Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

Sambhajinagar : अपघातात पुलाचा कठडा तुटला आता दुरूस्तीची जबाबदारी कोणाची?

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : सिडको उड्डाणपुलावरील रस्त्यांचे गेल्या महिन्यातच मजबुतीकरण करण्यात आले होते. मात्र, उड्डाणपुल चढताना गॅस टॅंकरने धडक दिल्याने अपघातामुळे तुटलेला कठडा नऊ दिवस उलटून देखील अद्याप दुरूस्त करण्यात आला नाही. कठड्यातील लोखंड बाहेर निघालेले आहे. काँक्रिटचा खच सेवा रस्त्यावर पडल्याने वाहनधारकांना अडथळा निर्माण होत आहे. परिणामी येथे मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे सेवा रस्त्यांवरील वाढत्या वाहतुकीचा अडथळा दूर करण्यासाठी पडलेला कठडा उचलून संरक्षक कठड्यांच्या मजबुतीसाठी डागडुजीची कामे प्राधान्याने होण्याची आवश्यकता आहे.

छत्रपती संभाजीनगर-जालना महामार्गावर हाॅटेल रामगिरी ते मुकुंदवाडी चौकादरम्यान हा पूल आहे. त्या खालून सेवा रस्ते आहेत. सिडकोतील अनेक महत्त्वाच्या रस्त्याकडे सेवा रस्ते जोडलेले आहेत. जवळच सिडको बसस्थानक, पंचतारांकित हॉटेल आहेत. चिकलठाणा औद्योगिक वसाहत, हायकोर्ट, चिकलठाणा विमानतळ आणि पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीकडे हा रस्ता जातो. या पुलावरून २४ तास वाहतूक सुरू असते. अवजड वाहतूकही या पुलावरून चालते. गेल्या गुरूवारी पहाटेच्या सुमारास पुलावर अपघात झाला. तेव्हा गॅस टॅंकरच्या धडकेने पुलाचा डाव्या बाजुचा कठडा तुटून पुलावरून कठडा सेवा रस्त्यावर कोसळला. या अपघाताने गॅस गळती झाल्याने संपुर्ण शहर हादरले. आसपासच्या एक किलोमीटर अंतरावरील वसाहती काही तासांसाठी खाली करण्यात आल्या. रस्ते बंद करण्यात आले. परिणामी सिडको-हडकोतील अनेक रस्त्यांवर वाहतुकीचा चक्काजाम झाला.

या अपघातानंतर सिडको उड्डाणपुलाच्या उतारावरच जाहिरातीसाठी खड्डा करून मातीचा ढिग रस्त्यावर पसरल्यामुळे टॅंकर पलटी झाल्याचा तांत्रिक शोध लावत महापालिका आयुक्त तथा प्रशासक व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी मुंबईच्या प्रो ॲक्टिव्ह कंपनीला धारेवर धरत चांगलीच कानउघाडणी केली. मात्र टँकरने धडक देऊन अद्यापही कठडा तुटलेल्या अवस्थेत आहे. विशेषतः येथील अपघातानंतर महापालिका प्रशासक तथा आयुक्त व स्मार्ट सिटीचे सीईओ जी. श्रीकांत यांनी शहरातील सर्व प्रमुख रस्त्यांचे ऑडिट करण्यासाठी तज्ज्ञांची समिती स्थापन केली. तज्ज्ञांच्या अहवालानंतर प्रमुख रस्त्यांवर सुरळीत वाहतुकीसाठी उपाययोजना केल्या जातील, अशी घोषणा देखील जी. श्रीकांत यांनी केली. मात्र कठडा दुरूस्तीवर कुणाचेही लक्ष गेले नाही. हा पूल सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अखत्यारित येतो. त्यांनी तातडीने तुटलेल्या कठड्याची दुरुस्ती करणे अपेक्षित आहे.

तुटलेल्या कठड्याच्या जागी सिमेंट काँक्रिटची भिंत बांधण्यात यावी. त्यामुळे तेथील भाग मजबूत होईल.मात्र, गत आठ दिवसापासून पुलाच्या तुटलेल्या कठड्याचे अवशेष सेवा रस्त्यांवर पडलेले आहेत. आठ वर्षांपूर्वी हा पूल बांधण्यात आला. तेव्हा गृहित धरण्यात आलेल्या वाहतुकीपेक्षा कितीतरी जास्त वाहतूक सध्या सुरू आहे. त्यावेळी पुलाचे काम तांत्रिकदृष्ट्या योग्य न झाल्याने हा पूल असून अडचन नसून खोळंबा अशी अवस्था झाली आहे. तरी त्याच्या दुरुस्ती-देखभालीकडे दुर्लक्ष होता कामा नये. हे नुकत्याच झालेल्या अपघातातून पुढे आले आहे. भिंतीला पडलेल्या भेगा, पिलरचे मजबुतीकरण, कठडे मजबूत करणे आणि विशेष म्हणजे पुलावरून होणारी वाहतूक नियंत्रित करणे याकडे आता लक्ष देण्याची गरज आहे.