Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

छत्रपती संभाजीनगर-जळगाव महामार्ग दीड हजार कोटी खर्च करूनही धोक्याचा!

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय महामार्गासाठी दिड हजार कोटी खर्च करूनही अद्याप काही ठिकाणी रुंदीकरणासह मूलभूत सुविधांचा अभाव असल्याने हा मार्ग प्रवाशांसाठी जीवघेणा बनत आहे. काही ठिकाणी अरूंद रस्त्यावरील वाढती वाहतूक अनेकांच्या जिवावर उठत आहे. दोन दिवसांपूर्वी राष्ट्रीय महामार्ग विभागातील अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे हा राष्ट्रीय महामार्ग ओलांडताना एका महिलेला जीव गमवावा लागला. इतकी भयावह घटना घडल्यानंतर देखील राष्ट्रीय महामार्ग विभाग, जिल्हाधिकारी व विभागीय आयुक्त तथा महापालिका प्रशासक काही उपाययोजना आखायला तयार नाहीत.‌

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव हा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक ७५३ एफ आहे. छत्रपती संभाजीनगरहून जगप्रसिद्ध अजिंठा लेणी, जळगाव, एदलाबादकडे जाणे आणि पुढे मध्य प्रदेशला जोडणारा हा मार्ग उत्तर प्रदेश आणि मराठवाड्याला जोडणारा महत्त्वाचा दुवा आहे. या मार्गाच्या रुंदीकरणाचा प्रस्ताव मंजूर झाला आहे. सार्वजनिक बांधकाम विभागांतर्गत राष्ट्रीय महामार्ग विभागाने जमीन हस्तांतरणासाठी महसूल विभागाशी पत्रव्यवहारही केला आहे. मात्र काही ठिकाणी कब्रस्तानासाठी जागा मिळत नसल्याने, तर काही ठिकाणी शेतकरी जमीन देण्यास तयार नसल्यामुळे रूंदीकरणाचे घोंगटे कायम भिजत असल्याचे एका विश्वसनीय सूत्रांनी सांगितले. त्यामुळे स्थानिकांच्या विरोधामुळे या राष्ट्रीय महामार्गाचे रुंदीकरण रखडले आहे. वाहनांची वाढलेली वर्दळ लक्षात घेता या मार्गाचे संपूर्ण लांबीत चौपदरीकरण तातडीने होणे गरजेचे आहे. गेल्या दोन दिवसांपूर्वी झालेल्या एका अपघातांनी मार्गाच्या रुंदीकरणाची गरज पुन्हा एकदा अधोरिखित केली आहे.

वाढत्या अपघातांच्या पार्श्वभूमीवर छत्रपती संभाजीनगर ते जळगाव या राष्ट्रीय मार्गाची पाहणी केल्यानंतर हा हर्सूल येथील जामा मस्जीद ते फुलेनगर ते सावंगी तलाव संपूर्ण मार्गच अपघातांचा सापळा बनल्याचे निदर्शनास आले. धोक्यांची सुरुवात खामनदीवरील पुलापासूनच होते. अरूंद पुलावरील वाढती वर्दळ, अवजड वाहनांमुळे होणारी कोंडी हा नित्याचाच प्रकार आहे. याशिवाय हर्सूल टी पाॅईंट ते शासकीय वळू संगोपण केंद्रापर्यंत फुटपाथवर हॉटेल्स, खाद्यपदार्थांच्या गाड्या, दुकाने यामुळे नागरिकांची वर्दळ वाढली आहे. यातच थेट रस्त्यावर थाटलेली हेल्मेट, टोप्या, रेनकोट , स्टेशनरी आणि फ्रूट विक्रीच्या दुकानांचीही गर्दी वाढली आहे. हर्सूल टी पाॅईंट ते हर्सूल गावापर्यंत गत वर्षी सोळा कोटी रूपये देऊन भूसंपादन करून रस्ता चौपदरी करण्यात आला. मात्र आता रस्त्याकडेला दुकानात खरेदीसाठी आणलेली वाहनेही या रस्त्याच्या दुतर्फा पार्क केली जातात. मुळातच जेमतेम ६० फुटाचा हा रस्ता. यात दोन्ही बाजूने वाहनांच्या बेशिस्त पार्किंगमुळे उरलेल्या चिंचोळ्या जागेतून वाहनांना वाट काढून पुढे जावे लागते. जामा मस्जीद ते हर्सूल तलावापर्यंत सात मीटरचा जुना डांबरी रस्ता असल्याने तीनशे मीटर अंतरात  वाहनांची कोंडी होत आहे. डांबरी रस्त्याला लागून अवघी दोन ते तीन फुटांची साइडपट्टी आहे. दोन्ही बाजूच्या साइटपट्ट्या भरलेल्या नाहीत. अनेक ठिकाणी रस्ता खचला असून, ओबडधोबड रस्त्याचा वाहनचालकांना अंदाजच येत नाही. विशेष म्हणजे या महामार्गावर खामनदीवरील पूलावर देखील मोठमोठे प्राणघातक खड्डे तयार झाले आहेत. खड्डयांमुळे अचानक वाहने रस्त्यातच थांबतात. मागून येणाऱ्या वाहनांना अचानक थांबावे लागते. त्यामुळे वाहने एकमेकांवर आदळण्याची भीती नेहमीच असते. अरूंद रस्ता आणि दोन्ही बाजूने सतत वाहनांची वर्दळ सुरू असल्याने ओव्हरटेकिंग म्हणजे अपघात हे समीकरणच बनले आहे.

रूंदीकरण रखडले

छत्रपती संभाजीनगर ते जळगाव राष्ट्रीय महामार्गावर अनेक ठिकाणी या मार्गाच्या रूंदीकरणाला सरकारने यापूर्वीच परवानगी दिली आहे. सार्वजनिक बांधकाम विभागातील राष्ट्रीय महामार्ग विभागाने जमीन हस्तांतरणासाठी प्रयत्न सुरू केले आहेत. जमिनीची मोजणीही सुरू आहे. मात्र काही शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध दर्शवला आहे. विरोधामुळे रूंदीकरणाचे काम रखडले आहे. शेतकऱ्यांशी चर्चा करून तोडगा काढण्यासाठी जिल्हा प्रशासनाला पुढाकार घ्यावा लागणार आहे. अन्यथा या मार्गावरील प्रवास अधिकच धोकादायक ठरणार आहे.

अपघातांनी दिला इशारा

दोन दिवसांपूर्वी हर्सूल जामा मस्जीद ते सावंगी तलाव मार्गावर मोठा प्राणघातक खड्डा चुकवितांना फूलेनगरात राहणाऱ्या एका दुचाकीस्वार महिलेचा मृत्यू झाला. या अपघातांनी भविष्यातील मोठ्या धोक्यांचा इशाराच दिला आहे.दरम्यान अधिकाऱ्यांनी फुलेनगर, फातिमानगरातील संतप्त नागरिकांचा रोष पाहुन राष्ट्रीय महामार्ग विभागावर रस्त्यांवरील खड्डे भरण्यासाठी तात्पूरते रेडिमिंक्स डांबर आणले, मात्र नागरिकांनी त्यालाच विरोध केला. या रस्त्याचे तातडीने चौपदरीकरण करून सिमेंट रस्ता बनवा, अशी जोरदार मागणी नागरिकांनी लाऊन धरली.त्यानंतर राष्ट्रीय महामार्ग विभागाच्या अधिकाऱ्यांचे डोळे उघडले. आता या रस्त्याचे रूदीकरण होईल, तेव्हा होईल या संपूर्ण तीनशे मीटर रस्त्याचे डांबरीकरण करण्याचा निर्णय विभागाने घेतला आहे. जामा मस्जीद ते सावंगी तलावादरम्यान कब्रस्तानाची मोठी जागा रस्ता रूंदीकरणात बाधा निर्माण करत आहे. येथील कब्रस्तानासाठी जिल्हाधिकाऱ्यांनी सूचित केलेली गट क्रमांक २०२ येथील वळू संगोपण केंद्राची जागा रद्द झाली. त्यामुळे दुसरी पर्यायी जागा देण्याबाबत राष्ट्रीय महामार्ग विभागाने जिल्हाधिकाऱ्यांना पत्रव्यवहार केला आहे. मात्र लोकसभा निवडणुकीची आचारसंहिता लागल्याने काम थांबविण्यात आल्याचे राष्ट्रीय महामार्ग विभागाने स्पष्ट केले. दुसरीकडे याच मार्गावर सिल्लोड तालुक्यात फरशी फाटा साखळी पूल क्रमांक - ३२ महालकिन्होळा गावादरम्यान रूंदीकरणाचे काम रखडलेले आहे. येथील शेतकऱ्यांनी जमीन देण्यास विरोध केल्याचे विभागाचे म्हणणे आहे.‌ एखादा अपघात झाल्यानंतर काही काळ चर्चा होते आणि पुन्हा याकडे दुर्लक्ष होते. जिल्हा प्रशासनाने रस्ता रुंदीकरणासाठी तातडीने कब्रस्तानासाठी पर्यायी जागेसाठी प्रयत्न करावेत.

या नियमाचा विसर का

राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६ चे कलम ३ (G) व भूसंपादनातील योग्य नुकसान भरपाईचा अधिकार व स्थानांतरण, पुनःस्थापना आणि पुनर्वसन अधिनियम, अधिनियम २०२३ चे कलम २६ ते ३० अन्वये छत्रपती संभाजीनगर ते जळगाव रोडसाठी भूसंपादनाचा अंतिम निवाडा घोषित करण्यात आला आहे. मोबदल्याची कारवाई नियमानुसारच असल्याचे अधिकाऱ्यांचे म्हणणे आहे. नोटीस मिळाल्यानंतर दिलेल्या नोटीसीतील निर्देशानुसार कागदपत्राची ६० दिवसांत पुर्तता न केल्यास राष्ट्रीय महामार्ग अधिनियम, १९५६ चे कलम ३ (E) (२) नुसार भूसंपादनाची कार्यवाही करू शकते, मग हा नियम येथे का लागू शकत नाही. एकूनच राष्ट्रीय महामार्ग विभागाची भुमिका संशयास्पद दिसत आहे.