Tagada Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : 'या' भुयारी मार्गाची झाली दुर्दशा; पावसाळा सुरु होताच चिखलाने माखला रस्ता

टेंडरनामा ब्युरो

वर्धा (Wardha) : नागपूर-तुळजापूर या राष्ट्रीय महामार्गवरील सेलू ते वर्धा मार्गालगत दत्तपूरजवळ असलेल्या भुयारी मार्गाला जोडणाऱ्या रस्त्याची प्रचंड दुरावस्था झाली आहे. खट्टे पडलेला हा रस्ता नुकत्याच झालेल्या पावसामुळे चिखलाने माखला आहे. पाण्याची डबकीही साचली आहेत. त्यामुळे चालकांना वाहन चालवताना तारेवरची कसरत करावी लागत आहे. परिणामी अपघाताची शक्यता बळावली आहे. याकडे बांधकाम विभागाने तत्काळ लक्ष देणे गरजेचे आहे.

महामार्गावरून जाणारे प्रत्येक वाहन भुयारी मार्गातूनच न्यावे लागते. डोडानी स्टील प्लांट (वंश स्टील) जवळून तिकडे गेलेला हा रस्ता अत्यंत खराब झाला आहे. ठिकठिकाणी मोठाले खड्डे पडले आहेत. याच रस्त्याने जिल्ह्यातील सर्वच अधिकारी, पुढाऱ्यांचीही ये-जा असते. त्यांनाही या मार्गाचा निश्चितच फटका बसतो. मात्र, त्यांच्याकडूनही यावर तोडगा निघालेला नाही, ही शोकांतिकाच म्हणावी लागेल. काही सामाजिक कार्यकत्यांनी ही बाब वरिष्ठांच्या कानावर घातली. मात्र, त्यांच्या तक्रारीकडे दुर्लक्ष करण्यात आले आहे. पावसाच्या दिवसात जीवघेणा ठरणारा हा रस्ता तत्काळ दुरुस्त न केल्यास दररोज अपघाताची श्रृंखला घडल्याशिवाय राहणार नाही, हे मात्र निश्चित आहे. सार्वजनिक बांधकाम विभाग, महाराष्ट्र राज्य रस्ते विकास महामंडळ, जिल्हाधिकारी वर्धा तसेच सर्व लोकनियुक्त प्रतिनिधींनी या गंभीर समस्येकडे लक्ष द्यावे जेणेकरुन अपघातात लोकांचा जीव जाणार नाही.

जीव जाण्यापूर्वी दुरुस्ती करण्याची मागणी : 

दत्तपूर परिसरातून गेलेल्या भुयारी मार्गाची अत्यंत दुर्दशा झाली आहे. रस्त्यावर दररोज अपघात होत असून, अनेकजण किरकोळ जखमी होत आहेत. कुणाचा जीव जाण्यापूर्वी या रस्त्याची तत्काळ दुरुस्ती करावी, अशी मागणी केली जात आहे. त्यामुळे संबंधित अधिकाऱ्यांनी याकडे गांभीर्याने पाहून तत्काळ दुरुस्ती करण्याची गरज आहे.