Mumbai Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : वडखळ ते पेण रस्त्यावर खड्डे की खड्ड्यात रस्ते?

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : मुंबई-गोवा (Mumbai-Goa Highway) जुन्या महामार्गावर वडखळ ते पेण दरम्यान पावसामुळे मोठमोठे खड्डे पडले आहेत. या खड्यांमुळे अपघाताची भिती असल्याने प्रशासनाने मार्गावरील खड्ड्यांची तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी नागरिक करीत आहेत.

वडखळ ते पेण जुन्या मार्गाजवळ आणि परिसरात गावे, वस्तीवाडी मोठ्या प्रमाणात असल्याने येथील बहुतांश नागरिक याच मार्गाने प्रवास करतात. अलिबाग, मुरुड आणि कोकणातील सर्व एसटी बस आणि रिक्षा, मिनिडोअर, इको टॅक्सी यांची प्रवासी वाहतूक, पर्यटकांची वाहने, जेएसडब्ल्यू कंपनीची अवजड वाहतूक याच मार्गाने होत असते. परिणामी बसचालक, रिक्षाचालक आणि इतर वाहनचालक तसेच प्रवाशी आणि आजारी रुग्णांना यामार्गाने प्रवास करताना मोठा त्रास होत आहे.

याठिकाणी असणाऱ्या खड्ड्यांमुळे वाहने खड्ड्यात आपटून मणक्यांचे आजार वाढत असल्याचे नागरिक सांगतात. तसेच बस आणि इतर अवजड वाहने नादुरुस्त होऊन रस्त्यातच बंद पडत असल्याने वारंवार वाहतूक कोंडी होते. तरी यामार्गाची प्रशासनाने दखल घेऊन तातडीने दुरुस्ती करण्याची मागणी प्रवाशी, वाहन चालक आणि नागरिकांकडून होत आहे.