Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : शाळेचा रस्ता की दलदलीचा रस्ता?; शेकडो नागरिकांना...

संजय चिंचोले

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : जेव्हा आमच्या भागात पाहुणे येतात, तेव्हा तुम्ही खरंच स्मार्ट सिटीत राहतात का, असा सवाल करतात तेव्हा आम्हाला खाली माना घालाव्या लागतात, अशी कैफियत टेंडरनामापुढे वाचत सिडकोतील शेकडो नागरिकांनी ओम प्राथमिक शाळा ते शिवज्योती काॅलनी रस्त्याची रखडगाथा वाचत काय हाल सोसावे लागतात त्याची करून कहाणीच मांडली. टेंडरनामाचा हा खास रिपोर्ट ...

एमजीएम विश्वविद्यालय आणि जेएनईसी समोरील चिश्तिया काॅलनी ते जकातनाक्याला जोडणाऱ्या शिवज्योती काॅलनी ते चिश्तिया चौक ते आविष्कार काॅलनी ते ओम प्राथमिक शाळेकडून सिडको एन६ आविष्कार काॅलनी ते मातामंदिर रस्त्याला मिळणाऱ्या रस्त्याची पार वाट लागली आहे. पावसाळा सुरू असल्याने रस्त्यावर दलदल निर्माण झाली आहे. महानगर पालिकेने याच रस्त्याला जोडणाऱ्या अनेक वसाहतींचे रस्ते छान गुळगुळीत केले आहेत. पण याच रस्त्याला का मुहुर्त लागत नाहीए, हा संशोधनाचा विषय आहे. त्यात जलवाहिनीच्या कामासाठी हा दलदलीचा रस्ता खोदला गेल्याने अडचणीत भर पडली आहे. स्मार्ट सिटीतून रस्त्याच्या कामासाठी मोठा निधी मंजूर आहे. यामुळे या रस्त्याचा त्यात समावेश करून त्वरित  गुळगुळीत करण्याची मागणी येथील रहिवाशांतून होत आहे.

सिडको एन-६ तील मथुरानगर, संभाजी काॅलनी, साईनगर, शुभश्री काॅलनी, टेलीकाॅम सोसायटी, आकांशा हाऊसिंग सोसायटी, जय दुर्गा सोसायटी, जनाबाई हाउसिंग सोसायटी, साईभंक्त सोसायटी, सिंहगड काॅलनी, न्यु संभाजी काॅलनी, आविष्कार काॅलनी व चिश्तिया काॅलनीसह एन - ८ भागातील शेकडो सोसायट्यांमध्ये जेएनईसीटी, एमजीएम तसेच डाॅ. वाय.एस.खेडकर मेडीकल काॅलेज व मेडिकव्हर रूग्णालयात काम करणारे अधिकारी-कर्मचारी व विद्यार्थी या भागात भाड्याने राहतात कामकाजासाठी व शिक्षणासाठी त्यांना याच शाॅटकट मार्गाचा वापर करावा लागतो. तसेच नागरिक देखील या रस्त्याचा मोठ्या प्रमाणात वापर करतात. सिडकोच्या विकास आराखड्यानुसार हा ९ मिटरचा रस्ता आहे. सिडकोने उभारलेल्या अनेक वसाहतींना जोडणारा हा मुख्य रस्ता आहे. शिवाय नजीकच्या वसाहतधारकांना एमजीएम आणि मेडिकव्हर रूग्णालयात रूग्णास दाखल करण्यासाठी याच रस्त्याचा वापर करावा लागतो.

पण गेल्या २० वर्षांपासून या रस्त्याचा प्रश्न सुटलेला नाही, असे येथील प्रत्यक्षदर्शी रिक्षाचालकांनी सांगितले. यासंदर्भात अनेकवेळा नागरिकांनी आंदोलन केले, मात्र या भागातील वार्ड अभियंत्यांनी उडवाउडवीची उत्तरे देत नागरिकांची बोळवण केली. या भागातील आजी - माजी नगरसेवकांनी देखील हा रस्ता व्हावा यासाठी प्रयत्नांची पराकाष्ठा केली. मात्र त्यांच्याही प्रयत्नांना यश आले नाही. गेल्या वीस वर्षापासून या रस्त्याची जैसे थे अवस्था आहे. रस्त्यातील उधळलेले खडीकरण व मजबुतीकरण देखील पावसात वाहून गेल्याने येथे रस्ता होता का, असा प्रश्न निर्माण होत आहे. पावसामुळे रस्त्यावर चिखल आणि हौदासारख्या आकाराच्या खड्ड्यात पाणी साचले आहे. रस्त्याचा पार चिखलदरा झालेला आहे. ओम प्राथमिक शाळा ते चिश्तिया व शिवज्योती काॅलनीलगत या रस्त्याला स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत मंजुरी देऊन तातडीने या रस्त्याची दुरूस्ती करावे. धडाकेबाज व सिंगमफेम आयुक्तांनी या महत्वाच्या रस्त्याची दखल घ्यावी , असा तगादा येथील शेकडो रहिवाशांनी 'टेंडरनामा' प्रतिनिधीकडे लावला. शाळकरी मुलांना शाळेत सोडण्यासाठी दुचाकीवरून जाणे कठीण होत आहे.रूग्णांचे हाल होत आहेत. 

● जेव्हा याभागात पाहुणे येतात, तेव्हा ते म्हणतात, तुम्ही खेड्यात राहता की स्मार्ट  शहरात? तेव्हा आम्ही निरूत्तर होतो. आधी सिडकोच्या काळात हा डांबरी रस्ता होता. सिडकोचे मनपात हस्तांतर झाल्यापासून रस्त्याचे काम झालेच नाही. त्यात पाइपलाइनमुळे तो उखडला; त्यात पाणी तुंबले. खड्ड्यांचा अंदाज येत नाही.

- मनिषा सदावर्ते

●  छोट्या रस्त्याच्या दुरूस्तीसाठी महापालिका प्रशासकांकडे तगादा लावने योग्य आहे, असे मला वाटत नाही. झोन अंतर्गत सर्वेअर, कनिष्ठ अभियंता, शाखा अभियंता, उपअभियंता, वार्ड अभियंता ही जनतेच्या पगारातून नेमलेली मंडळी नेमकी काय काम करते, हा खरा प्रश्न आहे. खरंच जनतेला कोणी वाली नाही. जिल्ह्याच्या लोकप्रतिनिधींच्या घोषणाही दिवास्वप्नच. घरपट्टी, नळपट्टी वसुली मात्र जोरात सुरू आहे. सध्या नगरसेवक नसल्यामुळे नागरिकांनी समस्या घेऊन जावे तरी कोणाकडे?

- स्वप्नाली शिसोदे