Mumbai-Goa Highway Tendernama
कोकण

मुंबई-गोवा 'मृत्यू'मार्ग; दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा, 14 वर्षांत पहिलीच कारवाई

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा महामार्गावरील इंदापूर ते वडपाले या २६.७ किलोमीटर अंतरातील चौपदरीकरणाचे काम निकृष्ट दर्जाचे केल्याने अपघातात अनेकांना प्राण गमवावे लागले. याप्रकरणी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड (Chetak Enterprises Limited) आणि अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनी (APPCO INFRASTRUCTURE LIMITED COMPANY) या दोन ठेकेदारांविरोधात सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. १४ वर्षांनंतर प्रथमच अशा प्रकारची कारवाई करण्यात आली आहे.

माणगाव पोलिसांत गुरुवारी चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड कंपनीचे व्यवस्थापकीय संचालक हुकमीचंद जैन, जनरल मॅनेजर अवधेशकुमार सिंह, प्रकल्प समन्वयक अभियंता सुजित कावळे आदींवर गुन्हा दाखल करण्यात आला. कावळे यांना अटकही करण्यात आली. मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी अलीकडेच मुंबई-गोवा महामार्गाचा पाहणी दौरा केला होता. त्यावेळी काम पूर्ण न करणारे, पळून जाणाऱ्या कंत्राटदारांवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करण्याचे आदेश दिले होते. त्यानुसार माणगाव पोलिसांनी कंत्राटदार कंपनीवर कारवाईचा बडगा उगारला आहे.

या कंत्राटदाराने काम निकृष्ट दर्जाचे केलेच शिवाय ते मुदतीत पूर्ण केले नाही. या प्रकरणी ठेकेदारांना तीनवेळा नोटिसाही बजावण्यात आल्या होत्या. मे. चेतक एंटरप्रायझेस आणि अॅपको इन्फ्रास्टक्चर जॉइंट व्हेचरमध्ये माणगाव पोलीस ठाणे हद्दीतील इंदापूर ते वीर टप्प्यातील काम करत आहे. त्यातील माणगाव पोलीस ठाणे हद्दीत इंदापूर ते वडपाले या 26.7 किलोमीटर महामार्गाचे चौपरीकरणाचे काम आहे. डिसेंबर 2017 पासून हे काम सुरू झाले होते. तेव्हापासून त्यांनी कामाला वेग दिला नाही, कामाचा दर्जा सांभाळला नाही. त्यामुळे महामार्गावर या भागात खड्डे पडले आहेत.

रायगड हद्दीतील इंदापूर ते वडपाले या २६.७ किलोमीटर अंतरातील महामार्ग चौपदरीकरणाचे काम केंद्र शासनाकडून मागविण्यात आलेल्या टेंडरद्वारे चेतक एंटरप्राइजेस लिमिटेड आणि अॅपको इन्फ्रास्ट्रक्चर लिमिटेड या संयुक्त कंपन्यांना १ जून २०१७ रोजी मंजूर केले. त्यानुसार १८ डिसेंबर २०१७ पासून काम सुरू केले. या मार्गाचे काम दोन वर्षांत पूर्ण करण्याचे करारात म्हटले होते. मात्र, मुदत संपूनही काम पूर्ण झाले नाही. तरीही शासनाने मुदत वाढवून दिली होती. अजूनही हे काम अपूर्णावस्थेतच आहे. या टप्प्यातील महामार्गाच्या कामात झालेल्या हलगर्जीमुळे २०२० पासून आतापर्यंत १७० मोटार अपघातांत ९७ जणांना प्राणास मुकावे लागले. तसेच २०८ प्रवाशांना लहान, मोठ्या अपघातात गंभीर व किरकोळ स्वरुपाच्या दुखापती झाल्या आहेत. अपघातग्रस्त वाहनांचेही मोठे नुकसान झाले आहे. गेल्या १७ वर्षांपासून मुंबई गोवा महामार्गाचे काम रखडले आहे.