वर्धा (Wardha) : कोट्यवधी रुपये खर्च करून गत वर्षी कारंजा घाडगे शहरातून जाणाऱ्या उडाण पुलावरील डांबरी मार्ग तयार करण्यात आला होता. मात्र पहिल्याच पावसात मार्गावर ठिकठिकाणी खड्डे पडले असून रस्त्याची दुरवस्था झाली आहे. या मार्गावर अपघाताचा क्रम सुरू असून संबंधित कंपनी आणि राष्ट्रीय प्राधिकारण महामंडळाचे याकडे दुर्लक्ष होत असल्याचे दिसून येत आहे.
शहरातील वाहतूक सोईस्कर व्हावी यासाठी कोट्यवधी रुपये खर्च करून उड्डाणपूल बांधण्यात आला, गतवर्षी जून महिन्यात या मार्गावरून वाहतूक सुरू झाली होती, मात्र पहिल्याच पावसात उड्डाण पुलावरील उत्कृष्ट कामाचे पितळ उघडले पडले. ठिकठिकाणी पुलावर खट्टे पडले असून लहान मोठ्या अपघातास कारणीभूत ठरत आहे. उड्डाणपुलाच्या सुरुवातीला आणि शेवटी असे दोन मोठे हायमास्ट या पुलावर आहे. ऑक्टोबरपासून उड्डाणपुलावरून इतर स्ट्रीट लाइट सुरु झालेले होते. त्यापैकी शिक्षक कॉलनी समोरील एक हायमास्ट, नऊ महिने लोटूनही अद्याप सुरु झाला नाही.
या संदर्भात स्थानिक नागरिकांनी वेळोवेळी संबंधित विभागाकडे तक्रारी केल्या. मात्र याचा काही एक उपयोग झाला नाही. मार्गावरील एका बाजूला रात्रीच्या सुमारास अंधार असल्याने याठिकाणी असामाजिक तत्त्वांचा वावरही वाढला आहे. याकडे संबंधित अधिकाऱ्यांनी लक्ष देत मार्गावरील खड्डे बुजवावेत तसेच बंद असलेला हायमास्ट तातडीने सुरु करण्यात यावा अशी मागणी स्थानिक नागरिकांकडून करण्यात आली आहे. गतवर्षी जून महिन्यापासून उड्डाणपुलावरील वाहतूक सुरू झालेली आहे. परंतु एक हायमास्ट बंद असल्यामुळे पुलावरील आजूबाजूच्या परिसरामध्ये अंधार असतो. उड्डाणपुलाखालील गोळीबार चौकातील व बसस्थानक समोरील दिवे सुरुवातीपासूनच बंद असल्याने परिसरात अंधाराचे साम्राज्य आहे. पुलाचे बांधकाम करणारी कंपनी आणि त्यावर नियंत्रण असणारी राष्ट्रीय महामार्ग प्राधिकरण यांच्या ढिसाळ कारभार बद्दल कारंजा शहरात संताप व्यक्त केला जात आहे.
तहसीलदारांना दिले संघटनांनी निवेदन :
उड्डान पुलावरील खड्डे, तातडीने बुजवावेत तसेच बसस्थानक परिस- रातील बंद असलेले दिवे सुरू करण्यात यावे अशा मागणीचे निवेदन राष्ट्रीय महामार्ग प्राधिक रणच्या नावे कारंजा तहसीलदार ऐश्वर्या गिरी यांना देण्यात आले. यावेळी विविध सामाजिक संघटनेचे कार्यकर्ते पदाधिकारी यांची उपस्थिती होती.