MTHL MODI Tendernama
कोकण

MTHL : एकीकडे लोकार्पणाची जय्यत तयारी तर दुसरीकडे आंदोलनाचा एल्गार

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याहस्ते येत्या १२ तारखेला शिवडी-न्हावा-शेवा लिंकचे लोकार्पण होणार आहे. मुंबई येथून सुरू झालेला हा सागरी मार्ग रायगड जिल्ह्यातील उरण तालुक्यातील चिर्ले गाव येथे संपणार आहे. मात्र, हा प्रकल्प राबवताना मुंबई महानगर प्रदेश विकास प्राधिकरणाने (एमएमआरडीए) चिर्ले ग्रामपं‌चायत हद्दीतील विकासकामे पूर्ण करण्याचे तसेच बाधितांना आर्थिक नुकसान भरपाई देण्याचे आश्वासन दिले होते. त्या आश्वासनांची पूर्तता झाली नसल्याने चिर्ले ग्रामस्थ जन आंदोलन करणार आहेत.

चिर्ले ग्रामपंचायत हद्दीत तलावाचे सुशोभीकरण, मौजे गावठाण, जिल्हा परिषद रस्ता ते एनएच-४ बी हायवे पर्यंत आरसीसी नाला बांधणे, एमएमआरडीए मधील प्रोजेक्टमध्ये स्थानिकांची नोकरभरती करणे, चिर्ले बाकावली तलाव ते एनएच-४ बी हायवे पर्यंत रस्ता काँक्रीटीकरण करणे, गावठाण स्मशान भूमी ते जाभूळपाडा बसस्टॉप पर्यंत काँक्रीटीकरण, ग्रामपंचायत अंतर्गत गटारे व काँक्रिट रस्ते बनवणे आदी मागण्यांबाबत ग्रामस्थांकडून एमएमआरडीएकडे वेळोवेळी पाठपुरावा केला आहे.

मात्र, प्रशासनाने ग्रामस्थांच्या मागणीची दखल घेतलेली नाही. तसेच राज्य सरकारकडूनही कोणताही सकारात्मक प्रतिसाद मिळाला नसल्याने फसवणूक झाल्याची भावना ग्रामस्थांमध्ये झाली आहे. त्यामुळे या अन्यायाला वाचा फोडण्यासाठी शुक्रवारी (ता.१२) शिवडी-न्हावा-शेवा सागरी मार्गावर मोठे जन आंदोलन करण्यात इशारा जमीन बचाव संघर्ष समिती तसेच विविध सामाजिक संस्था, संघटनांनी दिला आहे.

चिर्ले ग्रुप ग्रामपंचायतीने जनआंदोलन करण्यासंदर्भात प्रशासकीय यंत्रणांशी पत्रव्यवहार केला आहे. आतापर्यंत कोणत्याही शासकीय विभागाने ग्रामस्थांशी संपर्क केलेला नाही. त्यामुळे जोपर्यंत लेखी आश्वासन मिळणार नाही; तोपर्यंत मागे हटणार नाही.
- सुधाकर पाटील, सरपंच, चिर्ले