेसोबतच केंद्रीय मंत्री नितीन गडकरी, मुख्यमंत्री एकनाथ शिंदे , बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण, खा. इम्तियाज जलील, पश्चिम मतदार संघाचे आ. संजय शिरसाट, पूर्व मतदार संघाचे आ. अतुल सावे, पालकमंत्री संदिपान भुमरे, आ. प्रशांत बंब, केंद्रीय वित्त राज्यमंत्री डाॅ. भागवत कराड तसेच राज्याचे विरोधी पक्षनेते अंबादास दानवे व बांधकाम सचिवांपर्यत पाठपुरावा केला होता. मात्र, दानवे, भुमरे आणि जलिल वगळता अत्यंत जिव्हाळ्याच्या या प्रश्नावर इतरांनी मौन पाळले होते. यावर प्रतिनिधीने सार्वजनिक बांधकाम मंडळाचे मुख्य अभियंता डी. डी. उकिर्डे तसेच अधीक्षक अभियंता विवेक बडे, कार्यकारी अभियंता अशोक येरेकर यांना थेट सवाल केला. त्यावर या अभियंत्यांनी तातडीने स्वतः रस्त्याची पाहणी केली. रस्त्याची स्थिती भयंकर असल्याचे निदर्शनास आले. तातडीने त्यांनी या रस्त्याबाबत गंभीर दखल घेतली व आठ दिवसात नियमानुसारच टेंडर ओपन केले जाईल. कोणत्याही राजकीय दबाबाला प्रशासन बळी पडणार नाही, अशी दिलेली ग्वाही अखेर खरी ठरली. उकिर्डे आणि बडे यांच्या मार्गदर्शनाखाली येरेकर यांनी पारदर्शकपणे टेंडर प्रक्रिया पुर्ण केली. यात मुंबईच्या जे.पी.क॔न्सट्रकश्न कंपनीला अखेर काम मिळाले. आता या कामाच्या दर्जावर टेंडरनामाचे बारकाईने लक्ष असेल.
नेमके काय आहे प्रकरण
● सार्वजनिक बांधकाम विभागाने सात वर्षांपूर्वी शरणापूर-करोडी-साजापूर रस्त्याच्या दूरूस्तीसाठी केंद्रीय मार्ग निधी अंतर्गत २०१४-१५ या आर्थिक वर्षात ५ कोटी ७ लाख २४ हजार ८१३ रूपये मंजूर केले होते. यानंतर रस्त्याच्या दुरूस्तीसाठी गंगापूरच्या सार्वजनिक बांधकाम उपविभागामार्फत बी-१ टेंडर काढले होते. त्यात २२.९१ कमी टक्के दराने टेंडर भरणाऱ्या संभाजीनगरच्या धनंजय कन्स्ट्रक्शन कंपनीला १७ जानेवारी २०१५ रोजी वर्क ऑर्डर देण्यात आली होती. टेंडरमधील अटीशर्तीनुसार १२ महिन्यात रस्त्याचे बांधकाम करून पुढील ३६ महिने त्यांच्याकडे देखभाल दूरूस्तीचा कार्यकाळ निश्चित करण्यात आला होता. मात्र रस्त्याचे खोदकाम सुरू करताच काळ्यामातीचे प्रमाण अधीक असल्याने टेंडर रकमेनुसार हे काम परवडत नसल्याचे म्हणत किंमत वाढवा अशी अट टाकत त्या ठेकेदाराने काम थांबवले. मात्र सार्वजनिक बांधकाम खात्याने त्याचे काही एक ऐकुन न घेता काम सुरू करा म्हणत तगादा लावला. पण ठेकेदार पुढे सरकला नाही. अर्धवट स्थितीत त्याने माघार घेतली.
● त्यानंतर महाविकास आघाडी सरकारच्या काळात या रस्त्यासाठी १५ कोटी रूपये मंजूर करण्यात आले. टेंडरमध्ये यशस्वी झालेल्या के. एच. कन्सट्रक्शन कंपनीचे खंडेराव पाटील या ठेकेदाराने मार्गावर चार आरसीसी पूल बांधले. बदल्यात त्याला सार्वजनिक बांधकाम विभागाने ९३ लाख रूपये दिले. मात्र बांधकामात अडथळा निर्माण करणारे इलेक्ट्रीक पोल आणि काही कच्ची पक्की अतिक्रमणे हटवण्याबाबत त्याने अनेकदा सार्वजनिक बांधकाम विभागाला पत्रव्यवहार केला. मात्र विभागाने दुर्लक्ष केले. अखेर या ठेकेदारानेही पहिल्या टप्प्यातील शरणापूर-करोडी रस्त्याला ग्रहण लावले. याबाबत त्याला दंडात्मक कारवाई केली आहे व काम सुरू करायचे आदेशित केल्याचे संबंधित विभागाचे म्हणणे आहे.
२७ कोटीच्या टेंडरला राजकीय ग्रहण
यानंतर याच मार्गावरील करोडी ते साजापूर या दुसऱ्या टप्प्यातील रस्त्यासाठी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी २७ कोटीचा निधी मंजुर केला. १ डिसेंबर २०२२ मध्ये सार्वजनिक बांधकाम विभागाने रस्त्याच्या दूरूस्तीसाठी २६ कोटी ९२ लाखाचे अंदाजपत्रक तयार केले. टेंडर प्रसिद्ध केले. त्यात ८ डिसेंबर २०२२ रोजी ड्रीम कन्सट्रक्शन दिल्ली, गंगामाई इंडस्ट्रीज ॲन्ड कन्स्ट्रक्शन प्रा. लि. संभाजीनगर, जीएनआय इंन्फ्रास्ट्रक्चर प्रा. लि. संभाजीनगर आणि मुंबईच्या जे. पी. कन्स्ट्रक्शन कंपनीने सहभाग नोंदवला. मात्र या कामात खा. जलील यांच्या मते तीन महिन्यांचा कालावधी उलटून देखील इच्छुक ठेकेदारांच्या कागदपत्रांची तपासणी केली जात नव्हती.तांत्रिक बीड ओपन केले गेले नाही.
विरोधी पक्षनेत्यांनी प्रश्न उपस्थित करताच....
या रस्त्याच्या टेंडरप्रक्रीयेत सार्वजनिक बांधकाम विभागाद्वारे विलंब होत असल्याप्रकरणी विरोधी पक्ष नेते अंबादास दानवे यांनी विधानपरिषदेत लक्षवेधी उपस्थित केली होती. त्यावर या रस्त्याचे रूंदीकरण तसेच चार पदरी सिमेंट काँक्रीट रस्त्याचे बांधकाम करण्यासंदर्भात टेंडर प्राप्त झाल्याची कबुली बांधकाममंत्री रविंद्र चव्हान यांनी दानवेंच्या प्रश्नाला उत्तर देताना दिली होती. त्यात तातडीने टेंडर प्रक्रिया पूर्ण करून काम सुरू करण्यात येणार असल्याची ग्वाही दिली होती. सोबतच टेंडरनामाने प्रसिध्द केलेल्या उत्पादन शुल्क इमारतीच्या टेंडरप्रक्रियेत असाच घोळ असल्याचे दाखले देत दानवेंनी सभागृहाचे लक्ष वेधुन घेतले होते. त्यावर या कामाबाबत वर्क ऑर्डर झाली असून, फेब्रुवारी २०२५ ला हे काम पूर्ण होईल. तसेच विश्रामगृहाचे काम ही २०२४ पर्यंत पूर्ण होणार असल्याचे चव्हाण यांनी स्पष्ट केले होते. यात मात्र शरणापूर-साजापूर-करोडी रस्त्याबाबत तिकडे दानवेंनी प्रश्न उपस्थित करताच इकडे यंत्रणेने टेंडर ओपन केले याबद्दल छत्रपती संभाजीनगरातील उद्योजक, कामगार आणि या भागातील पंचक्रोशीतील ग्रामस्थ, शेतकरी यांच्याकडून विरोधी पक्षनेते अंबादास दानवे यांच्यावर अभिनंदनाचा वर्षाव होत आहे.