Jal Jeevan Mission Tendernama
कोकण

Ratnagiri : 'जलजीवन मिशन'चे होणार थर्ड पार्टी ऑडिट

टेंडरनामा ब्युरो

रत्नागिरी (Ratnagiri) : ‘‘जिल्ह्यात जलजीवन मिशन योजनेतून ‘हर घर हर जल’युक्त गावे बनविण्यासाठी १ हजार ४९६ गावांमध्ये १ हजार ३५३ योजनांचा आराखडा तयार केला आहे. कामाचे आदेश देण्यात आले आहेत. आतापर्यंत ९७ योजना पूर्ण झाल्या आहेत. त्यामुळे ११० गावे ‘हर घर नलसे जल’ म्हणून घोषित करण्यात आली आहेत. या कामांसाठी ९०० कोटींचा निधी आहे. या कामांचा दर्जा पाहण्यासाठी ‘थर्ड पार्टी ऑडिट’ करण्यात येणार आहे,’’ अशी माहिती जिल्हाधिकारी एम. देवेंदर सिंह यांनी दिली.

जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते. या वेळी जिल्हा पोलिस अधीक्षक धनंजय कुलकर्णी उपस्थित होते. २०२२-२३ जिल्हा वार्षिक योजनेतून २७१ कोटींचा निधी प्राप्त झाला. हा सर्व निधी ३१ मार्चअखेर खर्च झाला आहे. २०२३-२४ साठी जिल्हा वार्षिक योजनेतून ३०० कोटींच्या आराखड्याचे नियोजन करण्यात आले आहे. त्यातील १० टक्के निधी म्हणजे २३ कोटी जिल्ह्यासाठी प्राप्त झाले आहेत. १ हजार ९९० कामांना यातून मंजुरी दिली आहे. आता किती कामांचे टेंडर, वर्कऑर्डर दिली याचा आढावा घेण्यासाठी बुधवारी (ता. १७) बैठक होईल.

‘सिंधुरत्नसाठी आराखडा तयार’
रत्नागिरी-सिंधुदुर्गसाठी असलेल्या सिंधुरत्न योजनेसाठी रत्नागिरी जिल्ह्याचा आराखडा तयार केला आहे. त्याचे सादरीकरण समितीचे अध्यक्ष दीपक केसरकर यांना दिले. पुढील तीन वर्षांचे काय नियोजन आहे, ते दाखविण्यात आले. योजनेअंतर्गत १३५ कोटींना मंजुरी देण्यात आली आहे. ३०० कोटींचा हा आराखडा असून, दरवर्षी १०० कोटींची कामे घेतली जातील. त्यामुळे वैयक्तिक लाभासह अन्य कामांचा यामध्ये समावेश आहे. अधिकाधिक लोकांनी त्याचा फायदा घ्यावा, असे आवाहन सिंह यांनी केले.

‘११ नद्यांचा गाळ काढणार’
‘‘जिल्ह्यात २०२१ ला आलेल्या महापुराच्या पार्श्‍वभूमीवर जिल्ह्यातील ११ नद्यांमधील गाळ काढण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. जिल्हा नियोजनमधून वेगळा, जलसंपदा विभागाचा वेगळा आणि काही सामाजिक संस्थांचा मिळून सुमारे ११ कोटी ३० लाखांचा निधी मिळाला. त्यापैकी ८ कोटी चिपळूणला देण्यात आले आहेत. टप्पा २ मधील गाळ ५ जूनपूर्वी काढण्याचा प्रयत्न आहे,’’ असेही सिंह म्हणाले.