Konkan Costal Highway Tendernama
कोकण

मुंबई ते सिंधुदुर्ग हायवे : कुंडलिका, जयगड खाडीपुलांचे टेंडर 'अशोका बिल्डकॉन'लाच; 2150 कोटींचे बजेट

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या (एमएसआरडीसी) रेवस-रेड्डी या सागरी महामार्गावर असलेल्या कुंडलिका आणि जयगड येथील दोन नवीन पुलांच्या बांधकामासाठी सर्वात कमी बोलीदार म्हणून 'अशोका बिल्डकॉन' ही कंपनी पात्र ठरली आहे. कंपनीने जयगड खाडी पुलासाठी ७९४.८५ कोटी आणि कुंडलिका खाडी पुलासाठी १३५७.८७ कोटी रुपयांचे टेंडर भरले आहे. लवकरच या दोन्ही खाडीपुलांच्या कामाचा नारळ फोडण्याचे एमएसआरडीसीचे नियोजन आहे.

2 लेन असलेला 4.4 किमी लांबीचा जयगड खाडी पूल रत्नागिरी जिल्ह्यातील जयगड नदीवरील तवसल आणि संदेलावगण यांना जोडेल तर रायगड जिल्ह्यातील कुंडलिका नदीवरील रेवदंडा आणि साळव यांना 2 लेन असलेला 3.8 किमी लांबीचा कुंडलिका पूल जोडेल या पुलाला रेवदंडा खाडी पूल असेही म्हटले जाते. मुंबई ते सिंधुदुर्ग प्रवास वेगवान आणि सुकर करण्यासाठी महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाने (एमएसआरडीसी) हा सागरी किनारा मार्ग प्रकल्प हाती घेतला आहे. हा महामार्ग २०१७ मध्ये राष्ट्रीय महामार्ग मंडळाकडे तर २३ ऑक्‍टोबर २०२० मध्ये महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाकडे वर्ग करण्यात आला. हा महामार्ग कोकणातील किनाऱ्यालगतच्या अरुंद गावठाणातून जाणार आहे. कोकणातील रायगड, रत्नागिरी आणि सिंधुदुर्ग जिल्ह्यांतून हा सागरी मार्ग जाणार आहे. रायगड जिल्ह्यातील रेवस सागरी मार्गाची सुरुवात होणार असून सिंधुदुर्ग जिल्ह्यातील गोवा सीमेवर असलेल्या रेड्डी येथे शेवट होणार आहे.

महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळाच्या माध्यमातून रस्त्याचे काम सुरू करण्यात येणार आहे. नव्याने तयार केलेल्या ४९८ किलोमीटर लांबीच्या आराखड्यात काही रस्‍त्‍यांचे चौपदरीकरण केले जाणार आहे. तर उर्वरित मार्ग दुपदरी आहेत. सध्या अस्तित्वात असलेल्या रस्त्यांचे रुंदीकरण आणि सुधारणा करून हा मार्ग विकसित केला जाणार आहे. ३३ प्रमुख गावे आणि शहरांच्या ठिकाणी बाह्यवळण रस्ते तयार केले जाणार आहेत.एमएसआरडीसीने रेवस ते रेड्डी या ४४७ किमीच्या सागरी किनारा मार्गावर आठ खाडीपूल बांधण्याचे नियोजन केले आहे. महाराष्ट्र रस्ते विकास महामंडळाने उपरोक्त दोन्ही पुलांच्या बांधकामासाठी मार्च २०२४मध्ये तीन वर्षांच्या बांधकाम मुदतीसह टेंडर मागवली होती. कमर्शियल टेंडरमध्ये सर्वात कमी बोलीदार म्हणून 'अशोका बिल्डकॉन' ही कंपनी पात्र ठरली आहे. टेंडर अंतिम करून कंत्राटदाराची नियुक्ती केली जाणार आहे. त्यानंतर पुलाच्या कामासाठी तीन वर्षांचा कालावधी अपेक्षित आहे.

या पुलांचे होणार काम -
कुंडलिका खाडीवर रेवदांडा ते साळव खाडी पूल - ३.८ किमी (पोचमार्गासह)
जयगड खाडीवरील तवसळ ते जयगड खाडी पूल - ४.४ किमी (पोचमार्गासह)