Morshi Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : मोर्शीतील 'या' रस्त्याच्या कामाला दर्जाच नाही; कोट्यवधी पाण्यात

टेंडरनामा ब्युरो

मोर्शी : मोर्शी तालुक्यातील दापोरी सालबर्डी रस्त्याचे काम कोट्यवधीचा खर्चा करून करण्यात आले. तीर्थक्षेत्र आणि संत्रा उद्योगाला जोडणाऱ्या या महत्त्वाच्या रस्त्याच्या कामाचा दर्जा निकृष्ट असल्याचा आरोप दापोरी ग्रामस्थांनी केला आहे.

वेलस्पन इन्फ्रा प्रा. लिमिटेड कंपनी व संबंधित बांधकाम विभागाच्या अधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे 6 वर्षानंतरही काम आताही अपूर्णच आहे. त्यामुळे लोकांना अनेक समस्यांचा सामना करावा लागत आहे. तर पावसाळ्यात रस्ता पूर्ण चिखलाने भरून जातो, त्यामुळे नागरिकांना त्रास सहन करावा लागतो.

रस्त्याच्या निकृष्ट कामामुळे दापोरी गावात अनेक गंभीर समस्या निर्माण झाल्या आहेत. कंपनी आणि दोषी अधिकाऱ्यांविरुद्ध 8 दिवसांत कारवाई करून अपूर्ण काम सुरू न केल्यास तीव्र आंदोलन करण्याचा इशारा ग्रामीण रूपेश वाळके यांनी दिला आहे.

या रस्त्यावर पावसाचे पाणी नागरिकांच्या घरात घुसून नुकसान होण्याची शक्यता आहे. तसेच रस्त्यालगत पेव्हिंग ब्लॉक बसविण्याचे काम कंपनी करत नसल्याने गावाकडे जाणारे महत्त्वाचे रस्ते बंद आहेत.

रस्त्याच्या कडेला नाल्यातील प्रवेश रस्त्याचे बांधकाम पूर्ण न झाल्याने ग्रामस्थांना गावात जाणे कठीण झाले आहे. तसेच अपघाताचा धोका कायम आहे. याबाबत सार्वजनिक बांधकाम विभागाचे कार्यकारी अभियंता आणि कंत्राटदार वेलस्पन कंपनीला अनेकदा कळवूनही कारवाई झाली नाही. या रस्त्याच्या कामासाठी कोट्यवधी रुपये खर्च करण्यात आले आहेत.