नागपूर (Nagpur) : नागपूर शहरातील अनेक भागात रस्त्यांवरच ड्रेनेज लाईनचे चेंबर आहेत. काही भागात चेंबरच्याच बाजुला कुठे मंदिर, तर कुठे चहाच्या टपऱ्या आहेत. या चहा टपऱ्यांवरील ग्राहक चहा पिल्यानंतर डिस्पोजल ग्लास, कप या चेंबरजवळ आणून टाकतात. परिणामी अनेक ग्लास ड्रेनेज लाईनच्या आत जात आहेत. हेच डिस्पोजल ग्लास व कप ड्रेनेज लाईनमध्ये अडकल्यामुळे नागरिकांच्या घरात सांडपाणी तुंबत आहे. तर पावसाळ्यात ड्रेनेज लाईन तुंबून रस्त्यांवर पाणी जमा होण्याची शक्यता आहे.
शहरातील रस्त्याखालून अनेक ड्रेनेज लाईन टाकण्यात आलेल्या आहेत. त्यामुळे त्यांचे चेंबरही रस्त्यावर आहेत. अनेक रस्त्यांवर चहाच्या टपऱ्या, उसाचा रस विक्रेते, लिंबू सरबत विकणारे आहेत. सद्यस्थितीत चहा टपरीपासून तर सर्वच रस, ज्यूस विक्रेते डिस्पोजल ग्लास किंवा कपाचा वापर करतात. ही दुकानेही रस्त्याच्या बाजूलाच आहेत. त्यामुळे एखाद्या टपरीजवळच ड्रेनेज किंवा सिवेज लाईनचे चेंबर दिसल्यास ग्राहक डिस्पोजल ग्लास व कप तिथेच फेकून देतात.
अनेक भागातील चेंबरवर डिस्पोजल कप, ग्लासचा ढिगारा दिसून येत आहे. डिस्पोजल ग्लास, कपची लहान घडी करून काही जण चेंबरवर फेकतात. त्यामुळे हे डिस्पोजल ग्लास, कप थेट सिवेज लाईन किंवा ड्रेनेज लाईनमध्ये जात आहेत. रमणा मारोती परिसरातील अशाच एका चेंबरचे बोलके छायाचित्र वर दिले आहे. इतरही भागात असेच चित्र आहे.