Sambhajinagar Tendernama
मराठवाडा

अहिल्याबाई होळकर चौक ते सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या एका रस्त्याच्या कामाला मुहूर्त; इतरांचे काय?

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar News छत्रपती संभाजीनगर : शहरातील सातारा गावातील अहिल्याबाई होळकर चौक ते सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणाऱ्या रस्त्याचे भाग्य उजळणार आहे.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे पडले होते. या खड्ड्यांमुळे रस्त्याची मोठी दुरवस्था झाली होती. या रस्त्याची दुरुस्ती करण्याची मागणी नागरिकांनी केली होती. याबाबत ‘टेंडरनामा’नेही अनेक वेळा वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन संबंधित विभागाने तातडीने रस्त्याचे काम सुरू केले आहे. मात्र सातारा - देवळाईतील इतर मुख्य आणि अंतर्गत रस्त्यांचे व इतर मूलभूत सुविधांचे काय, असा प्रश्न नागरिक उपस्थित करत आहेत.

सातारा येथील या मुख्य रस्त्याची गेल्या कित्येक वर्षांपासून खड्ड्यांनी अक्षरश: चाळणी झाली होती. यात दर पावसाळ्यात रिमझिम पावसामुळे रस्त्याचा चिखलदरा पाहायला मिळत होता. यामुळे वाहनधारकांची गैरसोय होत होती. सातारा - देवळाई हा शहराला जोडूनच असल्याने या दोन्ही गावांचा महानगरपालिकेत समावेश होऊन ९ वर्ष झाली. मात्र साडेआड कोटीचे पाच रस्ते वगळता महानगर पालिकेने सातारा - देवळाईकरांकडे कानाडोळा केला. याउलट जे रस्ते केलेत त्यांची देखील पार चाळणी झाली आहे. कर घ्या, पण सोयी सुविधा द्या, असे म्हणण्याची वेळ सातारा - देवळाईकरांवर आली आहे.

नगरविकास विभागाच्या निधीतून सार्वजनिक बांधकाम विभागाने सातारा - देवळाई भागात ३० कोटीची कामे केली. मात्र अधिकारी आणि कंत्राटदाराच्या अर्थपूर्ण संबंधांमुळे त्याही रस्त्यांचे वाटोळे झाले. त्यात उरले- सुरले रस्ते मलनिःसारण आणि जलवाहीसाठी कुरतडून टाकले. परिणामी चांगल्या रस्त्यांचा अभाव असल्याने या भागातील दळणवळण विस्कळीत होते. पावसाळ्यात नागरिकांचे मोठ्या प्रमाणात हाल होतात.‌

लोकसभा  निवडणुकीच्या तोंडावर देवळाई परिसरातील म्हाडा काॅलनीतील मुख्य सिमेंट रस्त्याचे स्मार्ट सिटी डेव्हलपमेंट कार्पोरेशनच्या माध्यमातून काम सुरू केले. मात्र महिन्याभरापासून कंत्राटदाराने काम बंद केल्याने अर्धवट कामावरून नागरिकांना घसरगुंडीचा खेळ खेळावा लागत आहे.

देवळाई रस्त्याचे देखील भिजत घोंगडे कायम आहे. अहिल्याबाई होळकर चौक ते म्हाडा काॅलनी या रस्त्याची पार चाळणी झाली आहे. याच भागातील रेणुकामाता मंदिर कमान ते अहिल्याबाई होळकर चौक हा रस्ता आधी एमआयडीसीने जलवाहिनीसाठी खोदला. त्यानंतर जीव्हीपीआरच्या कंत्राटदाराने रस्त्याची वाट लावली. मात्र, या रस्त्यांचे काम मंजूर झाले असे सांगून महाराष्ट्र जीवन प्राधिकरण तीन वर्षांपासून वेळ मारून नेत आहे. सातारा - देवळाईतील रस्ते अनेक ठिकाणी खोदून ठेवण्यात आले आहेत.

त्यात या भागातील अनेक मुख्य रस्त्यांवर अतिक्रमण झाले आहे. मात्र, महानगरपालिका बांधकाम विभागाचे अधिकारी- पदाधिकाऱ्यांनी त्याकडे सोयीस्कर दुर्लक्ष केले आहे. त्यातच साताऱ्यातील अहिल्याबाई होळकर चौक ते सोलापूर - धुळे राष्ट्रीय महामार्गाला जोडणारा महत्त्वाचा रस्त्याची पार चाळणी झाली होती.‌ गत तीस वर्षांपासून रस्ता दुर्लक्षित होता. पावसाळ्यात चिखलातून नागरिकांना वाट काढावी लागत असे.‌ यामुळे वाहन धारकांना वाहने चालवितांना कसरत करावी लागत असे, याकडे महानगरपालिकेच्या बांधकाम विभागाने लक्ष देवून तातडीने रस्त्याचे काम करावे, अशी मागणी होत होती.

या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात खड्डे होते.‌ या खड्ड्यांंमुळे रस्त्यावरून वाहन चालविणेही अवघड झाले होते.‌ खड्ड्यांमुळे रस्त्यावर दररोज लहान-मोठे अपघात घडत होते. या रस्त्याची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी सातारा वासीयांनी संबंधित विभागाला केली होती; परंतु संबंधित विभागाकडून याकडे दुर्लक्ष केले गेले. याबाबत ‘टेंडरनामा’ने वेळोवेळी वृत्त प्रकाशित केले होते. या वृत्ताची दखल घेऊन सार्वजनिक बांधकाम विभागाने दीड कोटी रूपयातून रस्त्याचे काम हाती घेतले आहे. सध्या रस्त्याच्या कामाला सुरवात झाली असून, याप्रमाणेच सातारा - देवळाईतील इतर रस्त्यांकडे देखील महानगरपालिका व सार्वजनिक बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांनी लक्ष द्यावे, अशी मागणी पुढे आली आहे.