Nagpur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : काम पूर्ण होण्यापूर्वीच रस्त्याला तडे कसे काय? चौकशी कराच

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : नागपुरातील दीक्षाभूमी देशात नव्हे तर विदेशातही प्रसिद्ध आहे. मात्र, एवढ्या महत्त्वाच्या ठिकाणाच्या, दीक्षाभूमी चौक ते अलंकार टॉकीज चौक दरम्यानच्या रस्त्याच्या कामाच्या दर्जाबाबत प्रश्न चिन्ह उपस्थित केले जात आहे. या रस्त्याच्या कामामध्ये सिमेंटर ऐवजी राखेचा वापर केला जात असल्याचा आरोप स्थानिक नागरिकांकडून करण्यात आला आहे.

नागपूरमधील दीक्षाभूमी (Deeksha Bhumi) चौक ते अलंकार टॉकीज चौक या दरम्यान बांधण्यात येत असलेल्या काँक्रिटच्या रस्त्याच्या कामात सिमेंट कमी आणि राखेचाच जास्त वापर केला जात आहे. त्यामुळे रस्त्याचे काम पूर्ण व्हायचे असतानाच ठिकठिकाणी रस्त्याला तडे गेले आहेत.

सिमेंटचा असलेला हा रस्ता पांढरा शुभ्र दिसत आहे. त्यावरून अनेकांना सिमेंट ऐवजी राख वापरली जात असल्याची शंका व्यक्त केली. या परिसरातील समाजसेवक तसेच राजीव गांधी पंचायत राज संघटनेचे राष्ट्रीय संयोजक ॲड. अक्षय समर्थ यांनी काही अभियंत्यांसोबत चर्चा केली. त्यांनीसुद्ध निकृष्ट साहित्य वापरल्या जात असल्याचा दुजोरा दिला. त्यानंतर ॲड. समर्थ यांनी महापालिका आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे लेखी तक्रार केली. या रस्त्याची व त्यात वापरण्यात आलेल्या साहित्याची तपासणी केली जावी, तोपर्यंत कंत्राटदाराचे बिल रोखण्यात यावे, अशी मागणी समर्थ यांनी केली.

Tagada

दीक्षाभूमी चौक ते अलंकार टॉकिज चौक या दरम्याच्या रस्त्याच्या कामात निकृष्ट साहित्य वापरले जात असल्याचे समोर आल्यानंतर महापालिका आयुक्त राधाकृष्णन यांच्याकडे लेखी तक्रार केली आहे. या रस्त्याच्या कामामध्ये वापरण्यात येणाऱ्या साहित्याची आणि रस्त्याच्या दर्जाची तपासणी करण्याची मागणी आम्ही त्यांच्याकडे केली आहे.

- ॲड. अक्षय समर्थ, राष्ट्रीय संयोजक, राजीव गांधी पंचायत राज संघटना