अलिबाग (Alibagh) : अलिबाग तालुक्यातील (जि. रायगड) चौल बागमळा व मिळकतखार येथील नैसर्गिक खाड्या अनधिकृत माती भराव टाकून बुजविण्यात येत असल्याबाबत रायगड जिल्हा प्रशासनाकडे अनेक तक्रारी करण्यात आलेल्या आहेत. मात्र या तक्रारींबाबत कोणतीच ठोस कारवाई होत नसल्याने लोकांमध्ये संतापाची भावना आहे.
पावसाळा सुरू झाला असून, चौल बागमळा व मिळकतखार सारखे अनधिकृत भरावाचे प्रकार अलिबाग तालुक्यात अनेक ठिकाणी झाले आहेत. त्यामुळे ठिकठिकाणी पाणी तुंबून ते रस्त्यावर तसेच वस्त्यांमध्ये घुसून लोकांना त्रास सहन करावा लागत आहे. राज्याचे नवनिर्वाचीत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी आपत्ती व्यवस्थापनाची बैठक घेवून तक्रारी प्रलंबीत रहाणार नाहीत, तसेच जिवीतहानी होणार नाही, याची दक्षता घेण्याचे आदेश जिल्हाधिकाऱ्यांना दिले आहेत. त्यामुळे या भरावांमुळे पावसाळ्यात जर काही जिवीतहानी झाली तर त्यास जिल्हा प्रशासन जबाबदार राहील, असा इशारा सामाजिक कार्यकर्ते संजय सावंत यांनी दिला आहे.
अलिबाग तालुक्यातील निसर्गसौंदर्याने बहरलेल्या नागाव-चौल परिसरातील बागमळा खाडी उद्योगपती हिरानंदानी यांच्या पर्यटन उद्योगासाठी माती भराव टाकून बुजविण्यात येत असल्याचा धक्कादायक प्रकार ग्रामस्थांनी उघडकीस आनल्यानंतर बेकायदा भराव करण्यात येत असलेली जमिन ही चौल-आचार्य खारभूमी योजनेच्या लाभक्षेत्रामधील असल्याचा प्रकार संजय सावंत यांनी शासनाकडे केलेल्या तक्रारीमधून उघड केला होता. बेकायदेशीर भराव करणाऱ्या उद्योगपतींकडून सिंचन पुर्नःस्थापना खर्च म्हणून हेक्टरी 2 लाख 37 हजार रुपयांप्रमाणे 597 हेक्टरसाठी 14 कोटी 14 लाख 89 हजार रुपये शासनाकडे भरले नसल्यास ती रक्कम व बेकायदेशीर भरावांचा कोट्यवधी रुपयांचा दंड महसुलाची थकबाकी म्हणून तात्काळ वसूल करण्यात यावी, अशी मागणी सावंत यांनी लेखी निवेदनाद्वारे केली होती.
अलिबाग प्रांत यांनी खारभूमी विभागाकडून अहवाल मागविला होता. परंतु अनधिकृत भरावाबाबत संबधीत कंपनीवर अद्याप कोणतीच कारवाई केली नसल्याचे म्हणणे सावंत यांनी मांडले आहे. असाच अनधिकृत भरावाचा प्रकार तालुक्यातील मिळकतखार येथे सुरू असल्याबाबत तक्रारी ग्रामस्थांनी जिल्हा प्रशासनाकडे केल्या आहेत. त्याबाबतही कोणतीच ठोस कारवाई करण्यात आलेली नाही. विशेष म्हणजे मिळकतखार येथील जमीनही खारभूमी क्षेत्रामधील आहे. रेवस बंदराजवळील मिळकतखार, मळा, आवळीपाडा व बागदांडा या गावांमधून जाणारी कांदळवनांनी बहरलेली खाडी भराव करून बुजविण्याचे काम राजरोजपणे सुरू असून, या प्रकारामुळे मुंबईला कोकणासोबत जोडणारे प्रसिध्द रेवस बंदर निकामी होण्यासोबतच मिळकतखार, मळा, आवळीपाडा व बागदांडा ही गावे पाण्याखाली जाण्याचा धोका निर्माण होऊ शकतो.
ही बाब लक्षात आत्यानंतर मिळकतखार ग्रामस्थांनी मोठ्या प्रमाणात आवाज उठवून तक्रारी जिल्हाधिकारी, प्रांत अधिकारी, तहसिलदार यांच्याकडे केल्या आहेत. पावसाळा सुरू झाला असून पाणी समुद्राला मिळण्याचे नैसर्गिक स्त्रोत भरावकरून बुजविले असल्याने अनेक ठिकाणी पुराच्या पाण्यामुळे नागरिकांच्या जिविताला धोका असल्याचा इशाराही सावंत यांनी दिला आहे.