Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

अवघ्या 3 वर्षांत रस्त्याचे वाटोळे; मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेचे तीन-तेरा

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : ग्रामीण  विकासासाठी महत्त्वाचा असणारा राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - २६ ते बिडकीन, सोमपुरी, लोहगाव, ब्रम्ह गव्हाण, तोंडोळी, शेवता रस्ता नवीन बनवण्यासाठी सरकारने ३ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपयांचा निधी मंजूर केला होता. तीन वर्षांपूर्वी या रस्त्याचे डांबरीकरण करण्यात आले. मात्र, हे काम अतिशय निकृष्ट दर्जाचे झाले असून, अवघ्या तीन वर्षांतच हा रस्ता उखडला आहे. त्यामुळे रस्त्याचे बांधकाम करणाऱ्या महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास संस्थेंतर्गत प्रधानमंत्री ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यप्रणालीवर प्रश्नचिन्ह निर्माण झाले असून, नागरिकांनी नाराजी दर्शवली आहे.

राज्यातील सर्वसाधारण क्षेत्रातील ५०० पेक्षा जास्त (आदिवासी क्षेत्रातील २५० पेक्षा जास्त) लोकसंख्या असलेल्या न जोडलेल्या उर्वरित वाड्या-वस्त्या जोडण्यासाठी नवीन जोडणी व प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेंतर्गत अंतर्भुत न झालेल्या अस्तित्वातील दुरावस्था झालेल्या रस्त्यांची दर्जोन्नती करणे यासाठी प्रधानमंत्री ग्रामसडक योजनेच्या धर्तीवर राज्यात ग्राम विकास विभागाच्या दिनांक २८ ऑक्टोबर, २०१५ रोजीच्या सरकारी निर्णयान्वये, मुख्यमंत्री ग्राम सडक योजना सुरू करण्यात आलेली आहे

याच योजनेंतर्गत राष्ट्रीय महामार्ग -२६ ते बिडकीन, सोमपुरी, लोहगाव, ब्रम्ह गव्हाण, तोंडोळी, शेवता या रस्त्याचे दर्जोन्नतीकरण करण्यात आले होते. यासाठी मुख्यमंत्री ग्रामसडक सडक योजनेंतर्गत महाराष्ट्र ग्रामीण रस्ते विकास मंत्रालयामार्फत ३ कोटी ७२ लाख ९८ हजार रुपये निधी मंजुर करण्यात आला होता. सदर कामाची वर्क ऑर्डर २९ सप्टेंबर २०१८ रोजी छत्रपती संभाजीनगर येथील कालिका इंजिनिअरींग कंपनीला देण्यात आली होती.

सदर कामाची मुदत २६ सप्टेंबर २०१९ पर्यंत होती. रस्त्याचा देखभाल दुरुस्तीसाठीचा कालावधी पाच वर्षाचा होता. यासाठी ३० लाख ११ हजाराची सुरक्षा अनामत रक्कम राखीव ठेवण्यात आली होती. या रस्त्याची जबाबदारी पंतप्रधान ग्राम सडक योजना व मुख्यमंत्री ग्रामसडक योजनेच्या कार्यकारी अभियंत्याकडे होती. रस्त्याची एकूण लांबी १०.६०० किलोमीटर होती.

या निकृष्ट बांधकामाबाबत संबंधित विभागाच्या कार्यकारी अभियंता यांच्याकडे टेंडरनामाने सातत्याने विचारणा केली असता त्यांनी प्रतिसाद दिला नाही. यासंदर्भात ग्रामस्थांच्या शेकडो तक्रारी प्राप्त झाल्यानंतर टेंडरनामाने रस्त्याची पाहणी केली.

त्यावेळी रस्ता बांधकामातील अंदाजपत्रकानुसार रस्त्याच्या शोल्डरमध्ये खडीकरण मजबुतीकरणासह मुरुमाचा भराव करून रोलरने दबाई करणे बंधनकारक असताना काॅन्ट्रेक्टरने त्याला फाटा दिल्याचे दिसले. यामुळे डांबरी रस्त्याच्या दोन्ही कडा नक्षीदारपणे निखळल्याने त्या ठिकाणी वाहनचालकांना अपघाताचा सामना करावा लागत आहे. रस्त्यावरचे डांबर निघाली असून खड्डे पडलेले आहेत. ज्या ठिकाणी डांबर निघाले आहे, त्याठिकाणी पुन्हा डांबर टाकून रस्ता बनविणे याचा कालावधी शिल्लक असताना कंत्राटदार आणि अधिकाऱ्यांनी रस्त्याकडे पाठ फिरवली आहे.