औरंगाबाद (Aurangabad) : पहिल्याच किरकोळ पावसाच्या दणक्याने शहरातील नुकत्याच झालेल्या सरकारी अनुदानातील १५२ कोटीच्या अनेक रस्त्यांवर आज तळ्याचे स्वरूप आले. महापालिका, एमआयडीसी, एमएसआरडीसीच्या ठेकेदारांनी रस्त्याच्या कडेला टाकलेल्या भुमिगत पाईप आणि चेंबर साफ केले नसल्याचेच यावरून स्पष्ट झाल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. तर दुसरीकडे रस्त्यांचे सदोष बांधकामामुळे तळे साचल्याचे काही तज्ज्ञांचे मत आहे. प्रत्यक्षात प्राप्त तक्रारीनुसार टेंडरनामा प्रतिनिधीने या रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्याच्या बांधकामावरच प्रश्नचिन्ह उपस्थित होत आहेत.
यावर प्रकल्प सल्लागार समीर जोशी यांना विचारले असता आम्हाला फोटो आणि लोकेशन पाठवा त्यावर आम्ही जिथे कुठे पाणी साचले असेल तिथे तोडगा काढु असे उत्तर त्यांनी दिले. या संदर्भात महापालिकेचे कार्यकारी अभियंता भागवत फड, एमएमआरडीसीचे मुख्य अभियंता बी. बी. साळुंखे यांच्याशी संपर्क होऊ शकला नसल्याने त्यांची बाजु समजू शकली नाही.
किरकोळ पावसातच तळी साचल्याच्या तक्रारी प्राप्त झाल्यानंतर टेंडरनामा प्रतिनिधीने गुरूवारी दुपारनंतर सायंकाळपर्यंत आणि शुक्रवारी सकाळी एपीआय कॉर्नर ते कलाग्राम, सिडको एन - १ पोलिस चौकी ते एपीआय कॉर्नर, सिडको एन-२ महालक्ष्मी चौक ते लोकशाही काॅलनी, हाॅटेल दिपाली ते मुकुंदवाडी रेल्वेस्टेशन, जालनारोड ते ॲपेक्स हाॅस्पिटल, जिल्हाधिकारी कार्यालय चौक ते डॉ. सलिमअली सरोवर, वरद गणेश मंदिर ते लक्ष्मण चावडी मार्गे सावरकर चौक व सिल्लेखाना, जाफरगेट ते मोंढा नाका व जाफर गेट ते आठवडी बाजार , पोलीस मेस ते कटकटगेट, नौबत गेट ते सिटीचौक, मदनी चौक ते सेंट्रल नाका , गोपाल टी ते उत्सव मंगल कार्यालय व औषधी भवनसमोरील पूल , तसेच सिडको एन - ५ टाऊन सेंटर जीएसटी कार्यालय ते अग्रसेन चौक व कॅनाॅट परिसरातील रस्त्यांची पाहणी केली.
सरकारच्या उद्देशाला हरताळ
या गजबजलेल्या व शहरातील मुख्य रस्त्यांसाठी महाआघाडी सरकारचे मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी दिलेल्या १५२ कोटी २४ लाख रुपये या निधीतून कमी वेळेत आणि कामांची गुणवत्ता चांगली असावी यादृष्टीने २० रस्ते बांधकामाचा निर्णय घेतला होता. यामुळे राज्याची पर्यटन राजधानी असलेल्या शहराच्या रस्त्यांची स्थिती उंचावण्यासाठी महापालिकेकडे आठ व रस्ते विकास महामंडळ आणि महाराष्ट्र औद्योगिक विकास महामंडळाकडे सहा + सहा असे एकूण २० रस्त्यांची कामे सोपविण्यात आली होती. मात्र ठाकरे सरकारच्या उद्देशालाच हरताळ फासत या रस्त्यांची कामे केली गेल्याने औरंगाबादकरांच्या आशेवर देखील पाणी फिरले.
घरादारात साचले तळे
टेंडरनामाने या रस्त्यांची पाहणी केली असता रस्त्यांची उंची वाढल्याने जोडरस्त्यांच्या सखल भागासह नागरिकांच्या दारातच पाण्याचे तळे निर्माण झाल्याचे दिसले. त्याचबरोबर या प्रत्येक मार्गावरील साचलेल्या तळ्यामुळे वाहतुकीची कोंडी मोठ्या प्रमाणात झाली होती. या १५२ कोटीतील नव्या रस्त्यांवर ठिकठिकाणी साचलेली पाण्याची तळी, वाहतुकीची कोंडी यामुळे पहिल्याच किरकोळ पावसात औरंगाबादकरांची अक्षरशा दैना उडाली त्यामुळे मोठ्या पावसात काय हाल होतील असा प्रश्न निर्माण होत आहे.
महापालिकेचा दावा फोल
१५२ कोटीचे रस्ते तयार करण्यापूर्वी अदाजपत्रकात रस्त्यांच्या दोन्ही बाजुने भूमिगत पाईप टाकुन स्ट्राॅम वाॅटर योजनेचा समावेश असल्याने ते पाणी लगतच्या नाल्यात सोडले जाणार असल्याचा महापालिकेचा दावा होता, पण अनेक ठिकाणी साचलेल्या तळ्यांनी हा दावा फोल ठरला. आणि भूमिगत गटारांचे चॅनेल साफ झाले नसल्याचेच स्पष्ट झाले. त्यामुळे मोठ्या प्रमाणात पावसाचे पाणी साचून राहिले.
पहिल्याच पावसात पितळ उघडे
रस्ते करताना रस्त्यालगत बांधलेल्या भूमिगत पाईपातून पाण्याचा निचराच होत नसल्याचे वास्तव यानिमित्त उघड झाले आहे. या पाईपांची सफाईच केली नसल्याचे श्रीकांत देशपांडे, अजय काथार, विष्णु धाटबळे, अंजली कोतकर, श्रीधर सरनाईक आदी आसपासच्या नागरिकांनी सांगितले. परिणामी पावसाचे पाणी मोठ्या प्रमाणात साचल्याने नवे कोरे रस्ते खराब होतील अशी शंका औरंगाबादकर करत आहेत.