औरंगाबाद (Aurangabad) : सिडकोच्या विकास आराखड्यात समावेश असलेला सविताराज काॅम्पलेक्स ते वसंतराव नाईक महाविद्यालय हद्दीतून जालना रस्त्याला जोडणारा सर्व्हिस रोड तयार करण्यात आला. मात्र या रस्त्याला कचराडेपोचे स्वरुप आले आहे. कचऱ्यामुळे शोध घेऊनही रस्ता सापडू नये, अशी परिस्थिती आहे. हा कचरा हटवून रस्ता तयार करण्याची नागरिकांची मागणी आहे, त्यासाठी त्यांनी महापालिकेला वर्षानुवर्षे पत्रव्यवहारही केला आहे. मात्र झोपेचे सोंग घेतलेल्या अधिकाऱ्यांना अद्याप जाग आलेली नाही.
सिडकोच्या १९७२च्या विकास आराखड्यानुसार सविताराज काॅम्पलेक्स ते वसंतराव नाईक महाविद्यालय हद्दीतून जालना रस्त्याला जोडणारा सर्व्हिस रोड तयार करण्यात आला. मात्र या परिसरातील हाॅटेल व्यावसायिक आणि नागरिकांनी या रस्त्याला कचराडेपोचे स्वरुप आणले आहे. त्यामुळे या रस्त्याचे कामही प्रलंबित आहे.
मागील ५० वर्षे सिडको भागात राहणारे नागरिक विकास आराखड्यातील रस्त्यावर टाकण्यात आलेला कचरा हटवून चांगला रस्ता तयार करण्याच्या मागणीसाठी महापालिकेला पत्रव्यवहार करत आहेत. पालिके मात्र याबाबत ठिम्म आहे. आता सिडको आणि पालिकेमध्ये समन्वयाचा अभाव असल्याने हा रस्ता कायमचा गमवावा लागणार असल्याची नागरिकांना भीती आहे.
सिडकोच्या १९७२च्या पहिल्या विकास आराखड्यात कॅनाॅट प्लेस ते जालना रोड या वसंतराव नाईक महाविद्यालय आणि सविताराज काॅम्पलेक्सला जोडणाऱ्या ३० फुटी रस्त्याची तरतूद करण्यात आली. सिडकोच्या विकास आराखड्यात या रस्त्याची रुंदी ३० फूट दाखवण्यात आली आहे. प्रत्यक्षात महाविद्यालयाने निम्मा रस्ता गिळंकृत करत त्यावर थेट सुरक्षा भिंत बांधल्याने आता रस्ता केवळ १५ फुटाचा शिल्लक आहे.
महापालिकेने नुकतेच शासन अनुदानातील रकमेतून कॅनाॅट प्लेस भागातील ४१ कोटी रूपये खर्च करून जवळपास साडेतीन हजार मीटरचे डांबरी रस्ते तयार केलेत. मात्र विकास आराखड्यातील या एकाच रस्त्याच्या कामाकडे का कानाडोळा करण्यात आला, या प्रश्नाचे उत्तर महानगरपालिका अधिकारी द्यायला तयार नाहीत. या संपूर्ण रस्त्यावर कचराकोंडी झाल्याने रस्ता कचर्याच्या ढिगात गायब झाला आहे.
मध्यंतरी नाईक महाविद्यालयाला सुरक्षाभिंतीवरून महापालिकेने नोटीस बजावली होती, अशी या भागात चर्चा आहे. नोटिसीनंतर महाविद्यालयाने सुरक्षा भिंतीआड असलेली कर्मचारी निवासस्थाने पाडली. मात्र भिंत तसीच ठेवण्यात आली आहे. या संदर्भात विचारणा केली असता महापालिका अधिकारी आम्हाला काहीच माहित नसल्याचे बेजबाबदारपणे उत्तर देत आहेत. दीडशे कोटीच्या योजनेत हा रस्ता देखील तयार करायचा होता. पण त्यावर कचराच कचरा असल्याने पालिकेच्या रस्ते बांधकाम विभागाने रस्त्यावरील कचरा हटवण्याबाबत प्रभाग अधिकाऱ्याला पत्र दिल्याचे तपासात उघड झाले आहे. मात्र काही मुठभर राजकीय लोकांचा दबाब असल्याने प्रभाग अधिकाऱ्याने कचरा हटवण्याचे धाडस न दाखवल्याने येथे रस्ता झाला नसल्याची तक्रार रहिवाशांनी पालिकेकडे केली आहे. वार्ड अभियंत्याने पत्र दिल्यानंतर देखील विकास आराखड्यातील मंजूर रस्त्यावरील कचऱ्याचे ढिग 'जैसे थे' आहेत.
दीड किमीचा वळसा
रस्ता न झाल्यामुळे सिडकोतील ज्येष्ठ नागरिक, लहान मुले यांना दररोज दीड किमीचा वळसा घालून कॅनाॅट प्लेसमध्ये खरेदीसाठी यावे लागते. त्यामुळे सिडकोच्या विकास आराखड्यात मंजूर असलेला या रस्त्याचे काम करण्यास का विलंब केला जात आहे, असा सवाल नागरिक करत आहेत.