अमरावती (Amravati) : नांदगावपेठ ते पांढुर्णा राष्ट्रीय महामार्गावर कोट्यवधी रुपये खर्च झाले असले तरी निकृष्ट काम झाल्याने या महामार्गावर मोठ्या प्रमाणात भेगा पडल्या. एवढेच नव्हे तर रस्ता जागोजागी खोदून ठेवून रॉ मटेरियल रस्त्यावर पडून असल्याने अपघातांची मालिका सुरू आहे. या मार्गावर कित्येक लोकांना अपघात होऊन आपला जीव गमवावा लागत आहे.
शासन-प्रशासनाने कंत्राटदार कंपनीवर सदोष मनुष्यवधाचा गुन्हा दाखल करून कायदेशीर कारवाई करण्यात यावी, अन्यथा तीव्र स्वरूपाचे आंदोलन छेडण्याचा इशारा माजी नगराध्यक्ष आप्पासाहेब गेडाम, शिवसेनेचे शहराध्यक्ष मिलिंद ढोले, भोई समाजाचे तालुकाध्यक्ष रवी मोरे यांनी दिला आहे.
दापोरीनजीक रस्त्यावर सुरू असलेल्या ड्रायव्हर्शनला दुचाकी धडकून झालेल्या अपघातात प्रकाश रामलाल धुर्वे याचा 4 फेब्रुवारी रोजी जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेला त्याचा भाऊ घनश्याम रामलाल धुर्वे याला गंभीर मार बसल्याने त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविण्यात आले.
घटनेत हिवरखेड फाट्याजवळ निर्माणाधीन कामामुळे ओमप्रकाश शेरसिंह राजभोपा यांची दुचाकी घसरून झालेल्या अपघातात त्यांचा जागीच मृत्यू झाला. दुचाकीवर मागे बसलेल्या रवी सतीश धुर्वे याला गंभीर मार बसल्यामुळे त्याला जिल्हा सामान्य रुग्णालयात हलविले.
या अगोदर निंभीनजीक महावितरण कर्मचारी असलेल्या वृषभ भोयर या युवकाचा रस्ता खोदून रस्त्यावरच फेकलेल्या दगड-मातीमुळे अपघात होऊन त्याचा जागीच मृत्यू झाला. एक महिन्यापूर्वी हिवरखेड येथील निखिल पाटील या युवकाचा रस्त्याला पडलेल्या भेगांमुळे दुचाकी घसरून अपघात झाला होता.
रस्त्याला तडे विविध कारणांनी जातात. कंत्राटदार रस्त्याचे काम करीत असून, त्यांना आम्ही खोदून ठेवलेल्या रोडच्या बाजूला बॅरिकेड व फलक लावण्याच्या सूचना दिल्या आहेत. कामाला लवकरात लवकर सुरवात होईल, अशी प्रतिक्रिया राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण, अमरावतीचे अभियंता अनंत देशमुख यांनी दिली.