Alibaug Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : रायगड सिव्हील हॉस्पिटल सलाईनवर तर रुग्णांचे आरोग्य...

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : अलिबाग (Aligaug) येथील जिल्हा सामान्य रुग्णालयाच्या इमारतीची दुरवस्‍था झाली आहे. भिंतीना ठिकठिकाणी तडे गेले आहेत. स्लॅब पडण्याच्या घटना वारंवार घडत आहेत. रुग्णालय परिसरात गवत-झुडपे वाढली असून सांडपाणी साचते आहे. त्यामुळे जिल्हा रुग्णालयातील कर्मचाऱ्यांसह रुग्ण व त्यांच्या नातेवाईकांचे आरोग्य धोक्यात आले असून जिल्हा सामान्य रुग्णालयच सलाईनवर असल्याचे चित्र आहे.

अलिबागमधील जिल्हा सामान्य रुग्णालयाची इमारत ३१ वर्षे जुनी आहे. या ठिकाणी अपघात विभाग, डायलिसिस सेंटर, एक्स-रे विभाग असून सुमारे २५० खाटांची व्यवस्‍था आहे. दिवसाला दीड हजारांहून अधिक रुग्‍ण याठिकाणी विविध उपचारांसाठी येतात. मात्र त्‍यांच्या सुविधाही पुरवल्‍या जात नाहीत. ऑक्‍सिजन पुरवठा मुबलक प्रमाणात व्हावा यासाठी रुग्णालयासाठी चार महिन्यांपूर्वी कॉंप्रेसर मशीन आणली, मात्र ती शवविच्छेदन कक्षाच्या आवारात धूळ खात पडली आहे. तसेच एका मशिनला प्लास्‍टिकचा कागद बांधून उघड्यावरच ठेवली आहे. सांडपाणी निचरा होण्यासाठी योग्य नियोजन नसल्याने ते रुग्‍णालय परिसरात साचत असल्‍याने डासांचा प्रादुर्भाव वाढला आहे. शिवाय दुर्गंधी पसरत असल्‍याने आरोग्याचा प्रश्न गंभीर झाला आहे. जिल्हा रुग्णालयाच्या आवारातील शवविच्छेदन कक्षाकडे जाणाऱ्या मार्गावर मोठा खड्‌डा पडला असून त्‍यामुळे अपघाताची शक्‍यता वाढली आहे.

जिल्हा सामान्य रुग्णालयात अनेक रुग्णवाहिका बंदस्थितीत आहेत. या रुग्णवाहिकांचा लिलाव करण्यास प्रशासन उदासीन ठरत असल्याने त्याचा नाहक त्रास ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांसह रुग्णांच्या नातेवाईकांना होत आहे. याबाबत संबंधित विभागातील अधिकाऱ्यांशी संपर्क साधला असता, बंद असलेल्या रुग्णवाहिका ठेवण्यास जागा नसल्याने याठिकाणी ठेवल्‍याचे सांगण्यात आले. रुग्णालयाच्या आवारात काही खासगी रुग्णवाहिका अन्य वाहनांचे अतिक्रमण झाले असून त्याकडे रुग्‍णालय प्रशासनाचे दुर्लक्ष होत असल्याची चर्चा नागरिकांकडून होत आहे. जिल्हा रुग्णालयाची इमारत धोकादायक असल्याने स्ट्रक्चर ऑडिट करण्यात आले होते. त्यामध्ये इमारत दुरुस्त करण्यायोग्य असल्याचा अहवाल संबंधित विभागाकडून देण्यात आला. त्यानुसार इमारतीच्या दुरुस्तीसाठी चार कोटीपेक्षा अधिक निधी जिल्हा नियोजन समितीकडून मंजूर करण्यात आला असून दुरुस्तीचे कामही सुरू झाले आहे. मात्र अनेक दिवस उलटूनही कामे अपूर्ण असल्‍याने पावसाळ्यात दुर्घटना होण्याची भीती व्यक्‍त होत आहे.

जिल्हा रुग्णालयातील दयनीय अवस्थेबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाशी वारंवार पत्रव्यवहार करण्यात आला आहे. मात्र त्यांच्याकडून पत्राचे उत्तर दिले जात नाही. या विभागाने तातडीने इमारतीच्या दुरुस्तीचे व समस्यांचे निराकरण करणे अपेक्षित आहे.
- डॉ. सुहास माने, शल्यचिकित्सक, रायगड जिल्हा सामान्य रुग्णालय