Sambhajinagar Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : घाटी परिसरातील गौतमनगर भागात पाणी पुरवठा सुरळीत करा!

टेंडरनामा ब्युरो

Chhatrapati Sambhajinagar छत्रपती संभाजीनगर : छत्रपती संभाजीनगर शहराला १० ते १२ दिवसाला पाणी येते, अशी परिस्थिती असताना घाटी गौतमनगर, भागातील नळाला थेंबभर सुध्दा पाणी येत नसल्याने नागरीकांना पाण्यासाठी भटकंती करावी लागत आहे. काहींना विकतचे पाणी घ्यावे लागत असल्याने आर्थिक भुर्दंड बसतोय. 

गेल्या काही दिवसांपासून टाऊन हॉल ते मकाई गेट या रस्त्याचे सिमेंट काँक्रिटींगचे काम चालू होते, जेसीबीच्या सहाय्याने रस्ता रुंदीकरण करत असताना कंत्राटदाराच्या हलगर्जीपणामुळे पाण्याची मुख्यपाईप लाईन व पाणी सप्लायचे दोन वाल्व्ह तुटल्याने लाखो लिटर पाणी गेल्या सहा महिन्यांपासून वाया जात आहे.

याच मुख्य पाईपलाईनद्वारे गौतमनगर भागात पाणी पुरवठा होत होता. काही घरांना थोडेफार पाणी आलेच तर ते मलमिश्रीत दुर्गंधीयुक्त येत असल्याने पाण्याचा उपयोग होत नाही, त्यामुळे  रोगराई वाढत चालली आहे. याबाबत नागरिकांनी मनपा प्रशासनाला कळवले, परंतु उपयोग झाला नाही.

फुटलेल्या पाईपलाईनचे काम तात्काळ करून गौतमनगर घाटी परिसातील पाणीपुरवठा सुरळीत करावा, अशी मागणी नागरिकांसह रिपब्लिकन पार्टी ऑफ इंडिया (सचिन खरात गट) जिल्हाध्यक्ष मनीष नरवडे यांनी केली आहे. या निवेदनावर मनीष नरवडे, पवन पवार, संदीप आहिरे व इतरांच्या यांच्या सह्या आहेत.