Chandrapur Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : सुरजागड खाण प्रकल्पामुळे वायू प्रदूषण वाढले; पर्यावरण परवानगी रद्द करण्याची मागणी

टेंडरनामा ब्युरो

चंद्रपूर (Chandrapur) : सुरजागड लोह खनिज खाण मेसर्स लॉयडस मेटल व एनर्जी लि. या प्रकल्पद्वारे पर्यावरण कायद्याचे वारंवार उल्लंघन होत असल्यामुळे या प्रकल्पाची पर्यावरण परवानगी रद्द करण्यात यावी, अशी मागणी संजीवनी पर्यावरण सामाजिक संस्थेचे अध्यक्ष राजेश बेले यांनी केली आहे. त्यांनी या मागणीचे निवेदन प्रादेशिक अधिकारी, महाराष्ट्र प्रदूषण नियंत्रण मंडळ चंद्रपूर यांना दिले आहे.

सुरजागड लोह खनिज प्रकल्पाद्वारे हवेमध्ये खाणीतून निघालेली लाल मातीचे कण व लोह दगडातील सुक्ष्म कण हवेमध्ये उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज खाणीतील घातक रासायनिक द्रव खाणीला लागून असलेल्या नाल्याद्वारे जंगलातून गोदावरी नदीमध्ये सोडतात. त्यामुळे तेथील मानवी जीव, जल प्राणी, वन्य प्राणी, पाळीव प्राणी यांच्या जीवाला व आरोग्याला धोका निर्माण झालेला आहे व आजाराची लागण, नवजात शिशुंचा मृत्यू, दमा, हृदय विकार, त्वचा रोग, डोळ्याचे विकार, मेंदूचे विकार, क्षयरोग, - कर्करोग अशा अनेक आजाराची सुद्धा लागण झाली आहे. त्यामुळे या प्रकल्पाची  परवानगी रद्द करण्याची मागणी करण्यात आली आहे.

याठिकाणी कुठलेही पर्यावरण कायद्यांतर्गत उपाययोजना होत नाही. लोह खनिज खाणीतून निघणाऱ्या लोह खनिज मधून ओव्हर बर्डन हाताळणी करते वेळी हवेमध्ये सुक्ष्म कण उडत असल्यामुळे घातक वायू प्रदूषण होत आहे. लोह खनिज व खाणीतून निघणारे ओव्हरबर्डन ट्रक व हायवा गाडीमध्ये हाताळणी करताना आणि जड वाहतुकीद्वारे सुरजागड लोह खनीज प्रकाल्पासून एटापल्ली, आलापल्ली, गोंडपिपरी, आक्सापूर, पोंभूर्णा, केळझर, कोठारी, बामणी या गावातील रस्ते व आजूबाजूचा परीसर प्रदूषण होत आहे. सुरजागड लोह खनिज प्रकल्प केळझर व राजुरा रेल्वे सायडिंगवर लोह खनिज हाताळणी करताना नियमांची पायामल्ली होत  होत आहे. सोबतच मुल तालुक्यातील सुशी दाबगावं गावातून मोठ्या प्रमाणात दिवसरात्र सुरजागड येथील लोहखनिज उत्खनन करणाऱ्या कंपनीतर्फे जड वाहतूक सुरू असून त्या वाहतुकीमुळे व होणाऱ्या प्रदूषणामुळे सुशी, दाबगावं, वाशियचे नागरिक मोठ्या प्रमाणात त्रस्त झाले आहेत, यावर प्रशासनाने तत्काळ उपाय योजना करण्याची मागणी सुद्धा ग्रामीण करत आहे. लवकरात लवकर यावर तोडगा काढण्यात आला नाही तर   रास्तारोको आंदोलन करू असा इशारा ही तेथील लोकांनी दिला आहे.