मुंबई (Mumbai) : समृद्धी महामार्गाचे काम हे तीन वर्षात होऊ शकते तर कोकणातील मुंबई गोवा राष्ट्रीय महामार्ग बारा वर्षानंतरही पूर्ण होऊ शकत नाही, याबद्दल जाहीर नाराजी माजी मंत्री रामदास कदम यांनी व्यक्त केली आहे. कशेडी बोगदा सुरू झाल्याने कोकणवासियांना दिलासा मिळाला. मात्र मुंबई गोवा महामार्गाचे काम सुरू आहे, त्याबाबत माजी मंत्री रामदास कदम यांनी नाराजी व्यक्त करीत सरकारला घरचा आहेर दिला आहे.
गेले काही दिवस शांत असलेले शिवसेना नेते माजी पर्यावरण मंत्री रामदास कदम यांनी कोकणातील राजकीय स्थिती लोकसभा निवडणुका यापासून ते गेले कित्येक वर्षे रखडलेल्या मुंबई गोवा हायवेपर्यंत अनेक विषयांवर भाष्य केले आहे. रामदास कदम हे स्पष्ट वक्ते आणि आक्रमक वक्तृत्व शैली असलेले नेते म्हणून ओळखले जातात.
समृध्दी महामार्ग तीन वर्षात होऊ शकतो मग मुंबई गोवा महामार्गाचे काम अद्याप पूर्ण का झाले नाही याबाबत मुख्यमंत्री आणि केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांची भेट घेणार असल्याचे सांगून कदम यांनी सरकारच्या कामावर ताशेरे ओढले आहेत. पण भाजपचे मंत्री रवींद्र चव्हाण यांनी आजवर अनेकवेळा या मार्गाची पाहणी केली. त्यामुळे ते चांगले काम करण्याचा प्रयत्न करत आहेत. त्यात त्यांना यश येऊ दे. हा महामार्ग लवकर पूर्ण होऊन दे यासाठी आपल्या शुभेच्छा असल्याचे कदम यांनी सांगितले.
रामदास कदम पुढे म्हणाले की, राज्यातील इतर सर्व रस्ते होतात मग कोकणावर हा अन्याय का याबाबत मला दुःख होते. मुख्यमंत्री यांची मी भेट घेतली आहे. नितीन गडकरी यांची भेट घेणार आहे. महामार्गाचे काम रखडवणाऱ्या ठेकेदार यांच्यावर कारवाई झाली पाहिजे. त्यांनी निष्कृष्ट दर्जाचे काम केले. त्या ठेकेदारांवर कारवाई झाली पाहिजे. त्याला ब्लॅकलिस्ट केलेच पाहिजे, अशी मागणी सुद्धा त्यांनी केली आहे. बांधकाम मंत्री रविंद्र चव्हाण यांनी गणपतीपूर्वी एक लाईन सुरू करू असे सांगितले होते पण ती सुरू झाली का ? नाही ना ? एक लाईन सुरू होण्यास १४ वर्षे लागली आहे. मग दुसरी लाईन सुरू करायला अजुन १४ वर्षे लागणार का? असा सवाल उपस्थित करत त्यांनी सार्वजनिक बांधकाम मंत्र्यांवर निशाणा साधला आहे.