मुंबई (Mumbai) : रायगड जिल्ह्यात सावित्री नदीवरील दासगाव येथील नियोजित पूल तसेच दादली पुलाजवळ होणाऱ्या नवीन पुलाच्या कामासाठी अनुक्रमे ११२ कोटी आणि ३० कोटी रुपयांचे टेंडर दोनवेळा प्रसिद्ध झाले आहे, परंतु कंत्रादारांनी टेंडरकडे पाठ फिरवल्याने बांधकाम विभागाने डोक्याला हात लावला आहे. हे दोन्ही मोठे पूल महाड तालुक्यासोबतच दापोली, खेड, मंडणगड या तालुक्यातील वाहतूक व पर्यटनासाठी उपयुक्त ठरणार आहेत.
सावित्री नदी पात्रामुळे दोन्ही किनाऱ्यावरील शेकडो गावांचे विभाजन झाले आहे. महाबळेश्वर येथे उगम पावणारी सावित्री नदी महाड तालुक्यातून वाहत बाणकोट येथे अरबी समुद्राला मिळते. नदीवर मुंबई-गोवा महामार्गावर राजेवाडी येथे, महाड शहराजवळ दादली येथे तर आंबेत येथे मोठे पूल बांधण्यात आलेले आहेत. शहरातील दादली पूल ते आंबेत पूल हे अंतर २८ किलोमीटर आहे. या दोन्ही गावांतील नागरिकांना महाड येथूनच ये-जा करावी लागते. प्रवासात वेळ व पैसा अधिक खर्च होतो. त्यामुळे सावित्री नदीवर असलेल्या दासगाव येथून पलीकडे गोठे असा पूल बांधला जावा, अशी अनेक वर्षांपासून येथील ग्रामस्थांची मागणी होती. गोठे परिसरातील सव, रावढळ, जुई कुंबळे, तुडील, नरवण, चिंभावे, आदिस्ते तेलंगे, सापे, वामने या परिसरातील गावांना मुंबई महामार्गावरून प्रवास करण्यासाठी महाड येथे यावे लागते. दासगाव हे ऐतिहासिक बंदर असल्याने या ठिकाणी मोठ्या प्रमाणात मासळी बाजार भरतो. दासगाव येथे प्राथमिक आरोग्य केंद्र देखील आहे. त्यामुळे खरेदीसाठी व औषधोपचारासाठी या भागातील ग्रामस्थांना दासगाव जवळ ठिकाण पडते. परंतु नदी ओलांडून येण्यासाठी होडी शिवाय अन्य पर्याय नसल्याने या गावांचा एकमेकांशी संपर्क होऊ शकत नाही.
सध्या मुंबई-गोवा महामार्गाचे चौपदरीकरण झाल्याने दासगाव भागातील गावे विकसित होऊ लागली आहेत. त्याचप्रमाणे नदीच्या पलीकडे असणाऱ्या गोठे परिसरातील खाडीपट्ट्यातून जाणारा म्हाप्रळ मार्ग अंबडवे-राजेवाडी असा आता राष्ट्रीय मार्ग होत असल्याने नदीच्या दोन्ही किनाऱ्यावरून दोन महामार्ग जाणार आहेत. या दोन्ही महामार्गांना जोडण्याचे काम दासगाव पूल करणार आहे. नव्या पुलासाठी ११२ कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे. खाडीपट्ट्यामध्ये सुमारे १०० गावे असून ५० हजार लोकसंख्येला या पुलाचा फायदा होणार आहे. शेती, शिक्षण, रोजगार, वाहतूक, बाजार उलाढाल या सर्वांसाठी हा पूल मोठ्या प्रमाणात उपयुक्त ठरणार आहे. दापोली तसेच मंडणगड मार्गाला जोडणाऱ्या सावित्री नदीवरील दादली पूल १९७९ मध्ये बांधण्यात आला. बारमाही पाण्यामध्ये असणाऱ्या पुलावरून अविरत वाहतूक सुरू असते. दरवर्षी येणाऱ्या पुरामुळे पुलाला धोका निर्माण झाला आहे. अनेकदा पुलावरून पुराचे पाणीही गेले आहे. पुलावरून होणारी वाहतूक, पुलाची गरज या गोष्टींचा विचार करून नवीन पुलाची मागणी झाली होती. त्यानुसार राज्य सरकारकडून ३० कोटी रुपयांचा निधी मंजूर झाला आहे.