Mumbai Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तगादा : इथे मरण स्वस्त; ३० वर्षांपासून पादचारी पुलाची प्रतीक्षाच

टेंडरनामा ब्युरो

मुंबई (Mumbai) : पादचारी पुलाची व्यवस्थाच नसल्याने वडाळ्यातील मुंबई पोर्ट ट्रस्ट गेट क्रमांक चार परिसरातील स्थानिक नागरिक व प्रवाशांना आपला जीव धोक्यात घालून रेल्वेरुळ ओलांडावा लागत आहे. गेल्या तीस वर्षांपासून येथील स्थानिक नागरिक तसेच लोकप्रतिनिधी रेल्वे प्रशासनाकडे पादचारी पूल बांधण्याची मागणी करीत आहेत; परंतु रेल्वे प्रशासन याचे गांभीर्य लक्षात घेत नसल्याने अनेकांना जीव गमवावा लागला आहे.

वडाळा पूर्व मुंबई पोर्ट ट्रस्ट गेट क्रमांक चार येथे रेल्वे रुळालगतच्या परिसरात एक लाखांहून अधिक लोकवस्ती आहे. मात्र येथील प्रवासी नागरिकांना पूर्व व पश्चिम भागात ये -जा करण्यासाठी पादचारी पूल नसल्याने थेट जीव मुठीत घेऊन रोज रेल्वेरुळ ओलांडावा लागत आहे. विशेष म्हणजे ज्येष्ठ नागरिक, अपंग व रुग्णांना हा रुळ ओलांडताना नाहक त्रासाला सामोरे जावे लागते. वडाळा पश्चिमेकडील भागातील चार रस्त्यावर अकरा शाळा, सहा महाविद्यालये, बस डेपो तसेच अनेक मंदिरे आहेत. झोपडपट्टीत राहणाऱ्या रहिवाशांना वडाळा चाररस्त्यावर जाण्यासाठी दुसरा जवळचा मार्ग नसल्याने परिसरातील शाळा महाविद्यालयीन विद्यार्थी तसेच चाकरमान्यांना रुळ ओलांडूनच ये-जा करावी लागत असून सकाळच्या घाईगडबडीच्या वेळेत महत्त्वाची व हातातील सर्व कामे टाकून पालकांना आपल्या मुलांना शाळेत ने-आण करण्यासाठी जीवघेणा प्रवास करावा लागत आहे. यामुळे स्थानिकांमध्ये रेल्वे प्रशासनाविरोधात नाराजी व्यक्त करण्यात येत आहे.

दरम्यान, या समस्येबाबत रेल्वे प्रशासनाकडे पाठपुरावा करण्यात येत आहे. तसेच येथे अपघात होऊ नयेत, यासाठी वेळोवेळी परिसरात रेल्वे पोलिसांच्या माध्यमातून जनजागृती करण्यात येत असल्याचे वडाळा रेल्वे पोलिसांनी सांगितले.

रेल्वेरुळ ओलांडणे गुन्हा आहे, हे केवळ रेल्वे प्रशासनाने कागदोपत्री मांडण्यासाठी ठेवले आहे का? गेल्या ३० वर्षांपासून खासदार, आमदार तसेच रेल्वे प्रशासन व बृहन्मुंबई महापालिका यांच्याकडे नागरिकांच्या सोयीसाठी येथे पादचारी पूल बांधण्यात यावा, अशी मागणी लेखी पत्राद्वारे करून त्याचा पाठपुरावा करीत आहे.
- शिवाजी फणसेकर, सामाजिक कार्यकर्ते