मुंबई (Mumbai) : गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर मुंबई गोवा मार्गाच्या ४२ किलोमीटरचा भाग खुला करण्याचे राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणाचे उद्धिष्ट आहे. येत्या काही दिवसांत पनवेल ते रायगड जिल्ह्यातील कासूपर्यंतची एका बाजूची लेन खुली केली जणार आहे.
मुंबई आणि गोवा यांना जोडण्यासाठी ५५५ किमी लांबीचा महामार्ग तयार करण्याचे काम प्रगतीपथावर आहे. या रस्त्याचे ४६० किमी काम सिंधुदुर्ग जिल्ह्यातील पत्रादेवीपर्यंत करण्यात येणार आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारण रायगड जिल्ह्यातील पनवेल ते इंदापूर हा ८४ किमीचा महामार्ग बांधत आहे. दोन टप्प्यात हे काम पूर्ण केले जाणार आहे. पहिल्या टप्प्यात पनवेल ते कासूपर्यंतच्या ४२ किमी लांबीचे काम केले जाणार आहे. तर दुसऱ्या टप्प्यात कासू ते इंदापूरपर्यंतच्या उर्वरित ४२ किमी लांबीच्या मार्गाचे काम केले जाणार आहे.
गणपतीसाठी कोकणात जाणाऱ्यांसाठी लवकरच पनवेल ते कासूपर्यंतची लेन सुरू केली जाणार आहे. जे एम म्हात्रे इन्फ्रा प्रायव्हेट लिमिटेड हे काम करीत आहे. त्यासाठी कंपनीला १५१ कोटी रुपये देण्यात आले आहेत. तर कल्याण टोल इन्फ्राला नोव्हेंबर २०२२ मध्ये टप्पा दोनचे काम देण्यात आले आहे. राष्ट्रीय महामार्ग प्राधिकारणातील उच्चपदस्थांच्या मतानुसार, सुरुवातीला सुप्रीम टोलवेज प्रायव्हेट लिमिटेडला २०११ मध्ये मुंबई-गोवा महामार्गाच्या संपूर्ण ८४ किमी (पनवेल ते इंदापूर) बांधकामाची वर्कऑर्डर देण्यात आली होती. हे काम २०१४पर्यंत हे काम पूर्ण करण्याचे नियोजन होते. मात्र, भूसंपादनाच्या अडचणी दूर करून देखील आर्थिक अडचणीमुळे हे काम रखडले होते. या कामासाठी कंत्राटदाराला ५५० कोटी रुपयांची आर्थिक सहाय्य देखील देण्यात आले होते. टप्पा क्रमांक एक मधील पनवेल ते कासू या ४२ किमी रस्त्याचे बांधकाम पूर्ण करण्यात आले आहे. तर टप्पा २च्या नियोजित रस्त्याच्या केवळ २० किमी इतकेच काम पूर्ण झाल्याने ते रद्द करून हे काम दुसऱ्या कंत्राटदाराला देण्यात आले होते.
दुसऱ्या कंत्राटदाराने पनवेल ते कासू या ४२ किमी लांबीच्या रस्त्याचे बांधकाम पूर्ण केले असले तरी, या भागात मुसळधार पाऊस पडत असल्याने या रस्त्याचे काँक्रीटीकरण करण्याचा निर्णय घेण्यात आला होता. ४२ किमीच्या पनवेल ते कासू या मार्गाच्या ३२ किमी पट्ट्याचे काम पूर्ण झाले आहे. तर उर्वरित मार्गाचे काम वेगाने पूर्ण करण्यात येत आहे. हे काम गणपतीपूर्वी पूर्ण करण्याचे उद्धिष्ट असल्याची माहिती देण्यात आली.