नागपूर (Nagpur) : पावसामुळे महावितरणने बंच केबल निकामी केल्यामुळे महिनभरापासून पथदिवे बंद आहेत. त्यामुळे मानकापूर, ताजनगर, छावनी परिसरातील हजारो नागरिकांना रात्रीच्या वेळी अंधारातून प्रवास करावा लागत आहे. त्यामुळे मोठ्या अपघाताची शक्यता बळावली आहे. (Nagpur Municipal Corporation News)
नव्या १६ क्रमांकाच्या प्रभागात महापालिकेने ताजनगर, मानकापूर, छावनी भागात पथदिवे लावले. त्यामुळे रस्त्यांवरून नागरिकांचा प्रवास सुलभ होता. परंतु महिनाभरापासून या वस्त्यांतील पथदिवे बंद आहेत. त्यामुळे नागरिक त्रस्त आहेत. या वस्त्यांतील मार्गावरून रात्रीच्या वेळीही हजारो नागरिक ये-जा करतात. पथदिवे बंद असल्याने रस्त्यांवरील अंधारामुळे पादचाऱ्यांवर अपघाताची टांगती तलवार आहे.
अनेकदा वाहने जोरात येतात. अंधारामुळे वाहनचालकाचे लक्ष विचलित झाल्यास एखाद्याचा जीवही जाण्याची शक्यता आहे. या गंभीर समस्येबाबत परिसरातील नागरिकांंनी माजी नगरसेवक अरुण डवरे यांच्याकडे तक्रार केली आहे.