नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील (Nagpur City) सिवेज लाईन जीर्ण झाल्या असून, दिवसेंदिवस आता व्यावसायिक प्रतिष्ठानांचाही भार वाढत आहे. लक्ष्मीनगरातील केएफसी (KFC), तसेच अण्णा इडली (Anna Idaly) चे खरखटे, कापलेल्या भाज्यांच्या तुकड्यांनी सिवेज लाईन तुंबल्या असून, मागील परिसरातील अपार्टमेंटमध्ये सांडपाणी पसरले आहे. त्यामुळे या अपार्टमेंटमधील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. विशेष म्हणजे याबाबत केलेल्या तक्रारीकडे महानगर पालिकेच्या (Nagpur Municipal Corporation) लक्ष्मीनगर झोननेही दुर्लक्ष केल्याने अधिकाऱ्यांवर चिरीमिरीचा संशय व्यक्त केला जात आहे.
लक्ष्मीनगर मार्गावर श्रद्धानंदपेठ येथील सावित्री अपार्टमेंटमधील परिसरात सिवेज लाईन तुंबल्याने चेंबरमधील घाण पाणी पसरत आहे. या अपार्टमेंटमध्ये प्रामुख्याने ज्येष्ठ नागरिक राहात असून, त्यांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे. या अपार्टमेंटच्या मागे मुख्य रस्त्यावर केएफसी व अण्णा इडली हे दोन खाद्यपदार्थांचे मोठे स्टोअर सुरू झाल्यापासून नागरिकांचा त्रास वाढला आहे. या व्यावसायिक प्रतिष्ठानांमधील कापलेल्या भाज्यांचे तुकडे, खरखटे पदार्थ दिवसभर सिवेज लाईनमध्ये शिरत असल्याने ती तुंबली.
सिवेज लाईनचे एक चेंबर सावित्री अपार्टमेंटमध्ये असून, त्यातून आवारात दररोज सांडपाणी पसरत आहे. त्यामुळे येथील नागरिकांना दुर्गंधी सहन करावी लागत आहे. याशिवाय डासांचाही प्रकोप वाढल्याने या अपार्टमेंटमधील २०० नागरिकांच्या आरोग्याला धोका निर्माण झाला आहे.