औरंगाबाद (Aurangabad) : औरंगाबाद शहराच्या ऐतिहासिक वैभवाची साक्ष देणाऱ्या ऐतिहासिक कमळ तलावाच्या दुर्दशेवर 'टेंडरनामा'ने ताशेरे ओढताच त्याला गतवैभव मिळवून देण्यासाठी जिल्हाधिकारी सुनील चव्हाण यांनी पुढाकार घेतला आहे. सरकारी तिजोरितून २ कोटी रूपये खर्च करून तलावाचे खोलीकरण, रूंदीकरण आणी चारही बाजुंनी दगडी पिचेस , पर्यटकांसाठी खास उद्यान, चौपाटी तयार केले जाणार आहे.
सोमवार ते बुधवार सलग तीन दिवस नगरभूमापन अधिकारी कार्यालयामार्फत तलावाचे चारही बाजूनी सर्वेक्षण पूर्ण करण्यात आले आहे. त्यानुसार रेकाॅर्डवर १६ एकर परिसर जागेवर असल्याचे स्पष्ट झाले. उर्वरित जागेत मोठ्या प्रमाणावर अतिक्रमण झाली आहेत. आता या तलावात परिसराचे सर्वेक्षण अहवाल प्राप्त झाल्यानंतर नगरभूमापन अधिकारी हद्दी व खुणा निश्चित करून नकाशा तयार करणार आहेत. त्यानंतर जिल्हाधिकारी सुनिल चव्हाण यांना नकाशासह अहवाल सादर करतील. यानंतर सविस्तर प्रकल्प विकास आराखडा तयार करून सरकारकडे प्रस्ताव पाठवण्याच्या हालचाली होतील.