beach Tendernama
कोकण

समुद्र किनाऱ्यांवरील 'त्या' कामांसाठी लवकरच 70 कोटींचे टेंडर

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : कोकण आपत्ती सौम्यीकरण प्रकल्पांतर्गत वसई तालुक्यासह पालघर जिल्ह्यातील 11 धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांचा नारळ लवकरच फुटणार आहे. या कामांसाठी सुमारे 70 कोटींचा निधी मंजूर झालेला असून त्यासाठी टेंडर प्रक्रिया अल्पावधीतच सुरु करण्यात येणार आहे.

गेल्या काही वर्षांपासून राज्य सरकारकडून कोकणातील समुद्रकिनाऱ्याची धूप थांबवण्यासाठी उपाययोजना केल्या जात आहेत. याचाच एक भाग म्हणून राज्य सरकारकडून धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांसाठी मोठा निधीही मंजूर केला जातो. गेल्या सहा-सात वर्षांमध्ये राज्य सरकारच्यावतीने अर्थसंकल्पात या कामासाठी विशेष आर्थिक तरतूद केली जाते.

लोकसभा निवडणुकीपूर्वी राज्य सरकारने वसई तालुक्यात हे पालघर जिल्ह्यातील 11 धूपप्रतिबंधक बंधाऱ्यांच्या कामांसाठी सुमारे 70 कोटींचा निधी मंजूर केला आहे. मात्र, लोकसभा निवडणुकीच्या आचारसंहितेमुळे या कामाची टेंडर प्रक्रिया रखडली होती, आता निवडणूक आचारसंहिता संपल्याने ही कामे सुरु केली जाणार आहेत. याबाबत जिल्हा प्रशासनाकडून लवकरच टेंडर प्रक्रिया राबविली जाणार आहे. त्यानंतर पालघरसह वसईतील 11 धूप प्रतिबंधक बंधाऱ्यांची कामे मार्गी लागणार असल्याचे पालघर जिल्हाधिकारी कार्यालयाच्या आपत्ती व्यवस्थापन प्राधिकरणाकडून सांगण्यात आले आहे.