Polluted Water Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : धक्कादायक! नागपूर जिल्ह्यातील २६ गावांत 'ही' समस्या

टेंडरनामा ब्युरो

नागपूर (Nagpur) : उन्हाळ्यात महाराष्ट्रातील अनेक गावांमध्ये पिण्याचा प्रश्न निर्माण होतो, मात्र नागपूर जिल्ह्यातील २६ गावांमध्ये वेगळीच समस्या निर्माण झाली आहे. या 26 गावांमधील पाण्याचे नमुने दूषित असल्याचे तपासणीत समोर आले आहे. ग्रामपंचायतीच्या निष्काळजीपणामुळे अनेक गावांतील नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे. त्यामुळे नागरिकांचे आरोग्य धोक्यात आले आहे.

प्रादेशिक सार्वजनिक आरोग्य प्रयोगशाळेत प्राथमिक आरोग्य केंद्राकडून येणाऱ्या पाणी नमुन्याची तपासणी केली जाते. ही तपासणी प्रत्येक महिन्यामध्ये केली जाते. त्यातून दूषित पाणी आढळलेल्या गावात जनजागृती केली जाते. तसेच संबंधित ग्रामपंचायतला ब्लिचिंग पावडर टाकणे, पाण्याच्या स्त्रोताजवळ स्वच्छता राखणे, गावकऱ्यांना स्वच्छतेचे महत्व पटवून देण्यासाठी जनजागृती करणे अशा उपाययोजना केल्या जातात. मात्र, ग्रामीण भागात कर्मचारी व पदाधिकाऱ्यांच्या दुर्लक्षामुळे आजही नागरिकांना दूषित पाणी प्यावे लागत आहे.

मार्च महिन्यामध्ये प्राथमिक आरोग्य केंद्राच्या अंतर्गत ९६६ पाणीनमुने तपासणीसाठी पाठविण्यात आले. यातील २६ पाणी नमुने दूषित आढळून आले. उन्हाळ्याच्या दिवसांमध्ये जिथे नागरिकांना भीषण पाणी टंचाईचा सामना करावा लागत असतो, त्या काळात पिण्यायोग्य पाणी मिळत नसल्याने नागरिकांमध्ये रोष आहे. त्यातच दूषित पाण्यामुळे विविध आजार बळावत आहेत. त्यामुळे दूषित पाण्यावर प्रक्रिया करणे गरजेचे आहे.