Yavatmal Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : नागरिकांचे हाल-बेहाल; खड्ड्यात नागरिकांना सापडेना रस्ता

टेंडरनामा ब्युरो

यवतमाळ (Yavatmal) : महाराष्ट्रातील सर्वात लहान तालुका म्हणून झरीजामणी या तालुक्याची ओळख आहे. तालुक्याच्या निर्मितीपासून तर आजपर्यंत पाहिजे तसा विकास न झाल्याने तालुका हा समस्यांनी ग्रस्त आहे. 'गाव तिथे रस्ता' ही शासनाची जरी भूमिका असली तरी बऱ्याच गावाला अजूनही रस्त्याची कमतरता आहे. मागील एक महिन्यापासून संततधार पावसामुळे बऱ्याच रस्त्यावर जीवघेणे खड्डे पडले असून, या खड्ड्यातून मार्ग कसा काढावा, हा प्रश्न नागरिकांना पडला आहे.

तालुक्यातील मोठे गाव म्हणून मुकुटबनची ओळख असून, येथे अनेक समस्या आहेत. रस्त्याचा प्रश्न हा गंभीर बनला आहे. वणी-मुकुटबन या मार्गाचे रुंदीकरण सुरू असून, मुकुटबन येथे मागील तीन महिन्यांपासून कामाला सुरुवात झाली. परंतु कासवगतीने सुरू असलेल्या कामाला अजूनही वेग न आल्याने अनेक अडचणींचा सामना व्यापाऱ्यांसह ग्राहकांना करावा लागत आहे. नाली बांधकामात अतिक्रमण काढून नालीचे बांधकाम करण्यात आले. रस्त्याचे दुपदरीकरण कासवगतीने सुरू आहे. अतिक्रमण काढताना संबंधित ठेकेदाराच्या कर्मचाऱ्यांनी दुजाभाव केला असून, अनेक ठिकाणी समस्या निर्माण झाल्या होत्या. नाली बांधकामात मंदिर व मस्जिदचा प्रश्न प्रभावित झाल्याने या परिसरातील बांधकाम थांबले आहे. तर तालुक्यातील मार्की गावाला जाणाऱ्या रस्त्यावर मृत्यूकुंडाचे खड्डे पडल्यामुळे विद्यार्थ्यांनासुद्धा शाळेत जाताना कसरतच करून जावे लागते. झरी तालुक्यातील कारेगाव ते निंबाळा रस्ता हा अत्यंत खराब झाला आहे. तसेच झरी ते मांगुर्डा, गवारा ते पिवरडोल, पिंपरडवाडी, खातेरा ते मुंजाळा, अर्धवन ते झरीजामनी, अर्धवन ते लहान पांढरकवडा, मांगली ते भेंडाळा, हिरापूर याप्रमाणे तालुक्यातील अनेक गावांना जोडणारा रस्त्याची सुद्धा चाळणी झाली असून खड्ड्यातून रस्ता न्ता शोधण्याची वेळ आली आहे.

मुकुटबनमध्ये भूमिगत नाल्या नसल्याने रस्त्यावरून वाहते गटाराचे पाणी : 

राजराजेश्वर मंदिरात दर्शनाला जाताना घाण पाण्याच्या प्रवाहातून पाय ओले करूनच दर्शनाला जाण्याची वेळ भाविकांवर येत आहे. या रस्त्यावरून गावातून आलेले सांडपाणी व घाण रस्त्यावरून वाहत असल्याने आरोग्याचा प्रश्नही प्रभावित होत आहे, तर सार्वजनिक बांधकाम विभागाचे याकडे दुर्लक्ष आहे. ग्रामपंचायतीच्या मागील बाजूस वॉर्ड नंबर दोनमध्ये जाणारा रस्ता हा अत्यंत खराब झाला असून, दोन महिन्यांपासून या रस्त्यावर घाण पाणी साचत आहे. या पाण्यातूनसुद्धा नागरिकांनी, जाण्याची वेळ येत आहे. हा रस्ता मंजुरात झाला असल्याचे समजते. परंतु कामाला गती अजून नाही. त्यामुळे ही एक समस्या झाली आहे. लघु व्यावसायिकाच्या दुकानासमोरच पाण्याचे डबके साचल्याने मच्छरांचा प्रादुर्भावसुद्धा होत असून, घाण पाण्याचेसुद्धा जलसाठे साठले आहे. ग्राहकांना दुकानात जाताना कसरतच करत जावे लागते. त्यामुळे या भागाकडेसुद्धा सार्वजनिक बांधकाम विभागाचे दुर्लक्ष होत आहे. त्यामुळे नागरिकांत रोष व्यक्त होत आहे.