Chandrapur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'ताडोबा-अंधारी' लगतचा 'हा' रस्ता का बनलाय जीवघेणा?

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : मूल तालुक्यातील ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाला लागून असलेला जानाळा-फुलझरी रस्ता पूर्णतः उखडला आहे. मागील काही वर्षांपूर्वी कंत्राटदाराने रस्त्याचे बांधकाम केले होते. मात्र, अल्पावधीतच रस्ता उखडून संपूर्ण रस्त्यावर गिट्टी पसरली आहे. त्यामुळे रस्त्याने प्रवास करताना नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे. मात्र, याकडे जिल्हा परिषद बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे.

मूल शहरापासून 13 किलोमीटर अंतरावर असलेल्या फुलझरी गावासभोवताली ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्प बफरझोन क्षेत्र लागून असून, येथे अत्यावश्यक सुविधांचा अभाव आहे. त्यामुळे गावातील नागरिकांना तालुक्याच्या ठिकाणी यावे लागते. मात्र, मूलकडे जाणारा फुलझरी रस्त्यावर अशी गिट्टी पसरली असल्याने जानाळा रस्ता पूर्णतः उखडलेला असल्याने प्रवास करताना येथील नागरिकांना जीव मुठीत घेऊन प्रवास करावा लागत आहे.

अनेकदा किरकोळ अपघात झाले आहेत. मोठा अपघात होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे रस्त्याची दुरुस्ती करण्यात यावी, यासाठी अनेकदा जिल्हा परिषदेच्या बांधकाम विभागाला निवेदन दिले. मात्र, बांधकाम विभाग दुर्लक्ष करीत असल्याने चार महिन्यांपूर्वी गावातील नागरिकांनी एकत्र येत श्रमदानातून रस्त्यावर मुरूम टाकून रस्त्याची दुरुस्ती केली. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या जिल्हा परिषद बांधकाम विभागाला जाग येत नाही, अशा संतप्त प्रतिक्रिया येथील नागरिक व्यक्त करीत आहेत.

फुलझरी गावासभोवतालचे संपूर्ण क्षेत्र ताडोबा अंधारी व्याघ्र प्रकल्पाच्या बफरझोन क्षेत्राने व्यापले आहे. त्यामुळे येथे हिंस्र वन्यप्राण्यांचा वावर मोठ्या प्रमाणात आहे. जंगलातून प्रवास करताना मानव-वन्यप्राणी संघर्ष होऊन जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. त्यामुळे या रस्त्याची दुरुस्ती करणे गरजेचे आहे.

या संबंधित जिल्हा परिषद बांधकाम उपविभाग मूल उपविभागीय अभियंता आर. पी. गेडाम यांना विचारले असता त्यांनी सांगितले की, रस्त्याची पाहणी करून रस्ता दुरुस्तीसाठी वरिष्ठ कार्यालयाकडे प्रस्ताव पाठविण्यात येईल.