Road Tendernama
कोकण

Raigad : उरण परिसरातील 'त्या' रस्त्याच्या काँक्रिटीकरणासाठी 45 कोटींची मान्यता

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यात दास्तान-दिघोडे आणि रानसाई धरण रस्ता या सहा किलोमीटर मार्गाचे रुंदीकरणासह काँक्रिटीकरण केले जाणार आहे. सार्वजनिक बांधकाम खात्याकडून हॅम योजनेतून या रस्त्याचे काम करण्यात येणार आहे. या कामावर सुमारे ४५ कोटी रुपये खर्च केले जाणार आहेत.

सिडको आणि जेएनपीएच्या अनुषंगाने उरणचा गतीने विकास सुरू आहे. सुरुवातीला उरणच्या पश्चिम भागात मोठ्या प्रमाणात औद्योगीकरणात वाढ होऊन गोदामे वसविण्यात आली. त्‍यानंतर खोपटा पुलाची निर्मिती झाल्‍यानंतर पूर्व विभागात खोपटा, कोप्रोली, कळंबुसरे, चिरनेर, वेश्वी, दिघोडे परिसरात गोदामांचे जाळे विस्तारले आहे. या परिसरात मोठ्या प्रमाणात अवजड वाहतूक वाढल्याने पर्याय म्हणून आणखी एका नव्या पुलाची उभारणी करण्यात आली आहे. तसेच गव्हाण फाटा-खारपाडा रस्त्याचे रुंदीकरण करण्यात आले. मात्र दास्तान-दिघोडे मार्गाचे रुंदीकरण करण्यात आले नव्हते. या मार्गांवरून अवजड वाहतूक मोठ्या प्रमाणात सुरू आहे. या जड वाहनांच्या वाढत्या संख्येमुळे रस्ता वारंवार खराब होऊन खड्डेमय बनला आहे. त्‍यामुळे परिसरात या मार्गावर मोठ्या प्रमाणावर वाहतूक कोंडी होत आहे. त्‍यामुळे या मार्गाचे रुंदीकरण, तसेच काँक्रिटीकरण करावे, अशी मागणी वाहनचालकांसह नागरिकांकडून करण्यात येत होती. या मागणीची दखल स्थानिक राजकीय नेते आणि सार्वजनिक बांधकाम विभागाने घेतल्‍याने अखेर या मार्गाचा कायापालट होणार आहे. रस्‍त्‍याच्‍या रुंदीकरण तसेच काँक्रिटीकरणासाठी ४५ कोटींची प्रशासकीय मंजुरी मिळाली असून आचारसंहितेनंतर टेंडर प्रकिया केली जाणार आहे.

या कामासाठी ४५ कोटी ६ लाख रुपयांची प्रशासकीय मान्यता मिळाली असून निधीच्या तरतुदीनुसार कामाचे टेंडर प्रसिद्ध केले जाणार असल्याचे सार्वजनिक बांधकाम खात्याचे उप अभियंता नरेश पवार यांनी सांगितले.