Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : सर्व शिक्षा अभियानाच्या इमारतीलाच लागली गळती?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : कळमेश्वर तालुक्यातील शालेय शिक्षणाचा कारभार चालविणाऱ्या सर्व शिक्षा अभियानाच्या इमारतीला गळती लागली असून, स्लॅबला व भिंतींना तडे गेले आहेत. या इमारतीत बसून शासकीय काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या जीविताला धोका निर्माण झाला आहे; मात्र पंचायत समिती व जिल्हा परिषदेचे प्रशासन व लोकप्रतिनिधी यांचे या गंभीर बाबीकडे दुर्लक्ष आहे.

सर्व शिक्षा अभियान हे प्राथमिक शिक्षणाच्या सार्वत्रिकरणाचा महत्त्वाचा कार्यक्रम म्हणून राबविला जात आहे. सर्व शिक्षा अभियानाचे मुख्य ध्येय पायाभूत सुविधा टिकवणे आणि वाढवणे, लिंगदरी कमी करणे आणि शिक्षणातील सामाजिक दरी कमी करून विद्यार्थ्याची अध्ययन समृद्धी वाढविणे, तसेच नवीन शाळा उघडणे, पर्याप्त शिक्षण सुविधा, शाळा बांधकाम, शाळा खोली बांधकाम, स्वच्छतागृह व पिण्याच्या पाण्याची सुविधा, शिक्षक प्रशिक्षण, विद्यार्थ्यांना पाठ्यपुस्तके वाटप आदी असून, या इमारतीतूनच हे नवनवीन उपक्रम राबवले जातात. मात्र ही इमारतच जीर्णावस्थेत आहे.

पंचायत समितीची भव्यदिव्य इमारत असून, यात शिक्षण विभागासाठी एका कार्यालयापुरती व्यवस्था करून देण्यात आली आहे. त्याचप्रमाणे इमारतीच्या पहिल्या माळ्यावर सर्व शिक्षा अभियानांतर्गत काम करणाऱ्या कर्मचाऱ्यांसाठी जागा उपलब्ध करून देण्यात यावी, अशी मागणी होत आहे.

दररोज गळते पाणी, निघतात पोपडे

या उपक्रमांसाठी 8 विषयतज्ज्ञ, 5 मोबाईल शिक्षक, 1 ऑपरेटर, 1 अभियंता, 1 रोखपाल, 6 माध्यमिक विषयतज्ज्ञ अशा 22 कर्मचाऱ्यांची नेमणूक करण्यात आली आहे. कारभार चालवण्यासाठी पंचायत समिती परिसरात समग्र शिक्षा गटसाधन केंद्राची इमारत बांधण्यात आली होती. सध्या ही इमारत पूर्णत: जीर्ण झाली असून पावसाळ्याच्या दिवसात स्लॅबमधून पाणी गळत आहे तर भिंतींना ओलावा आला आहे. तसेच स्लॅबचे सिमेंट कॉंक्रिट सुटले असून तुकडे खाली पडतात तर खिडक्यांचे सज्जे पूर्णतः मोडकळीस आले आहेत.

साहित्य खराब होण्याची शक्यता

कार्यालयीन कामकाजाकरिता संगणक लावण्यात आले असून स्लॅबमधून गळणाच्या पाण्यामुळे ते खराब होण्याची चिन्हे आहेत. वीजपुरवठ्याची फिटिंग खराब झाली असून, स्विचबोर्ड तुटल्या आहेत. यामुळे विजेचा धक्का लागून जीवितहानी होण्याची शक्यता नाकारता येत नाही. सर्व शिक्षा अभियानांतर्गत वर्ग एक ते आठच्या विद्यार्थ्यांना शालेय पुस्तके तसेच इतर साहित्य वाटप करण्यात येते. हे साहित्य याच इमारतीत ठेवण्यात येते. गळतीमुळे हे साहित्य खराब होत असल्याचे चित्र आहे.

घाणीचे साम्राज्य

इमारतीत शौचालयाची व्यवस्था करण्यात आली होती, परंतु शौचालयाची दारे तुटली आहेत तर घाणीचे साम्राज्य पसरले आहे. यामुळे येथील कर्मचाऱ्यांना पंचायत समिती कार्यालयातील शौचालयाचा वापर करावा लागत आहे. इमारतीत असलेल्या दरवाजांना लोखंडी फ्रेम असून, त्या संपूर्ण सडलेल्या अवस्थेत आहेत. परिसरात पावसाचे पाणी साचून घाणीचे साम्राज्य पसरले आहे. या घाणीत दिवसभर डुकरांचा मुक्त संचार असतो. तसेच घाणीत निर्माण होणाऱ्या जीवजंतूंपासून कर्मचाऱ्यांचे आरोग्य धोक्यात आले आहे.