building Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'या' धोकादायक इमारतीत अजून किती दिवस राहायचे?

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : प्रवाशांच्या सेवेसाठी असलेले एसटी महामंडळ कर्मचाऱ्यांच्या सेवेकडे पूर्णपणे दुर्लक्ष करीत आहे. कर्मचाऱ्यांसाठी बांधलेल्या घाट रोड परिसरातील वसाहती मोडकडीस आल्या आहेत. दुरुस्तीचा खर्चही पगारातून कपात होतो मात्र दुरुस्ती होत नाही. त्यामुळे धोकादायक इमारतीत अजून कधीपर्यंत राहायचे असा सवाल कर्मचाऱ्यांच्या कुटुंबीयांचा आहे.

घाट रोड, इमामवाडा आगाराला लागून एसटी कर्मचाऱ्यांची वसाहत आहे. येथे 6 इमारती असून प्रत्येक इमारतीत 6 गाळे आहेत. या इमारतीचे बांधकाम जवळपास 50 वर्षापूर्वीचे आहे. जीर्ण झालेल्या या इमारतीला दोन वर्षांपूर्वी केवळ बाहेरून छपाई करून डागडुजी करण्यात आली. मात्र, आत गेल्यावर परिस्थिती काही वेगळीच आहे. पोपडे निघून भिंतीला भेगा पडल्या आहेत. खिडकीच्या काचा फुटलेल्या आहेत. खिडकीवरील स्लॅब कोसळण्याच्या अवस्थेत आहे.

घरातील फरशाही तुटलेल्या अवस्थेत आहेत. पायऱ्यांची अवस्थाही बिकट आहे. बाथरूम आणि शौचालयाचा विचार तर न केलेलाच बरा. पावसाळ्यात छत गळती काही केल्या थांबत नाही. इमारती बांधल्यापासून रंगरंगोटी झालेली नाही.  या इमारतींची पाहणी केली असता, कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी घाबरतच इमारतींची समस्या सांगत होते. त्यांना भीती आहे की, वरिष्ठाकडून आपल्यावर कारवाई होईल. त्यामुळे कर्मचाऱ्यांचे कुटुंबीय आणि कर्मचारी फारसे बोलायला तयार नव्हते.

वृद्ध व लहान मुलांना धोका

वसाहत परिसरात मोठाले गवत उगविले आहे. त्यामुळे सरपटणाऱ्या प्राण्यांची भीती नेहमीच असते. नेहमीच साप निघत असतात. त्यामुळे परिसरात खेळणारी लहान मुले व फिरणाऱ्या वृद्धांची काळजी असल्याचे नागरिकांनी सांगितले. पथदिवे बंद असतात. इमारतीचे मुख्य गेट व सुरक्षा भिंत तुटलेली आहे. असामाजिक तत्त्वाचे लोक येथे येऊन दारू पितात. हटकल्यावर भांडण करतात. सुरक्षा रक्षक नसल्याने ही स्थिती निर्माण झाली आहे. गेट समोरच ट्रॅव्हल्स उभ्या ठेवतात. त्यामुळे येता-जाताना भीती वाटत असल्याचे कुटुंबीयांनी सांगितले.

मेंटनन्सचा नावावर पगारातून कपात

इमारतीच्या देखभाल दुरुस्तीकरिता महिन्याला पगारातून 900 रुपये कपात होतात. मात्र, दुरुस्ती कुठेच दिसत नाही. पावसाळ्यात भिंती ओल्या असतात. जुन्या इलेक्ट्रिक वायरिगमुळे विजेचा धक्का लागण्याची भीती आहे. जीर्ण झालेल्या इमारतीत वास्तव्याला असल्याने नेहमीच दहशतीत जगावे लागत असल्याचे रहिवाशांनी सांगितले.