Charchgate Railway Station Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : चर्चगेट स्टेशनची सुरक्षा रामभरोसे; 'स्कॅनिंग' बंद

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : 26/11 च्या हल्ल्याच्यावेळी कसाब आणि दहशतवाद्यांनी केलेल्या सीएसएमटी रेल्वे स्थानकातील गोळीबाराच्या जखमा आजही ताज्या आहेत. त्यानंतर सरकारी सुरक्षा यंत्रणांनी अनेक महत्त्वाचे निर्णय घेतले. सीएसएमटी आणि चर्चगेट या दोन स्थानकात अद्ययावत स्कॅनिंग यंत्रणा उभारण्यात आली. मात्र, चर्चगेट स्थानकावरील ही अद्ययावत स्कॅनिंग यंत्रणा बंद असल्याचे गंभीर प्रकरण उजेडात आले आहे. महत्त्वाचे म्हणजे, गेल्या तब्बल दोन वर्षांपासून ही यंत्रणा बंद आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर जागे झालेल्या पश्चिम रेल्वेने आता याचे दुरुस्तीचे टेंडर काढले आहे.

लोकल ही मुंबईची खरी जीवनवाहिनी. सेंट्रल, पश्चिम, हार्बर, ट्रान्स हार्बर या प्रमुख लाईन्स आहेत. लाखो प्रवासी यातून दररोज प्रवास करतात आणि यातीलच सगळ्यात जास्त प्रवाश्यांचे लोंढे हे सीएसमटी आणि चर्चगेट या स्थानकांपर्यंत पोचतात. अर्थात याचमुळे या रेल्वे स्थानकाची सुरक्षा अत्यंत महत्वाची मानली जाते. चर्चगेट हे महानगरी मुंबईच्या पश्चिम लोकल वाहिनीचे प्रमुख स्टेशन आहे. मुंबईच्या उपनगरातून ये जा करणाऱ्या लाखो प्रवाशांसाठी हे चर्चगेट, हे अनेक कारणांनी महत्वाचे आहे. महाराष्ट्रातील अनेक महत्वाची शासकीय कार्यालये, मंत्रालय, कार्पोरेट हाऊसेस, पर्यटन स्थळे येथे जाण्यासाठी, चर्चगेटकडे लोकांचा मोठा ओघ असतो. याचमुळे येथील सुरक्षा व्यवस्था महत्त्वाची मानली जाते.

मात्र, चर्चगेट स्थानकावर अद्ययावत स्कॅनिंग यंत्रणा बंद असल्याचे समोर आले आहे. 26/11 च्या हल्ल्याच्यावेळी कसाब आणि दहशतवाद्यांनी केलेल्या सीसएमटी रेल्वे स्थानकातील गोळीबाराच्या जखमा आजही ताज्या आहेत. त्यांनतर अनेक महत्वाचे निर्णय सरकारी सुरक्षा यंत्रणांनी घेतले. सीसएमटी आणि चर्चगेट या दोन स्थानकात अद्ययावत स्कॅनिंग यंत्रणा उभारण्यात आली. प्रवासी आणि त्यांचे सामान याची काटेकोर तपासणी सुरू झाली. याकरीता विशेष पोलीस बंदोबस्त तैनात करण्यात आला. मात्र, चर्चगेट स्थानकावर सुरक्षेसाठी उभारलेली स्कॅनिंग यंत्रणाच बंद असल्याचे समोर आले. तब्बल दोन वर्षांपासून ही स्कॅनिंग यंत्रणा बंद आहे. दरम्यान, दोन वर्षानंतर जागे झालेल्या पश्चिम रेल्वेने तांत्रिक दोष निर्माण झाल्याने स्कॅनिंग यंत्रणा बंद असल्याचे मान्य केले आहे. तसेच याचे टेंडर काढण्यात आले असून महिन्याभरात दुरुस्ती करणार असल्याची माहिती पश्चिम रेल्वेचे जनसंपर्क अधिकारी सुमित ठाकूर यांनी दिली.