Aurangabad Tendernama
मराठवाडा

5 वर्षांपासून 'या' रस्त्याचे काम अपूर्णच; मुख्य अभियंता संतापले

टेंडरनामा ब्युरो

औरंगाबाद (Aurangabad) : मागील पाच वर्षांपासून संथगतीने सुरू असलेल्या औरंगाबाद - जळगाव रस्त्याच्या (Road Work) निकृष्ट कामाच्या तक्रारी 'टेंडरनामा'कडे प्रवाशांनी केल्या होत्या. 'टेंडरनामा'ने याची गांभीर्याने दखल घेऊन सलग दोन दिवस औरंगाबाद ते फुलंब्री, फुलंब्री ते सिल्लोड, सिल्लोड दरम्यान दोन्ही बाजूने थेट १५० किमी पाहणी केली. त्यावर वृत्तमालिका प्रसिद्ध केली. एवढेच नव्हे तर जिल्हाधिकारी, विभागीय आयुक्तांपासून बांधकाम मंत्री केंद्रीय मंत्री, केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभाग, तसेच राष्ट्रीय महामार्ग विभागातील संबंधित कार्यकारी अभियंता, अधीक्षक अभियंत्यांपासून मुख्य अभियंत्यांकडे वृत्तमालिका पाठवत पाठपुरावा केला. जिल्हाधिकाऱ्यांच्या आदेशानंतर औरंगाबाद, जालना जळगावसह धुळ्याच्या कार्यकारी अभियंत्यांनी पाहणी केली होती. मात्र परिस्थितीत सुधारणा होत नसल्याचे लक्षात येताच राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी राष्ट्रीय महामार्ग विभागाचे अधिकारी, प्रकल्प सल्लागाराच्या अधिकार्‍यांना धारेवर धरले.

शनिवारी (ता. ३) पहाटे साडेसहा वाजता राष्ट्रीय महामार्ग विभागाचे मुख्य अभियंता यांनी आपल्या अधिकाऱ्यांसह कंत्राटदार आणि प्रकल्प सल्लागार समितीच्या सदस्यांसह औरंगाबादेतील हर्सूल टी पाॅईंटपासून पाहणी करायला सुरूवात केली. त्यांच्यासोबत औरंगाबाद विभागाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे, जालन्याचे शिरभाते तसेच धुळ्याचे विकास महाले उपस्थित होते. रस्त्याच्या कामाबाबत नाराजी व्यक्त करून अधिकार्‍यांशी चर्चा सुरू केली. औरंगाबाद - ते जळगाव १४८ किमी रस्त्याची पाहणी करण्याचा निर्णय घेतला.

दरम्यान हर्सूल ते जुना जकात नाक्यादरम्यान एक धार्मिकस्थळ आणि कब्रस्तानचा अडथळा असल्याने येथे रस्त्याचे काम सुरू करताना पर्यायी रस्ता उपलब्ध नाही. परिणामी दोन महिन्यात हे काम करणे शक्य नसल्याचे कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे यांनी सीईओ संतोष शेलार यांना सांगितले. हर्सूल रुंदीकरणाबाबत शासनाचा सोळा कोटीचा निधी येईपर्यंत विभागाकडे असलेल्या बचत निधीतून हे काम मार्गी लावण्याचे विचाराधीन असल्याचे ते म्हणाले. समृध्दी महामार्गाच्या भुयारी मार्गापुढील रस्त्याचे काम तातडीने मार्गी लावा, असेही ते म्हणाले. पुढे सिल्लोड बायपासचे देखील काम तत्काळ पूर्ण करण्याचे आदेश दिले. महसूल शाखेने नियमानुसार भूसंपादन करून राष्ट्रीय महामार्गाकडे हस्तांतरीत केलेल्या जागांवरील रखडलेल्या पुलांचे काम लवकर करा. जिथे जिथे सुशोभिकरण करणे शक्य आहे तेथे आवश्यक पूर्ण करा. पुढे निल्लोड फाटा ते सिल्लोड दरम्यान १२ ठिकाणी ताफा थांबवत मुख्य अभियंत्यांनी पाहणी केली. या आठ किमी रस्त्याचे काम धुळे विभागाकडे आहे. यावर खटोड कंस्ट्रक्शन कंपनीची रस्ता बांधकामासाठी नियुक्ती केली आहे. दरम्यान या अर्धवट काॅंक्रिट रस्त्याचे काम येत्या १५ डिसेंबर पर्यंत पूर्ण करण्याचे कडक आदेश विकास महाले व खटोड कंपनीला दिले.  

निकृष्ट कामांकडे दाखवले बोट

चारचाकींतून निघालेल्या ताफ्यात मुख्य अभियंता शेलार यांनी १४८ किमीच्या प्रवासादरम्यान अनेक ठिकाणी थांबून रस्त्यावर झालेली निकृष्ट कामे अधिकार्‍यांच्या निदर्शनास आणून दिली. त्याचबरोबर काँक्रीट रस्त्यावर पडलेल्या भेगा, खडबडीत झालेला रस्त्याचा पृष्ठभाग, रस्त्यावरील चढउतार या सर्व बाबीसुद्धा प्रत्यक्षपणे अधिकार्‍यांच्या निदर्शनात आणून दिल्या.

दर्जा तपासा दोषींवर कारवाई करा

निकृष्ट कामांसह संपूर्ण रस्ता, पूल आणि दुभाजकाचे थर्ड पार्टीकडून बारकाईने तपासणी करूनण संपूर्ण रस्त्याचे (Road Work) स्कॅनिंग करून कामाच्या दर्जाबाबत अहवाल तयार करण्याचे निर्देश देऊन अहवालानुसार आवश्यक ठिकाणचे काँक्रिट काढून नव्याने काँक्रिटीकरण करणे, खडबडीत पृष्ठभागावर इपॉक्सीचा थर लावणे, चढउतार भाग समतोल करणे या सर्व आवश्यक उपाय योजना करून येत्या दोन महिन्यांत रस्त्याचे काम पूर्ण करण्याचे निर्देश मुख्य अभियंता संतोष शेलार यांनी अधिकार्‍यांना दिले. 

दोन दिवसांत अहवाल पाठवा 

यावेळी दोन दिवसांच्या आत तपासणी करून अहवाल सादर करू. त्याच बरोबर तडे गेलेले काँक्रिट काढून नवीन काँक्रिट कामाला लगेच सुरवात करणार असल्याची ग्वाही अधिकार्‍यांनी शेलार यांना दिली. या प्रत्येक ठिकाणी पोहचल्यानंतर रस्त्याचे काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे झाल्याने ते काम नव्याने करण्याचे निर्देश दिले. पुढे फर्दापूर ते जळगाव दरम्यान रस्त्याची पाहणी करून पुलावरील उखडलेले डांबरीकरण व रस्त्याचा खराब झालेल्या पृष्ठभागावर नव्याने काॅंक्रिट करण्याचे निर्देश शेलाल यांनी अधिकार्‍यांना दिले.

'टेंडरनामा'च्या वृत्तमालिकेची दखल

● औरंगाबादकडून अजिंठा लेणीकडे जाणाऱ्या दीड हजार कोटी खर्चाच्या या राष्ट्रीय महामार्गाला पाच वर्षांपासून अर्थात सुरुवातीपासूनच काँक्रिटच्या रस्त्याचे काम सुरू असतानाच दुरावस्था झाली होती. रस्त्याच्या दर्जाकडे देखील अधिकाऱ्यांचे नियंत्रण नव्हते. यावर 'टेंडरनामा'ने भांडाफोड करताच यंत्रणा कामाला लागली. महामार्गाच्या साइड ड्रेनेजच्या स्लॅबला पडलेले भगदाड. खड्ड्यांची मोजणी करत 'टेंडरनामा'ने राष्ट्रीय महामार्ग विभागातील कारभारी , कंत्राटदार आणि पीएमसीचा भांडाफोड केला होता.

● अजिंठा लेण्यांमुळे जगभरातील पर्यटकांसाठी जळगाव- औरंगाबाद महामार्ग महत्त्वाचा आहे. तब्बल दीड हजार कोटी रुपये खर्चाच्या या काँक्रिट रस्त्यावर काम पूर्ण होण्यापुर्वीच खड्डे पडत आहेत. पाच वर्षांपासून हे काम सुरू असून ते अजूनही पूर्ण झालेले नाही. रस्त्याच्या क्वॉलिटी कंट्रोलबाबतच्या अनेक त्रुटी असल्याची बाब ‘टेंडरनामा’ने तज्ज्ञांसह केलेल्या पाहणी दरम्यान समोर आणली. 

● अजिंठा लेणी या जागतीक वारसास्थळी जाणारा महामार्ग असल्याने केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांचे विशेष लक्ष असलेल्या औरंगाबाद - जळगाव महामार्गाची पाहणी ‘टेंडरनामा’ने केली. निवृत्त स्थापत्य अभियंत्यांना सोबत घेऊन औरंगाबाद ते सिल्लोड गावापर्यंतच्या रस्त्याची पाहणी केली. त्यात औरंगाबादेतील हर्सूल टी पाॅईंटसह पुढे रुंदीकरण व अनेक ठिकाणी काम अपूर्ण असून चौका, बिल्डा, सिल्लोडपर्यंत कामे सुरू आहेत. अजिंठा घाटात सरंक्षण कठडे व रस्ता बांधण्याचे काम प्रलंबीत असल्याची बाब पुढे आणली. तब्बल दीड हजार कोटी रुपये खर्च होत असताना या रस्त्याचे काम सुरू असतानाच त्याची दुरावस्था झाली आहे.

● जागोजागी रस्त्याचे काँक्रिटीकरण करताना कॉंक्रिट जॉइंट व्यवस्थित केलेले नाहीत. रस्ता पूर्ण झाल्यानंतर त्याला तडे जावू नये म्हणून कटींग करून त्यात डांबर भरले जाते. या भागात कटींग केलेल्या भागात खाेलवर डांबर भरण्यात आलेले नाही. त्यामुळे आता पोकळी निर्माण होवून वाहनांच्या कंपनामुळे खड्डे पडत आहेत.

● रस्त्यावर गाडी आदळण्याचे प्रमाण अधिक आहे. काँक्रिटचा थर एकसारखा असला तरी त्यावरचा सिमेंटचा थर आलेला असताना पावसाच्या पाण्याने वाहून गेला आहे. पाण्यामुळे त्याखालील मातीचा थर खाली बसल्याने रस्ता खाली-वर झाल्याचे जाणवते. त्यात कटिंग करून रस्ता ब्रेक केल्याने त्या ठिकाणी वाहन आदळत चालत असल्याचे जाणवले.

महिला अधिकाऱ्याचा पुढाकार

औरंगाबाद - अजिंठा मार्गाचे औरंगाबाद हद्दीतील काम गत पाच वर्षांपासून रखडले आहे. औरंगाबाद विभागातील राष्ट्रीय महामार्गाच्या कार्यकारी अभियंता पल्लवी सोनवणे यांनी आठ महिन्यापूर्वी पदभार स्वीकारताच या कामाला त्यांनी खऱ्या अर्थाने गती दिली. शंभर टक्के अपूर्ण अवस्थेत असलेल्या रस्त्याचे आठ महिन्यांत ८५ टक्के काम पूर्ण केले. विशेष म्हणजे दररोज साइटवर पोहोचून आधीच्या काळातील निकृष्ट कामात देखील त्यांनी सुधारणा घडवून आणल्या. 'टेंडरनामा'च्या वृत्ताची तातडीने दखल घेत त्यांनी कंत्राटदाराला देखील खडे बोल सुनावले होते. पल्लवी सोनवणे यांच्या चांगल्या कामाची मार्गावरील ग्रामस्थ, लोकप्रतिनिधी आणि विशेष म्हणजे केंद्रीय मंत्री नितीन गडकरींसह केंद्रातील रस्ते वाहतूक आणि महामार्ग विभागाने देखील प्रशंसा केली आहे.