अलिबाग (Alibaug) : अनेक वर्षांपासून पर्यटकांसह प्रवाशांना आगरदांडा खाडी पुलाची प्रतीक्षा आहे. निवडणुकांच्या तोंडावर मतदारांना आकर्षित करण्यासाठी पुलाचे टेंडर प्रसिद्ध करण्यात आले असून, हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने दिलेले कमीत कमी रकमेचे टेंडर मंजूर करण्यात आले आहे. पुलाचे काम काही दिवसातच सुरू होणार असून आगरदांडा-दिघीचा प्रवास सुसाट होणार असल्याचे स्वप्न दाखवले जात आहे.
आगरदांडा ते दिघीला जाण्यासाठी फेरी बोटीद्वारे जावे लागते. पावसाळ्यात ही फेरी बोट बंद असते. याला पर्याय म्हणून मांदाड पुलावरून प्रवास करत पलीकडे तळा, म्हसळा तालुक्यात जावे लागते. यासाठी खूप मोठा वळसा घालावा लागतो. प्रवाशांसह पर्यटकांचा मार्ग सुकर व्हावा, यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने आगरदांडा खाडी पूल उभारणीला हिरवा कंदील दाखवला आहे. महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने नुकतीच ४.३ किलोमीटर आगरदांडा खाडी पुलासाठी टेंडर उघडले होते. हिंदुस्थान कन्स्ट्रक्शन कंपनीने ११८७.७६ कोटी आणि ॲफकॉन कंपनीने १२४९.४२ कोटी रुपयांची बोली लावली होती. हिंदुस्थान कंपनीने ॲफकॉनपेक्षा ६१.६६ कोटी रुपयांनी सर्वात कमी बोली लावली होती. रायगड जिल्ह्यातील मुरूड तालुक्यातील टोकेखार, म्हसळा तालुक्यातील तुरुंबडी यांना जोडणारा हा पूल असेल.
बांधकामासाठी ३० महिन्यांची मुदत
जिल्ह्यातील राज्य महामार्ग-४ (रेवस - रेड्डी जलमार्ग) वरील हा दुपदरी पूल महाराष्ट्र सरकारच्या मंत्रिमंडळाने मंजूर केला होता. तो अदाणी पोर्ट्स आणि दिघी बंदर प्रकल्पाच्या पूर्वेस बांधला जाईल. यासाठी एकूण ८०९.८९ कोटींचे कंत्राट असून ३० महिन्यांच्या कालावधीत बांधकाम पूर्ण करण्याची मुदत आहे. त्यामध्ये अतिरिक्त दहा वर्षे देखभाल दुरुस्तीचा कालावधीत राहणार आहे.