Hospital Tendernama
महाटेंडर

ठाणे, पालघर जिल्ह्यातील नागरिकांसाठी गुड न्यूज;रुग्णालयास 527 कोटी

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : ठाणे (Thane) आणि पालघर (Palghar) जिल्ह्यातील नागरिकांसाठी एक दिलासादायक बातमी आहे. या जिल्ह्यांतील रुग्णांना मोफत दर्जेदार आरोग्य सुविधा उपलब्ध व्हावी यासाठी जिल्हा रुग्णालय प्रशासनाकडून ९०० खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारण्यात येणार आहे. त्यासाठी राज्य सरकारने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी मंजूर केला असून येत्या महिन्याभरात सार्वजनिक बांधकाम विभागाकडून या कामाचे टेंडर काढण्यात येणार आहे.

ठाणे जिल्हा सरकारी रुग्णालयाची उभारणी ब्रिटिश काळात म्हणजेच १९३६ मध्ये करण्यात आली होती. या जुन्या इमारती अतिशय जीर्ण आणि वापरण्यास अयोग्य झाल्या आहेत. या पार्श्वभूमीवर रुग्णालयाच्या जुन्या इमारती पाडून त्याजागी सुपर स्पेश्यालिटी रुग्णालय उभारण्यास राज्य सरकारने ९ मार्च २०१८ मध्ये मान्यता दिली होती.

ठाणे जिल्हा रुग्णालय ३६७ खाटांचे आहे. त्यात वाढ करून ५७४ खाटांचे सुपरस्पेशालिटी रुग्णालय उभारणीचा सुरुवातीला प्रस्ताव होता. त्यासाठी ३१४ कोटी ११ लाख रुपयांच्या निधीला मंजुरी दिली होती. काही कारणास्तव प्रत्यक्ष कामाला सुरुवात झाली नसल्यामुळे निधी खर्च झाला नव्हता. त्याचदरम्यान नगरविकास विभागाने मंजूर केलेल्या नवीन एकात्मिक विकास नियंत्रण व प्रोत्साहन नियमावलीनुसार प्रस्तावित भूखंडावर ५.३० इतका चटई क्षेत्र निर्देशांक लागू झाला. त्यानुसार जिल्हा रुग्णालय प्रशासनाने सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत रुग्णालयाचा सुधारित प्रस्ताव तयार केला. त्यास मंजुरी मिळावी यासाठी जिल्ह्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे आणि रुग्णालयाचे शल्यचिकित्सक डॉ. कैलास पवार यांचा सातत्याने पाठपुरावा सुरू होता. पूर्वीच्या प्रस्तावात सहा मजली इमारत प्रस्तावित होती.

नव्या प्रस्तावानुसार दहा मजली इमारत होणार असून, त्यास सरकारने मान्यता दिली होती. यामुळे ५७४ खाटांऐवजी ९०० खाटांचे रुग्णालय उभारणीचा मार्ग मोकळा झाला होता. या कामासाठी सरकारने ५२७ कोटी ४१ लाखांचा निधी अडीच महिन्यांपूर्वी मंजूर केला आहे. निधीचा अडसर दूर झाल्यामुळे या कामाचा शुभारंभ वेगाने होईल अशी अपेक्षा आहे. सरकारच्या सार्वजनिक बांधकाम विभागामार्फत इमारत उभारणीचे काम केले जाणार आहे. त्यामुळे टेंडर प्रक्रिया याच विभागामार्फत राबवली जाणार आहे. असे असले तरी या कामासाठी सार्वजनिक बांधकाम विभागाकडून अद्याप टेंडर काढण्यात आलेले नाही. दरम्यान, सुपरस्पेशालिटी रुग्णालयाच्या टेंडरशी संबंधित तांत्रिक बाबींची पूर्तता करून महिनाभरात टेंडर जाहीर केले जाणार असल्याचे ठाणे सा. बां. मंडळाचे अधीक्षक अभियंता, वि. ल. कांबळे यांनी सांगितले.