रत्नागिरी (Ratnagiri) : सेंट्रल किचनच्या माध्यमातून सुरू झालेल्या पोषण आहार वितरणाबाबत सलग दुसऱ्या दिवशीही तक्रारी आल्या. त्यांना सक्त ताकीद दिली आहे. ठेकेदाराला बोलवून त्याला शेवटची संधी दिली आहे. त्यानंतर जर आहार वितरण आणि दर्जात सुधारणा झाली नाही, तर टेंडर रद्द करू, असा इशारा जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी इंदुराणी जाखड यांनी दिला. टेंडरमध्ये स्थानिकांना डावलल्याच्या तक्रारी आल्या आहेत. त्यामुळे टेंडरचीही चौकशी करू, असे आश्वासन जिल्हाधिकारी डॉ. बी. एन. पाटील यांनी दिले.
जिल्हाधिकारी कार्यालयात या दोन अधिकाऱ्यांनी माहिती दिली. पहिल्याच दिवशी पोषण आहाराचा ठेका घेतलेल्या संस्कार महिला मंडळामार्फत शिर्के प्रशालेत विद्यार्थ्यांना न शिजलेला भात व बेचव वरण देण्यात आले होते. यामुळे पालकांसह संस्थाचालक आक्रमक झाले. त्यानंतर दोनच दिवसांत रत्नागिरी शहरातील दामले विद्यालयात संस्कार महिला मंडळामार्फत केल्या जाणाऱ्या वितरणात गोंधळ झाला. शहरातील शाळांना दुपारच्या सुटीत देण्यात येणारा पोषण आहार दुपारची सुटी संपली, तरी पोषण आहार आला नव्हता. छोटी-छोटी मुले भुकेने व्याकूळ झाली होती. पोषण आहारही अपुरा असल्याने अनेक विद्यार्थी वंचित राहिले. हा प्रकार पुढे आल्यावर पालिका शिक्षण मंडळाचे प्रशासन अधिकारी सुनील पाटील यांनी पोषण आहार देणाऱ्या संस्कार महिला मंडळ संस्थेवर कारवाई करण्याचा इशारा दिला आहे.
याबाबत जिल्हा परिषद मुख्य कार्यकारी अधिकारी जाखड म्हणाल्या, की शहरातील दोन हजार ५०० मुलांच्या गटाला पोषण आहार वितरणाची जबाबदारी संस्कार महिला मंडळातर्फे सुरू आहे. वाटप सुरू केल्यापासून तक्रारी सुरू झाल्या. त्यांना बोलवून शेवटची संधी देण्यात आली आहे. यापुढे तक्रार आल्यास टेंडर रद्द करू, अशी सक्त ताकीद त्यांना दिली आहे. विद्यार्थ्यांच्या आरोग्याचा प्रश्न असल्याने यावर शिक्षण समितीचे लक्ष राहील. त्यांनी शिजलेल्या आहाराचे नमुने घेऊन ते तपासायचे आहेत. शाळांमध्ये अर्धा तास आधी पोषण आहार जावा, असे आदेश दिले आहेत.
अधिकाऱ्यांना समज देऊ
रत्नागिरी प्रादेशिक मनोरुग्णालयाच्या कारभाराबाबतही काही तक्रारी जिल्हाधिकाऱ्यांकडे आल्या. रुग्णालयात अनेक महिन्यांपासून भूलतज्ज्ञ नाहीत. मात्र, त्याचा पाठपुरावा अपेक्षेप्रमाणे होत नाही. तेथील अधिकारी वेळेत कार्यालयात उपस्थित नसतात. कर्मचारी, रुग्णांबरोबर येणाऱ्या नातेवाइकांशी अधिकारी उद्धट वागत असल्याच्या तक्रारी असल्याचे सांगण्यात आले. जिल्हाधिकाऱ्यांनी याबाबत माहिती घेऊन योग्य ती समज दिली जाईल, असे सांगितले. काही दिवसांपूर्वीच आमची बैठक झाली, त्यातही काही बाबी पुढे आल्या. त्यामुळे मनोरुग्णालयातील अधिकाऱ्यांना लवकरच बोलावून घेऊ, असे जिल्हाधिकाऱ्यांनी सांगितले.