चंद्रपूर (Chandrapur) : दोन वर्षांआधी बल्लारपूर येथील नगर परिषदेच्या बचत भवनाजवळ भाजीपाला विकणाऱ्या ठोक व्यापाऱ्यांसाठी बनवलेल्या भाजी मंडईचे लोकार्पण झाले. त्यानंतर दोनदा गाळे लिलाव प्रक्रिया राबविण्यात आली. मात्र वाढीव दरामुळे व्यापाऱ्यांचा प्रतिसाद मिळाला नसल्याने आजघडीला मंडईतील गाळे शटर बंद असून त्यात घाणीचे साम्राज्य पसरले आहे व भटक्या लोकांचा निवास आहे.
बल्लारपूर शहरात ठोक भाजीपाला विक्रेत्यांची संख्या 20-30 च्या वर आहे. गेल्या अनेक वर्षांपासून हे भाजी विक्रेते नगर परिषदने बनवून दिलेल्या लहान खोलीत भाड्याने राहत होते. त्याची जागा कमी पडत असल्याने व्यापाऱ्यांच्या मागणीवरून नगर पालिकेने वैशिष्ट्यपूर्ण निधीतून ठोक भाजीपाला विक्रेत्यांना नवीन गाळे बांधून दिले. गाळ्यांचा लिलाव केला; परंतु त्या गाळ्यांमधील अपुऱ्या सोयी व गा वाढीव दर यांमुळे व्यापाऱ्यांनी गाळे घेण्यास नकार दिला आहे व दोन वर्षांपासून काही जुन्या खोलीत तर काही उन्हात, पावसाळ्यात दुकान थाटून भाजीमंडईचा व्यापार करीत आहे; पण नवीन बनवलेले गाळे घ्यायला तयार नाहीत. या मंडईत 25 गाळे आहेत व त्याचे नव्या मूल्यांकनानुसार मासिक भाडे राहणार आहे. हे भाडे व्यापाऱ्यांना मंजूर नाही. बर सर्वांत मोठे भाजी मार्केट असलेल्या शहरात अपुऱ्या जागेमुळे व्यापाऱ्यांना प्रचंड त्रास सहन करावा लागत आहे.
नगर परिषदेने बनविलेले गाळे भाजीपाला बाजार असायला पाहिजे, तसे बनवले नाही. बाजाराला चारही दिशांनी रस्ते आवश्यक आहे. भाजीपाला घेऊन येणाऱ्या वाहनास सोयीचा रस्ता नाही. माल उतरविण्यास जागा नाही, याउलट मनमानी मासिक भाडे आहे. यामुळे कोणीही व्यापारी त्यामध्ये जाण्यास तयार नाही. अशी माहिती भाजीपाला व्यापारी नासिर बक्श याने दिली. नवीन भाजी मंडईसंदर्भात आमची अनेकदा नगर परिषद प्रशासनाशी बोलणी झाली; परंतु तोडगा काही निघाला नसल्याचे ठोक भाजीपाला मंडई चे अध्यक्ष गैबिदास पाझारे म्हणाले.