Mumbai-Goa Highway Tendernama
कोकण

Mumbai-Goa Highway : अखेर नागोठणेपासून डांबरीकरण सुरु

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई गोवा महामार्गाच्या (Mumbai-Goa Highway) पहिल्या टप्प्याच्या रखडलेल्या कामाबाबत आणि कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याच्या झालेल्या दुरावस्थेबाबत तातडीने डांबरीकरण व काँक्रीटीकरणाचे काम तातडीने सुरू करावे अन्यथा १ मे रोजी रायगड जिल्हा प्रेस क्लब रस्त्यावर उतरून आंदोलन करेल असा इशारा राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाला देण्यात आला होता. दरम्यान नागोठणेपासून डांबरीकरणाच्या कामाला शनिवारी प्रत्यक्ष सुरुवात झाली असून या टप्प्याचे काँक्रिटीकरणाचे कामही मे महिन्यात सुरू करणार असल्याचे आश्वासन प्राधिकरणाने दिले असल्यामुळे आंदोलन स्थगित करण्यात आले आहे.

कासू ते इंदापूर या टप्प्यातील रस्त्याची अनेक ठिकाणी अतिशय दयनीय अवस्था आहे, नागोठणे ते पळस-कोलेटी दरम्यान वाहन चालवणे जिकरीचे होते, या रस्त्याची एकबाजू पूर्णपणे उध्वस्त झालेली असल्याने वाहन चालक विरुद्ध मार्गिकेने वाहने चालवतात, त्यामुळे अपघात होत आहेत. रस्त्याचे काँक्रीटीकरणाचे काम सुरू झाले परंतु ज्याठिकाणी रस्ता चांगला आहे त्या शिरढोण पनवेल येथे कामाला सुरुवात झाली, उद्ध्वस्त झालेल्या कासू ते इंदापूर दरम्यान रस्त्याचे काम आधी करणे गरजेचे असताना या रस्त्याकडे दुर्लक्ष झाले होते. रायगड जिल्हा प्रेस क्लबने आंदोलनाचा इशारा देऊन नागोठणे बाजूने काम सुरू करावे यासाठी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणाकडे तगादा लावला होता.

१ मे पर्यंत पळस्पे ते कासूचे कॉंक्रिटीकरण आणि कासू ते इंदापूर या दरम्यान पडलेले खड्डे भरून डांबरीकरण सुरू केले नाहीत तर १ मेला नागोठणे ते वाकन दरम्यान लॉंग मार्च काढून घंटा नाद आंदोलन रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येणार असल्याचा इशारा रायगड प्रेस क्लबचे संस्थापक आणि मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांनी प्रेस क्लबच्या पोलादपूर येथे झालेल्या वर्धापन दिनाच्या कार्यक्रमात दिला होता. त्यानंतर रायगड प्रेस क्लबच्या वतीने प्राधिकरणाचे प्रकल्प व्यवस्थापक यशवंत घोटकर यांनाही १ मे च्या आंदोलनाबाबत दोन वेळा पत्र देण्यात आले होते, त्याआधी खारपाडा येथे भूमिपूजन कार्यक्रमासाठी आलेले केंद्रीय रस्ते विकास मंत्री नितीन गडकरी यांनाही १ मे रोजी करण्यात येणाऱ्या आंदोलनाबाबत पत्र देण्यात आले होते. परिषदेचे विभागीय सचिव अनिल भोळे यांनी एनएचएआयकडे यामागणीसाठी वेळोवेळी प्रत्यक्ष संपर्कही केला होता.

दरम्यान, नागोठणेपासून खड्डे पडलेल्या रस्त्यावर डांबरीकरणाचे काम शनिवारपासून सुरू करण्यात आले आहे तसेच काँक्रीट करण्याच्या मशिनरीही सुकेळी खिंडीमध्ये आणून ठेवल्या असून पहूर येते कॉरीचे काम सुरू करण्यात आले आहे. त्यामुळे कॉंक्रिटीकरणाचे कामही लवकरच सुरू होईल आणि हे कॉंक्रिटीकरणाचे काम पावसाळ्यातही सुरू राहील अशी माहिती घोटकर यांनी दिली. डांबरीकरणाचे काम सुरू झाल्याने सोमवारी १ मे पासून रायगड प्रेस क्लबच्या वतीने करण्यात येणारे आंदोलन स्थगित करण्यात येत असल्याची माहिती जिल्हाध्यक्ष मनोज खांबे यांनी दिली. तब्बल १३ वर्षे रखडलेल्या या मुंबई गोवा महामार्गाच्या कामाबाबत मराठी पत्रकार परिषदेचे मुख्य विश्वस्त एस एम देशमुख यांच्या नेतृत्वाखाली अनेक वेळा रायगड प्रेस क्लबच्यावतीने रस्त्यावर उतरून पत्रकारांनी आंदोलने केली आहेत.