Samruddhi Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : समृद्धीच्या कामामुळे झालेल्या नुकसानीच्या भरपाईसाठी महिला आक्रमक

टेंडरनामा ब्युरो

नाशिक (Nashik) : इगतपुरी तालुक्यात सध्या समृद्धी महामार्ग उभारण्याचे काम सुरू आहे. मात्र, या महामार्गासाठी करण्यात येत असलेल्या सुरुंग स्फोटांमुळे धामणी येथील ९६ घरांना तडे गेले आहेत. याबाबत स्थानिक रहिवाशांनी तक्रारी करूनही दखल घेतली नाही. यामुळे येथील स्थानिक महिला दीड महिन्यांपासून आंदोलन करीत आहेत. त्याचीही दखल न घेतल्याने अखेर या आक्रमक महिलांनी समृद्धीचे सुरुंग स्फोटांचे काम बंद पाडले आहे. येथील काम अंतिम टप्प्यात असून काम पूर्ण झाल्यानंतर भरपाई मिळणार नाही, या भीतीतून स्थानिक महिला आक्रमक झाल्या आहेत.

इगतपुरी तालुक्यात धामणी येथे नागपूर-मुंबई समृद्धी महामार्गाच्या कामासाठी मोठ्याप्रमाणात ब्लास्टिंग केले जात आहे. हे काम गेल्या तीन वर्षांपासून सुरू असून सततच्या ब्लास्टिंगमुळे परिसरातील ९६ घरांना मोठ्याप्रमाणात तडे जाऊन पडझड झाली आहे. तसेच शेताच्या पाइपलाइनचे नुकसान झाले आहे. नुकसानीची भरपाई मिळावी म्हणून काँग्रेसचे उत्तम भोसले व धनंजय भोसले यांच्या नेतृत्वाखाली धामणीतील ९६ घरातील महिलांनी १६ ऑक्टोबरपासून उपोषणाला सुरुवात केली होती. समृद्धीचे काम करणाऱ्या ठेकेदार कंपनीने नुकसान झालेल्या सर्व घरांचे सर्वे करून मूल्यांकन केले आहे.

मात्र, अनेकवेळा मागणी करून ठेकेदार कंपनी मूल्यांकन दाखवत नसल्याने संतप्त झालेल्या महिलांनी अखेर काम बंद पाडले आहे. संबंधित कंपनीकडून घरांची नुकसान भरपाई मिळत नाही व समृद्धी लगतचे गावातील उपरस्ते दुरुस्त करून मिळत नाही, तोपर्यंत उपोषण आंदोलन मागे घेणार नाही, असा पवित्रा या महिलांनी घेतला आहे. उपोषण सुरू झाल्यानंतर मधल्या काळात  संबंधित कंपनीने ब्लास्टींगमुळे नुकसान झालेल्या घरांचा सर्वे केला. मात्र, नुकसान भरपाई देण्यास विलंब केला जात आहे. यामुळे धामणी येथील महिला पुन्हा आक्रमक झाल्या असून पुन्हा काम बंद पाडले. येत्या आठ दिवसांत भरपाई न मिळाल्यास रास्ता रोको करून तीव्र आंदोलन करण्याचा इशारा दिला आहे.