Chipi Airport Tendernama
कोकण

Kokan : खूशखबर! 1 सप्टेंबरपासून चिपी विमानतळावरून नियमित विमानसेवा सुरु

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : सिंधुदुर्गातील चिपी विमानतळावरील मुंबई ते सिंधुदुर्ग ही विमान सेवा 1 सप्टेंबर पासून नियमित सुरु करणार असल्याचे आश्वासन केंद्रीय नागरी उड्डयन मंत्री ज्योतिरादित्य शिंदे यांनी दिल्याची माहिती सार्वजनिक बांधकाम मंत्री व सिंधुदुर्ग जिल्ह्याचे पालकमंत्री रवींद्र चव्हाण (Ravindra Chavan) यांनी दिली. 

नवी दिल्ली येथील राजीव गांधी भवन येथे झालेल्या बैठकीनंतर मंत्री श्री. चव्हाण यांनी ही माहिती दिली. गेली अनेक महिने चिपी विमानतळावरुन मुंबई ते सिंधुदुर्ग या नियमित विमानसेवेचा प्रश्न प्रलंबित असल्याचे सांगत, प्रत्यक्षरित्या केलेल्या सततच्या पाठपुरावामुळे तसेच यासंदर्भात केंद्रीय मंत्री नारायण राणे यांच्या प्रयत्नाने हा प्रश्न मार्गी लागला आहे. चिपी विमानतळावरून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई अशी विमान प्रवास सेवा सुरु झाली होती. तथापि, कालांतराने ही विमान सेवा अनियमित झाल्यामुळे कोकणवासीयांना तसेच मुंबईकरांना अडचणीचा सामना करावा लागत होता. या पार्श्वभूमीवर केंद्रीय नागरी हवाई वाहतूक मंत्री श्री. शिंदे यांची चिपी विमानतळावरील प्रवासी विमानसेवेसंदर्भात भेट घेतल्याचे त्यांनी सांगितले. या बैठकीत विमानसेवेच्या अडचणीसंदर्भात मंत्री श्री. चव्हाण यांनी मंत्री श्री. शिंदे यांना सविस्तर माहिती दिली. येत्या 19 सप्टेंबर पासून गणेशोत्सव सुरु होत असून याआधी ही प्रवासी विमान सेवा सुरु करण्याची विनंती मंत्री श्री. चव्हाण यांनी या बैठकीत केली. त्यानुसार येत्या 1 सप्टेंबर पासून मुंबई ते सिंधुदुर्ग व सिंधुदुर्ग ते मुंबई ही प्रवासी विमान सेवा चिपी विमानतळावरून नियमितपणे सुरु करण्यात येईल. तसेच दर आठवड्याला ही विमानसेवा सुरु असेल. एअर अलायन्स व इंडिगो या दोन विमान कंपन्यांव्दारे ही विमान सेवा सुरु करण्याचे निर्देश केंद्रीय मंत्र्यांमार्फत विमान कंपन्यांना देण्यात येतील, असे आश्वासनही दिल्याची माहिती मंत्री चव्हाण यांनी दिली.

चिपी विमानतळावरील विमानसेवा पूर्ववत करण्याच्या दृष्टीने मुख्यमंत्री एकनाथ शिंदे, उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस, उपमुख्यमंत्री अजित पवार यांच्याशीही चर्चा करण्यात आली होती. त्यांनीही हा प्रश्न सोडविण्याच्या दृष्टीने मार्गदर्शन केल्याची माहितीही त्‍यांनी दिली. तसेच केंद्रीय मंत्री नारायण राणे यांनीही याबाबत प्रयत्न केल्याचेही मंत्री चव्हाण यांनी सांगितले. आयआरबीने विमान प्राधिकरणाकडून करावयाच्या आवश्यक पूर्तता येत्या ४ दिवसांत पूर्ण करुन देणार असल्याची ग्वाही आयआरबीचे अध्यक्ष तसेच व्यवस्थापकीय संचालक वीरेंद्र म्हैसकर यांचे प्रतिनिधी व एअरपोर्ट संचालक किरणकुमार यांनी दिली. या बैठकीला  केंद्रीय मंत्रालयाचे सचिव राजीव बन्सल, एअर इंडिगो, एअर इंडिया, एअर अलास्काचे वरिष्ठ अधिकारी तसेच आयआरबीचे किरण कुमार उपस्थित होते.