Road Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : मुंबई-अहमदाबाद महामार्ग मृत्यूचा सापळा; आयआरबीचे दुर्लक्ष

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : वसई पूर्वेच्या भागातून गेलेल्या मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर (Mumbai-Ahmedabad National Highway) विविध ठिकाणच्या भागांत खड्डे पडले आहेत. या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. अपघाताच्या घटना वाढू लागल्या आहेत. तसेच या राष्ट्रीय महामार्गावर बंद व अपघातग्रस्त वाहने हटविण्यासाठी यंत्रणेचा अभाव, पाणी निचरा होण्याचे बंद झालेले मार्ग, बंद पथदिवे, अपघात रोखण्यासाठीच्या उपाययोजना न करण्यात आल्याने महामार्ग समस्यांच्या विळख्यात सापडला आहे.

हा महामार्ग राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरणच्या अखत्यारीत येत असून, याच्या देखभाल दुरुस्तीचे काम ठेकेदार कंपनी आयआरबी मार्फत केले जाते. मात्र महामार्ग वाहतूक पोलिसांकडून सातत्याने महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार करुनही याकडे दुर्लक्ष होत आहे. वसई पूर्वेतील भागातून मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्ग गेला आहे. मुंबई व गुजरात यांच्यासह विविध शहरांना जोडणारा हा महत्त्वाचा महामार्ग असल्याने या भागात वाहनांची मोठी वर्दळ असते. परंतु अत्यंत वर्दळीच्या असलेल्या महामार्गावर विविध ठिकाणच्या भागांत खड्ड्यांचे साम्राज्य तयार झाले आहे.

चिंचोटी, बापाणे फाटा, मालजीपाडा, ससूनवघर, वसई फाटा, तुंगार फाटा, खानिवडे, फाऊंटन हॉटेल यासह विविध ठिकाणी मोठमोठे खड्डे पडले आहेत. दिवसेंदिवस हे खड्डे अधिकच वाढत आहेत. कोपर उड्डाणपूल व पेल्हार येथे सुमारे दोन ते चार फूट रुंद तर ६ इंचाहून अधिक खोलीचे खड्डे पडले आहेत. या वाढत्या खड्ड्यांमुळे वाहनचालकांना प्रवासादरम्यान चांगलीच कसरत करावी लागत आहे. महामार्ग असल्याने वाहने ही भरधाव वेगात येत असतात, जेव्हा खड्डा दृष्टिपथात येतो तेव्हा वाहनचालक वेगनियंत्रित करताना अपघात होण्याची शक्यता असते. याशिवाय काही ठिकाणी अपघाताच्या घटना ही घडत आहेत. तर खड्ड्यांचे हादरे बसत असल्याने वाहनांच्या नुकसानीसह नागरिकांच्या मागे कंबरेचे दुखणे लागले आहे. हे पडलेले खड्डे बुजविण्यात यावेत याबाबत महामार्ग वाहतूक पोलिसांनी महामार्ग प्राधिकरणाकडे पत्रव्यवहार केला आहे. मात्र महामार्ग प्राधिकरणाचे दुर्लक्ष होत असल्याने महामार्गावरून वाहनचालकांना धोकादायक प्रवास करावा लागत आहे. महामार्गावर आवश्यक असलेल्या उपाययोजना करण्याकडे प्राधिकरणाने पाठ फिरविली असल्याने आजही अनेक समस्या आ वासून उभ्या आहेत. सध्या सुरू असलेल्या पावसामुळे महामार्गावर मालजीपाडा, जी. एन. हॉटेल वर्सोवा, वॉल्टन हॉटेल, दुर्गामाता मंदिर, रेल्वे पूल, वसई फाटा या ठिकाणी रस्त्यावर मोठया प्रमाणात पाणी जमा होत आहे. त्यामुळे हलकी व दुचाकी वाहने रस्त्यावरील पाण्यामुळे व खड्ड्यांमुळे गंभीर अपघात होण्याची शक्यता आहे. मुंबई-अहमदाबाद राष्ट्रीय महामार्गावर मालजीपाडा येथे महामार्गालगत असलेल्या लोढा धाम परिसरात माती भरावाच्या वाहनातून माती खाली पडून महामार्ग चिखलमय झाला आहे.