Road Tendernama
तगादा (तक्रार, गाऱ्हाणी, दाद)

तागादा : शेंद्रा-आपतगाव रस्त्यावर खड्डेच खड्डे; रस्त्याच्या दुरावस्थेने ग्रामस्थांचे हाल

टेंडरनामा ब्युरो

छत्रपती संभाजीनगर (Chhatrapati Sambhajinagar) : तालुक्यातील शेंद्रा-आपतगाव या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणाऱ्या ग्रामीण भागातील रस्त्याची दयनीय अवस्था झाली आहे. रस्ता खड्डेमय झाल्याने शेतकऱ्यांनाही अनेक अडचणीला सामोरे जावे लागत आहे.

वारंवार रस्ता दुरुस्तीची मागणी करूनही रस्ता दुरस्ती होत नसल्याने ग्रामस्थांमधून संताप व्यक्त होत आहे. या रस्त्यावर मोठमोठे खड्डे पडले आहे.पंचतारांकीत शेंद्रा औद्योगिक वसाहतीसह टाकळी शिंपी, टाकळी वैद्य, आपतगाव, भालगाव, चितेपिंपळगाव, झाल्टा, सुंदरवाडी, गारखेडा, गांधेली, आदी ठिकाणच्या ग्रामस्थांना या रस्त्यावरून उत्तरेला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ७५३ सी ते दक्षिणेला असलेल्या राष्ट्रीय महामार्ग क्रमांक - ५२ सोलापुर - धुळे हायवेला जाण्यासाठी प्रवास करावा लागतो. रस्त्यांवरील खड्ड्यामुळे अनेकदा रात्री-अपरात्री वाहने नादुरुस्तही होत आहेत. यामुळे प्रवाशांचे हाल तर होतातच; शिवाय वाहनचालकांना नाहक खर्चही सहन करावा लागत आहे. तसेच यामार्गावरून पंचतारांकित शेंद्रा औद्योगिक वसाहतीत आसपासच्या शेकडो गावातील कामगारांना जाण्यासाठी हा रस्ता सोयीस्कर आहे. मात्र या रस्त्यामुळे कामगारांना देखील त्रास सहन करावा लागत आहे. गत दोन वर्षांपासून येथील ग्रामस्थ रस्ता दुरुस्तीची मागणी सार्वजनिक बांधकाम विभाग, जिल्हा परिषद तसेच पंचायत समितीकडे करत आहेत. मात्र त्यांच्या मागणीकडे अधिकारी दुर्लक्ष करत आहेत. सहा वर्षांपूर्वी या रस्त्याचे सुमारे सहा कोटी रुपये खर्च करून डांबरीकरण करण्यात आले होते. मात्र, काम अत्यंत निकृष्ट दर्जाचे केल्याने वर्षभरातच रस्ता उखडल्याचा आरोप ग्रामस्थांनी केला आहे. रस्त्यावर डांबरच शिल्लक नसल्याने प्रवाशांना अधिकच त्रास सहन करावा लागत आहे.

छत्रपती संभाजीनगर - जालना ते सोलापूर - धुळे या दोन राष्ट्रीय महामार्गांना जोडणारा हा साडेपाच कि.मी. चा रस्ता आहे. रस्त्यावरील डांबर निघून गेल्याने अनेक ठिकाणी खडी उघडी पडली आहे. रस्त्याच्या मधोमध जड वाहनांनी चार्या पडल्याने मोठ्या प्रमाणात अपघाताची संख्या वाढल्याचे गावकरी सांगत आहेत. पाटबंधारे विभागांतर्गत सुखना मध्यम प्रकल्पातून मोठ्या प्रमाणात रात्री - अपरात्री वाळुचा उपसा होत असल्याने या चिंचोळ्या रस्त्यावरुन वाळुची चोरटी वाहतूक होत असल्याने आधीच खड्डेमय रस्ता त्यात जड हायवांनी खड्डे खोलखोल जात आहेत. अनेकदा दुचाकीस्वार घसरून पडल्याच्या घटनाही येथे झालेल्या आहेत. यामुळे या रस्त्याची दुरुस्ती गतीने करावी, अशी वारंवार मागणी केली जात आहे. मात्र सदरील कामासाठी कुठलाही विभाग पुढाकार घेत नसल्याचे गावकरी सांगत आहेत. यासंदर्भात गावकर्यांनी तक्रार केल्यानंतर प्रतिनिधीने मंगळवारी सकाळी छत्रपती संभाजीनगर पासून वीस किलोमीटर अंतरावरील या रस्त्याची दुचाकीवर बसून पाहणी केली. यावेळी रस्त्याची अवस्था पाहुण गावकर्यांनी मोठ्या प्रमाणात संताप व्यक्त केला. चांगल्या रस्त्याचा अभाव असल्याने प्रवाशांचे हाल कायमच आहेत.या रस्त्याची चाळणी झाली आहे.  रस्ता खराब झाल्याने शेतकऱ्यांना अडचणींना सामोरे जावे लागत आहेत. या रस्त्यावरून शेतकरी दररोज शेतात जातात तसेच आपला शेतीमाल, भाजीपाला विक्रीसाठी आणतात. खराब रस्त्यामुळे बैलगाडी कशी हाकावी असा प्रश्नही शेतकऱ्यांना पडत आहे.

शेंद्रा-बिडकीन कनेक्टीव्हीटीसाठी हा सोयीस्कर रस्ता

एकीकडे राष्ट्रीय व राज्य महामार्गामुळे शहराच्या विकासात भर पडत आहे. मात्र, डिएमआयसीतील शेंद्रा आणि बिडकीन यांची कनेक्टीव्हीटीसाठी शेंद्रा ते बिडकीन हा रस्ता कागदावरच असल्याने उद्योजकांचे हाल होत आहेत. सार्वजनिक बांधकाम खात्याने करमाड औद्योगिक वसाहतीचा विचार करून करमाड - बिडकीन - रस्त्यासाठी २६७ कोटी रूपये खर्च करून ६७ किलोमीटरचा रस्ता तयार केला. मात्र या रस्त्याचा शेंद्रा औद्योगिक वसाहतीतीतील उद्योजकांना फारसा उपयोग होत नाही. शेंद्रा ते आपतगाव‌ या रस्त्याचे भूसंपादन करून हा रस्ता मोठा केल्यास शेंद्रा - बिडकीन औद्योगिक वसाहतीतीची कनेक्टीव्हीटी वाढेल व‌ नव्याने येणाऱ्या उद्योगांना मोठा फायदा होईल तसेच उद्योजकांचा वेळ आणि इंधनाचा खर्च वाचेल. शेंद्रा ते बिडकीन कनेक्टीव्हीटीसाठी केंद्र सरकारच्या भारतमाला प्रकल्पा अंतर्गत राष्ट्रीय महामार्गाचा समावेश असतानाही त्याचे काम अद्यापही कागदावरच आहे.‌ शेंद्रा - आपतगाव हा रस्ता राष्ट्रीय महामार्गात समावेश केल्यास  शेंद्रा-बिडकिन ते पुढे पुणे महामार्ग आणि सोलापूर-धुळ्यासाठी कसाबखेड्यापर्यंत कनेक्टीव्हिटी यातून मिळेल. मात्र, भूसंपादनासाठी लागणारा मोठा खर्च पाहुण हा मार्ग होऊ शकला नाही. २०२० मध्ये मसिआच्या झालेल्या एक्सपोच्या समारोपाच्या कार्यक्रमावेळी आलेले केंद्रीय मंत्री नितीन गडकरी यांनी या रस्त्याचा विषय रद्द करणार असल्याचे सांगितले होते. त्याऐवजी करमाड पोलिस ठाण्यापासून कचनेर मार्गे बिडकीन पर्यंत कनेक्टीव्हीटीचा वापर करण्याचा सल्ला दिला होता. मात्र, उद्योगांच्या नागरिकांसाठी हा रस्ता पुरक नाही. हा रस्ता नसल्याने शेंद्र्यातील उद्योजकांना छत्रपती संभाजीनगर मार्गे वाळूज जावे लागत आहे. यामुळे वेळ, पैसा जास्तीचा खर्च करावा लागत असल्याची प्रतिक्रिया उद्योजकांनी दिली. शेंद्रा-बिडकीनमध्ये ‘ऑरिक सिटी’त उद्योगांना पूरक अशा सुविधा दिल्या आहेत. यात शेंद्रा ते बिडकीन आणि बिडकीन ते वाळूज अशा औद्योगिक वसाहतीला जोडणाऱ्या रस्त्याची गरज आहे. त्यसाठी शेंद्रा - आपतगाव या रस्त्याचा राष्ट्रीय महामार्गात समावेश केल्यास  उद्योग येतील, रोजगार वाढतील. व‌ पुढील दहा वर्षांत शहराचे चित्र बदललेले असेल.