मुंबई (Mumbai) : कल्याण - डोंबिवली महापालिकेने (Kalyan Dombivali Municipal Corporation) ठेकेदाराचे बिल थकवल्याने त्याने महापालिकेच्या उबर्डे कचरा प्रकल्पाचे काम थांबविले आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. केडीएमसीकडे तब्बल चार कोटी रुपयांची थकबाकी आहे.
ठेकेदाराने मंगळवार (26 एप्रिल) सकाळपासून कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करत कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद केला आहे. त्यामुळे भरलेल्या कचऱ्याच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत थकलेले बिल मिळत नाही तोपर्यंत काम सुरू करणार नसल्याची भूमिका ठेकेदाराने घेतली आहे. परिणामी शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे. डिझेल क्रेडिटवर मिळत नसल्याने काम थांबवल्याची माहिती ठेकेदार कल्पेश सोनी यांनी दिली आहे.
कल्याण डोंबिवली शहरातील ओल्या कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनाने उभारलेल्या उबर्डे प्लांटमध्ये कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी ठेकेदाराची नियुक्ती करण्यात आली आहे. या ठेकेदाराला कचऱ्यावर प्रक्रिया करण्यासाठी महापालिका प्रशासनाकडून दरमहा खर्च दिला जातो. मात्र डिसेंबर महिन्यापासून पालिका प्रशासनाकडून ठेकेदाराचे बिल देण्यात आलेले नसल्याने 4 कोटी 15 लाख रुपयांचे बिल थकले आहे. हा प्लांट चालवण्यासाठी लागणाऱ्या डिझेलच्या किमती दिवसागणिक वाढत असताना बिल थकल्याने ठेकेदाराला डिझेल क्रेडिटवर मिळत नाही, असं ठेकेदाराचे म्हणणे आहे.
वारंवार मागणी करुनही महापालिका प्रशासनाकडून केलेल्या कामाचे बिल दिले जात नसल्याने ठेकेदाराने कामबंदचे हत्यार उपसले आहे. आज सकाळपासून कचरा प्रक्रिया प्रकल्प बंद करत कचऱ्याच्या गाड्यांना प्रवेश बंद केल्याने भरलेल्या कचऱ्याच्या गाड्यांच्या लांबच लांब रांगा लागल्या आहेत. जोपर्यंत थकलेले बिल मिळत नाही तोपर्यंत काम सुरु करणार नाही, अशी ठाम भूमिका ठेकेदाराने घेतली आहे. त्यामुळे शहरात कचऱ्याची भीषण समस्या निर्माण होण्याची शक्यता आहे.